

Karad, 28 February : भारतीय जनता पक्षाचे आमदार अतुल भोसले यांच्या महत्वकांक्षेला धक्का देत राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेच्या मदतीने निवडून आलेले कराडचे नगराध्यक्ष राजेंद्रसिंह यादव यांनी ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. नगरपालिकेच्या इतिहासात आतापर्यंत कोणालाही सूचला नसेल असा निर्णय घेऊन यादव यांनी आपल्या नगराध्यक्षपदाच्या इनिंगची अख्ख्या जिल्ह्याने दखल घ्यावी, अशी सुरुवात केली आहे.
कराड (Karad) नगरपालिकेची येत्या मंगळवारी पहिली सर्वसाधारण आणि अर्थसंकल्पीय सभा होणार आहे. नुकत्याच निवडून आलेल्या जनरल बॉडीची पहिली अर्थसंकल्पीय सभा आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार, राज्याचे पहिले मुख्यमंत्री (स्व.) यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतिस्थळी प्रीतिसंगमावर होणार आहे.
(स्व.) चव्हाण यांच्या समाधिस्थळाचे दर्शन घेऊन नगराध्यक्ष यादव आणि त्यांचे सहकारी आपल्या कारभाराची सुरुवात करणार आहेत, त्यासाठी प्रीतिसंगमावर मंडप उभारण्याचे काम सुरू आहे, याच ठिकाणी नगराध्यक्ष, मुख्य कार्यकारी अधिकारी आणि सर्व नगरसेवकांची आसन व्यवस्था करण्यात येत आहे. यादव यांनी घेतलेल्या या ऐतिहासिक निर्णयाची चर्चा आता सातारा (Satara) जिल्ह्यात रंगली आहे.
कराड नगरपालिका निवडणुकीत सत्ताधारी बलाढ्य भाजपशी यादव आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी दोन हात केले होते. माजी सहकार मंत्री बाळासाहेब पाटील आणि साताऱ्याचे विद्यमान पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी एकत्र येऊन राजेंद्रसिंह यादव यांना नगराध्यक्षपदाचे उमेदवार घाेषित केले होते.
आजी-माजी मंत्र्यांनी भाजपला रोखले
या निवडणुकीत भाजपने स्वबळावर निवडणूक लढवली होती. मात्र, त्यांना नगराध्यक्षपदासह पालिकेची सत्ता जिंकण्यात अपयश आले होते. कराड नगरपालिकेच्या ३१ जागांपैकी बाळासाहेब पाटील यांच्या नेतृत्वाखालील लोकशाही विकास आघाडीने १३ जागा जिंकल्या होत्या, तर शंभूराज देसाई यांच्या नेतृत्वातील यशवंत विकास आघाडीला ०७ जागा मिळाल्या होत्या. आमदार अतुल भोसलेंच्या नेतृत्वात भाजपने १० जिंकल्या होत्या.
आमदार अतुल भोसले यांच्यासह भाजप नेत्याच्या महत्वकांक्षेला आजी माजी मंत्र्यांनी मिळून कराडमध्ये वेसन घातली होती. तोच कित्ता पुढे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत गिरविण्यात आला होता. झेडपीच्या निवडणुकीत शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसने भाजपला २७ वर रोखून धरत या दोन्ही पक्षांनी ३५ जागा जिंकल्या आहेत. या आघाडीने जिल्हा परिषदेत बहुमतही मिळविले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.