

Kolhapur News, 22 Oct : संपूर्ण राज्यभरात चर्चेचा विषय ठरेलल्या 'गोकुळ' दूध संघाच्या निवडणुकीत काँग्रेस नेते सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखालील समविचारी आघाडीने महायुतीचा अनपेक्षित पराभव करत विजय मिळवला. सतेज पाटलांनी गोकुळचं मैदान मारलं असलं तरी त्यांच्या वाट्याला आलेल्या काटावरच्या बहुमतामुळे अध्यक्ष निवडीत नवी अडचण पेच निर्माण झाली आहे.
अत्यंत चुरशीच्या झालेल्या निवडणुकीत महायुतीच्या वाट्याला २५ पैकी १२ तर समविचारी आघाडीला १३ जागा मिळाल्या. गोकुळ दुघ संघाच्या पोटनियमानुसार निवड सभेसाठी किमान १४ संचालकांचा कोरम गरजेचा असतो. सध्या समविचारी आघाडीकडे १३ संचालक आहेत.
मात्र, महायुतीचे संचालक अनुपस्थित राहिले तर अडचणी वाढणार असून त्या संचालकांवरच आघाडीची भिस्त राहणार आहे. त्यामुळे आता संचालकांचा कोरम पूर्ण करण्यासाठी महायुतीतील एकजण गळाला लागतो का? याची चाचपणी सुरु असून तसं न झाल्यास सतेज पाटलांच्या नेतृत्वाखालील आघाडी आणि महायुतीमध्ये काही समझोता होतो का? यासाठीही एक यंत्रणा काम करत असल्याची माहिती समोर आली आहे.
दरम्यान, 'गोकुळ'मध्ये कोरम अभावी सलग तीन सभा तहकूब झाल्यास तर प्रशासक येऊ शकतो. त्यामुळे आता सतेज पाटलांना निकालानंतरही कोरम पूर्ण करण्यासाठी मोठी कसरत करावी लागणार आहे. तर सहकारी संस्था सेक्शन ७३ (एएए) मधील तरतुदीनुसार निवड सभेला निर्वाचित सदस्यांपैकी निम्यापेक्षा एक अधिक सदस्यसंख्या असणे बंधनकारक आहे. 'गोकुळ'च्या संचालक मंडळाची संख्या २५ असून याच्या निम्मे साडे बारा सदस्य म्हणजेच तेरा अधिक एक असे १४ सदस्य उपस्थित असणे गरजेचं आहे.
तर दुसरीकडे काठावरचे बहुमत असल्यामुळे अध्यक्ष निवडीसाठी समविचारी आघाडीला एका तर महायुतीला दोन संचालकांची गरज आहे. त्यामुळे यातून फोडाफोडीचे राजकारण उफाळून येण्याची शक्यताही नाकारता येत नाही. दरम्यान, आघाडीकडे १३ संचालक असून त्यांना आणखी एक संचालक पाहिजे.
निवड सभेला महायुतीचे १२ संचालक गैरहजर राहिले तर सभा होऊ शकणार नाही. बुधवारी दिवसभर महायुती व काँग्रेस आघाडीच्या नेत्यांमध्ये पोटनियमांबाबतची माहिती घेऊन पुढील रणनीती काय आखायची? याबाबतची चर्चा सुरू होती, अशीही माहिती समोर आली आहे. त्यामुळे आता गोकुळचा अध्यक्ष कोण होणार? आणि यासाठी दोन्ही बाजूंनी नेमके काय प्रयत्न केले जाणार याकडे अवघ्या राज्याचं लक्ष लागलं आहे.
तर अशातच आता समविचारी आघाडीच्या संचालकांना सतेज पाटील यांच्या कसबा बावड्याच्या निवासस्थानी बोलावलं आहे. तर महायुतीच्या उमेदवारांना कोल्हापूर जिल्हा बँकेत बोलावलं असून या ठिकाणच्या बैठकीत वरिष्ठ नेते उपस्थित असणार आहेत. दोन्ही बाजूच्या विजयी उमेदवारांना तडकाफडकी उपस्थित राहण्यास सांगितल्यामुळे अध्यक्षपदाच्या निवडीबाबतच्या हालचाली मोठ्या प्रमाणात सुरू असल्याचं दिसत आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.