
Solapur, 26 November : विधानसभा निवडणुकीत अनेक मातब्बरांना पराभवाचे तोंड पहावे लागले आहे. सोलापुरातही तोच प्रकार घडला आहे. बलाढ्य नेत्यांना पराभूत करत सोलापुरातून पाच नवे चेहरे विधानसभेत दाखल झाले आहेत. यातील काहींनी तर पहिल्यांदाच निवडणूक लढवून विधानसभेत दाखल झाले आहेत.
सोलापूर जिल्ह्यातून (Solapur) डॉ. बाबासाहेब देशमुख, अभिजीत पाटील, देवेंद्र कोठे, उत्तम जानकर आणि राजू खरे हे पाच नवे चेहरे प्रथमच विधानसभेत दाखल झाले आहेत. या पाचपैकी चौघांनी तर पहिल्यांदाच निवडणूक लढवली असून ते पहिल्याच प्रयत्नांत आमदार बनले आहेत.
सांगोला मतदारसंघातून डॉ. बाबासाहेब देशमुख यांनी पहिल्यांदाच विधानसभेची निवडणूक (Assembly Election) लढवली असून त्यांनी शिवसेनेचे आमदार शहाजीबापू देशमुख यांना २५ हजार ३८६ मतांनी पराभूत केले आहे. मागील निवडणुकीत डॉ. बाबासाहेब यांचे बंधू डॉ. अनिकेत देशमुख यांनी निवडणूक लढवली होती. त्यात शहाजी पाटील यांनी डॉ. देशमुख यांचा ७६८ मतांनी पराभव केला होता. त्याचे उट्टे बाबासाहेब देशमुख यांनी या निवडणुकीत काढले आहेत.
माढा विधानसभेची निवडणूक सोलापूर जिल्ह्यात सर्वाधिक लक्षवेधी ठरली. कारण या मतदारसंघातून सहा वेळा आमदार झालेले बबनराव शिंदे यांनी माघार घेत आपले चिरंजीव रणजितसिंह शिंदे यांना विधानसभेच्या रिंगणात उतरवले होते. रणजितसिंह शिंदे यांच्या विरोधात पंढरपूरमधील विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष अभिजीत पाटील यांनी महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून निवडणूक लढवली आणि माढ्यातील शिंदेशाहीला सुरुंग लावला. माढ्यातून अभिजीत पाटील यांनी रणजित शिंदे यांना ३० हजार ६२१ मतांनी पराभूत केले आहे.
मोहोळ मतदारसंघातून निवडून आलेले राजू खरे हे सर्वाधिक लकी उमेदवार ठरले आहेत. कारण, अवघ्या काही दिवसांतच ते आमदार झाले आहेत. राजू खरे यांनी मोहोळ विधानसभा मतदारसंघातील बलाढ्य समजले जाणारे माजी आमदार राजन पाटील यांची अनेक वर्षांची सत्ता उलटवून टाकत मोहोळ तालुक्यात परिवर्तन घडवले आहे. मोहोळमधील राजन पाटील यांचे सर्व विरोधक खरे यांच्या पाठीशी उभे राहिले होते. खरे यांनी आमदार यशवंत माने यांचा ३० हजार २०२ मतांनी पराभव केला आहे.
कोठे घराण्याचे आमदारकीचे स्वप्न पूर्ण करणारे देवेंद्र कोठे हे पहिल्याच निवडणुकीत विधानसभेत पोहोचले आहेत. कोठे हे सोलापूर शहर मध्य मतदारसंघातून भाजपच्या तिकिटावर पहिल्यांदाच निवडून आले आहेत. त्यांनी एमआयएमचे फारूक शाब्दी यांचा ४८ हजार ८५० मतांनी पराभव केला आहे.
माळशिरस मतदारसंघातून विधानसभेत पोहोचण्याचा प्रयत्न करणारे उत्तम जानकर यांना चौथ्यावेळी यश आले आहे. उत्तम जानकर यांनी यापूर्वी तीन वेळा विधानसभेची निवडणूक लढवली होती. मात्र, त्यांना त्यात यश आले नव्हते. या वेळी मोहिते पाटलांच्या मदतीने उत्तम जानकर हे विधानसभेत पोहोचले आहेत. जानकर यांनी राम सातपुते यांचा १३ हजार १४७ मतांनी पराभूत केले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.