
Solapur, 26 November : राज्यात सत्तास्थापनेला वेग आला असून महायुतीमध्ये बैठकांवर बैठका सुरू आहेत. विशेषत मुख्यमंत्रिपदावरून शिवसेना आणि भारतीय जनता पक्षामध्ये रस्सीखेच सुरू असल्याचे दिसून येत आहे. याशिवाय अनेक आमदार मंत्रिपदासाठी वरिष्ठ नेत्यांकडे लॉबिंग करताना दिसून येत आहेत. शिवसेनेचे आमदार तानाजी सावंत यांनी सलग दुसऱ्या दिवशी देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर हजेरी लावली आहे.
शिवसेनेचे तानाजी सावंत (Tanaji Sawant) हे भूम-परांडा मतदारसंघातून सलग दुसऱ्यांदा निवडून आले आहेत. मात्र, यावेळी त्यांना विजयासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार राहुल मोटे यांच्याशी प्रचंड झगडावे लागले आहे. सावंत यांचा भूम परांड्यातून अवघ्या १५०० मतांनी विजय झाला आहे, त्यामुळे सावंतांना या वेळी मंत्रिपदाची प्रचंड आवश्यकता भासणार आहे.
दरम्यान, प्रचाराच्या काळात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी तानाजी सावंत यांना मंत्री करण्याचा शब्द दिलेला आहे. तुम्ही तानाजीरावांना आमदार करा; मी त्यांना नामदार करतो, असे मुख्यमंत्री शिंदे यांनी प्रचार सभेत म्हटले होते. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे नव्या सरकारमध्ये सावंतांना पुन्हा मंत्री करून शब्द पाळणार का, असा सवाल उपस्थित होत आहे.
विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला तब्बल १३२ जागा मिळाल्या आहेत. दुसरीकडे एकनाथ शिंदे यांच्या पक्षाला ५७, तर अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला ४१ जागा मिळाल्या आहेत, त्यामुळे संख्याबळानुसार मंत्री वाटपाचा निर्णय झाला तर शिंदे आणि पवार यांना किती मंत्रिपदे येणार आणि ते किती लोकांचे समाधान करणार, याची उत्सुकता असणार आहे.
भारतीय जनता पक्षाला संख्या बळानुसार २२ ते २४ मंत्रिपदे मिळण्याची शक्यता आहे. शिंदे यांच्या शिवसेनेला १० ते १२, तर अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला ८ ते १० मंत्रिपदे मिळतील, असा एक फार्म्युला सांगण्यात येत आहे, त्यामुळे नव्या फार्म्युल्यानुसार सरकारमध्ये आपली वर्णी लागावी, यासाठी इच्छुकांकडून मोर्चेबांधणी करण्यात येत आहे. त्यामुळे मंत्रिपदाची संधी कोणत्या आमदारांना मिळणार, याची उत्सुकता आहे.
दरम्यान, मंत्रिपदासाठी इच्छुक असलेले तानाजी सावंत यांनी सोमवारी (ता. २५ नोव्हेंबर) आणि मंगळवारी (ता. २६ नोव्हेंबर) असे सलग दोन दिवस देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर हजेरी लावली. त्यामुळे तानाजी सावंत यांची ही ‘सागर’ वारी ही त्यांच्या मंत्रिपदासाठी आहे की शिवसेनेकडे मुख्यमंत्रिपद यावे, यासाठी आहे, अशी चर्चा रंगली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.