

Gokul Election News: गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीसाठी महायुतीतील जागावाटप निश्चित झाल्यानंतर उमेदवारीवरून घटक पक्षांमध्ये अंतर्गत चुरस वाढली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोट्यातून ए. वाय. पाटील यांची उमेदवारी निश्चित झाल्याचे स्पष्ट होताच गोकुळचे माजी संचालक प्रा. किसन चौगुले यांनी वेगळा मार्ग निवडला आहे. आपली उमेदवारी डावलली जाण्याची शक्यता वाटल्याने त्यांनी काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांची भेट घेतली आणि समविचारी आघाडीतून निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला.
मात्र, चौगुले यांनी सतेज पाटील यांची भेट घेतल्यानंतर राष्ट्रवादीचे मंत्री हसन मुश्रीफ यांनी त्यांच्यासाठी शेवटच्या क्षणापर्यंत प्रयत्न सुरू ठेवले होते. त्यामुळे ज्यांच्यासाठी मुश्रीफांनी उमेदवारीची यादी तब्बल दीड वाजेपर्यंत ताणून धरली, त्यांनीच त्याआधी दुसरी राजकीय वाट धरल्याने आता या निर्णयाची चर्चा सुरू झाली आहे. त्यामुळे घाईघाईने त्यांनी हा निर्णय घेतल्याचे बोलले जात आहे.
मुश्रीफांचा शेवटपर्यंत प्रयत्न; फडणवीसांशीही चर्चा
प्रा. किसन चौगुले यांना उमेदवारी मिळावी यासाठी मंत्री हसन मुश्रीफ यांनी अखेरच्या क्षणापर्यंत प्रयत्न केले. उमेदवारीची यादी सकाळी दहा वाजता जाहीर होण्याची शक्यता असताना ती दुपारी दीड वाजेपर्यंत ताणून धरण्यात आली. दरम्यान, मुश्रीफ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करून चौगुले यांच्या उमेदवारीचा मार्ग काढण्याचा प्रयत्न केला. या चर्चेतून अखेर एक फॉर्म्युलाही निश्चित झाल्याचे राष्ट्रवादीकडून जाहीर करण्यात आले.
अडीच-अडीच वर्षांचा फॉर्म्युला
मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या चर्चेनुसार प्रा. किसन चौगुले यांना अडीच वर्षांसाठी गोकुळचे संचालकपद, तर उर्वरित अडीच वर्षांसाठी वसंतराव धुरे यांना संचालकपद देण्याचा निर्णय झाल्याचे राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब पाटील आसुर्लेकर यांनी पत्रकाद्वारे जाहीर केले. तसेच दुसऱ्या जागेसाठी पी. एन. पाटील गटाचे राहुल पाटील ज्याचे नाव सुचवतील, त्या व्यक्तीला संधी देण्याचे ठरल्याचेही पत्रकात स्पष्ट करण्यात आले. मात्र, हा तोडगा समोर येईपर्यंत चौगुले यांनी काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांची भेट घेऊन समविचारी आघाडीतून उमेदवारी स्वीकारण्याचा निर्णय घेतला होता.
ए. वाय. पाटील यांच्या प्रवेशाने समीकरणे बदलली
ए. वाय. पाटील यांनी महायुतीत प्रवेश केल्यानंतर गोकुळच्या जागावाटपात राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोट्यातून त्यांची उमेदवारी निश्चित झाली. ए. वाय. पाटील यांच्या महायुतीतील प्रवेशामुळे राधानगरी परिसरात राष्ट्रवादीमध्ये आधीपासूनच धुसफूस असल्याची चर्चा होती. याच पार्श्वभूमीवर चौगुले यांचे नाव उमेदवारीच्या शर्यतीतून मागे पडण्याची शक्यता निर्माण झाली. आपल्याला उमेदवारी मिळणार नसल्याचा अंदाज आल्यानंतर चौगुले यांनी सतेज पाटील यांची भेट घेतली आणि समविचारी आघाडीतून निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला.
महायुतीत उमेदवारीवरून धुसफूस कायम
गोकुळच्या निवडणुकीत महायुतीतील जागावाटप निश्चित झाले असले, तरी उमेदवारीवरून घटक पक्षांमध्ये नाराजी आणि अंतर्गत चुरस कायम आहे. ज्यांना उमेदवारी निश्चित झाली आहे, त्यांनी सुटकेचा निश्वास सोडला असताना डावलले जाण्याची शक्यता असलेल्या काही इच्छुकांनी वेगळी राजकीय भूमिका घेण्यास सुरुवात केली आहे.
प्रा. किसन चौगुले यांच्या निर्णयामुळे या अंतर्गत संघर्षाला आता वेगळे वळण मिळाले आहे. विशेष म्हणजे चौगुलेंसाठी महायुतीतूनच तोडगा काढण्याचे प्रयत्न सुरू असताना त्यांनी सतेज पाटील यांची वाट धरली आणि त्यानंतर मुख्यमंत्री फडणवीसांच्या चर्चेतून अडीच वर्षांचा फॉर्म्युला समोर आला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.