

Kolhapur News: गोकुळ दूध संघासाठी रविवारी (ता.१८ ऑक्टोबर) मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. सुमारे बारा तालुक्यांमध्ये ३५ मतदान केंद्रावर मतदान प्रक्रिया होत आहे. तर सोमवारी (ता.१९ ऑक्टोबर) मतमोजणी होऊन निकाल जाहीर केला जाणार आहे. मात्र, ही मतमोजणी प्रक्रिया आत्तापर्यंत दोनवेळा बदलली गेल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे.
कोल्हापूर जिल्ह्यासह संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेल्या गोकुळच्या निवडणुकीत सुरुवातीला सर्व मतपत्रिका एकत्र करून त्यांचे २५ पत्रांचे गट्टे करून प्रत्येक टेबलवर मतमोजणी केली जाणार होती. आता ही प्रक्रिया बदलून केंद्रनिहाय मतमोजणी केली जाणार असल्याचं बोललं जात आहे. ही मतमोजणी प्रक्रिया दोनवेळा बदलल्यामुळे गोकुळ दूध संघाच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे.
महायुतीसह महाविकास आघाडीच्याही नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागलेल्या गोकुळ दुधसंघाच्या या निवडणुकीच्या मतमोजणीवरुन पुन्हा एकदा राजकीय वादंग निर्माण होण्याची शक्यता आहे. ही प्रक्रिया बदलण्यामागं काही राजकीय दबाव होता का? असा सवालही उपस्थित केला जात आहे.त्यामुळे आरोप-प्रत्यारोपांचा धुराळा उडण्याची शक्यता आहे.
दरम्यान, जिल्हा प्रशासनाकडून मतदान आणि मतमोजणीची यंत्रणा सज्ज करण्यात आली आहे. बुधवारी या संदर्भात पत्रकार परिषद घेत निवडणूक निर्णय अधिकारी मोसमी चौगुले यांनी मतमोजणी संदर्भात माहिती देण्यात आली होती.
मतमोजणीसाठी ३२ टेबलांची व्यवस्था करण्यात आली आहे. यासाठी ३२ मतमोजणी पर्यवेक्षक, ६४ मतमोजणी सहाय्यक आणि पाच शिपाई नियुक्त करण्यात आले असून, दोन राखीव पर्यवेक्षक, चार राखीव सहाय्यक आणि तीन राखीव शिपायांची व्यवस्था करण्यात आली आहे.
सर्व मतदान केंद्रांवरील मतपत्रिका मतदारसंघनिहाय एकत्रित करून प्रत्येकी २५ मतपत्रिकांचे स्वतंत्र गठ्ठे तयार करण्यात येणार आहेत. सर्वसाधारण मतदारसंघाची मतमोजणी टेबल क्रमांक १ ते २२ वर, महिला प्रतिनिधींची २३ ते २६ वर, इतर मागास प्रवर्गाची २७ व २८ वर, विमुक्त जाती/भटक्या जमाती/विशेष मागास प्रवर्गाची २९ व ३० वर, तर अनुसूचित जाती/जमाती प्रतिनिधींची मतमोजणी ३१ व ३२ क्रमांकाच्या टेबलांवर होणार आहे. अशी निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडून देण्यात आली होती.
आता या निर्णयाला दोन दिवस उलटत नाही,तोच पुन्हा एकदा ही मतमोजणी प्रक्रिया बदलण्यात आली असल्याचे समोर येत आहे. दरम्यान, शनिवारी निवडणूक निर्णय अधिकारी मोसमी चौगुले यांनी, 35 केंद्रावर मतदान होणार आहे. त्यानुसार 35 टेबलवर याची मतमोजणी होणार असून केंद्रनिहाय निकाल जाहीर होणार आहे, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी चौगुलेंनी दिली.
या संपूर्ण घोळानंतर आता विरोधकांकडून या प्रक्रियेवर बोट ठेवले जात आहे. अनेकांनी व्हाट्स अप स्टेटसच्या माध्यमातून गोकुळच्या मतमोजणीची प्रक्रिया नेमकी कोणत्या पद्धतीने होणार याचे स्टेटस ठेवले आहेत.
दरम्यान, केंद्रनिहाय मतमोजणी होणार असल्यानं आता महायुतीच्या नेत्यांची अडचण वाढली आहे. या प्रक्रियेमुळे कोणत्या मतदान केंद्रावर कोणाचे मतदान कोणासाठी पडले? याचा अंदाज लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुन्हा एकदा गोकुळ दूध संघाचे राजकारण ढवळून निघणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.