

Kolhapur Hospital Loan Fraud: कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले तालुक्यात तब्बल ५ कोटी ७२ लाख रुपयांच्या आर्थिक फसवणुकीचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल आणि कॅन्सर रिसर्च सेंटर उभारण्यासाठी मंजूर झालेल्या कर्जातील रक्कम अपहार केल्याप्रकरणी पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, तिघांना अटक करण्यात आली आहे.
या प्रकरणातील फिर्यादी सेवानिवृत्त शिक्षक अण्णासाहेब बापूसाहेब चौगुले यांनी नव्या जागेत अत्याधुनिक मशीनरीसह मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल उभारण्याचा निर्णय घेतला होता. यासाठी २० कोटी रुपयांच्या कर्जाची आवश्यकता होती. त्यांचे पुत्र डॉ. संतोष चौगुले यांच्या माध्यमातून जुलै २०२१ मध्ये कोल्हापूर येथील वैभव पंडित यांच्यामार्फत सनदी लेखापाल सुशांत फडणीस यांच्याशी संपर्क झाला. फडणीस यांनी महात्मा गांधी चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून हॉस्पिटल चालवून देण्यासह कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेतून २० कोटी रुपयांचे कर्ज मंजूर करून देण्याचे आश्वासन दिले.
मात्र, बँकेने २० कोटींऐवजी साडेसात कोटी रुपयांचे कर्ज मंजूर केले. ही रक्कम हृदया हॉस्पिटलच्या खात्यावर जमा झाल्यानंतर त्यातील सुमारे ५ कोटी ७२ लाख रुपयांचा अपहार करण्यात आल्याचा आरोप आहे. तक्रारीनुसार, संशयित सुशांत फडणीस यांनी त्यातील पाच कोटी रुपये पत्नी शिल्पा फडणीस आणि भाऊ प्रांजल फडणीस यांच्या कंपनीच्या खात्यावर, तर उर्वरित रक्कम 'पावोस्टार सिनर्जी' या संबंधित कंपनीकडे वर्ग केली. मात्र, त्याबदल्यात हॉस्पिटलचे बांधकाम पूर्ण करण्यात आले नाही किंवा आवश्यक वैद्यकीय उपकरणेही उपलब्ध करून देण्यात आली नाहीत.
याबाबत वारंवार विचारणा केल्यानंतर संशयितांकडून उडवाउडवीची उत्तरे देण्यात आली. तसेच प्रांजल फडणीस याने चौगुले यांना, "पुन्हा आमच्या कार्यालयात आलात तर जिवंत सोडणार नाही," अशी धमकी दिल्याचाही आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. त्यानंतर आपली आर्थिक फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर चौगुले यांनी पोलिसांत धाव घेतली.
या प्रकरणी प्रांजल शरदचंद्र फडणीस, सतीश नारायण पोतदार आणि संतोष भगवान डकरे यांना आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागाने अटक केली आहे. तर शिल्पा सुशांत फडणीस आणि छबूबाई पिलाजी कुंजीर हे दोघे फरार असून त्यांचा शोध सुरू आहे. हातकणंगले पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास कोल्हापूर आर्थिक गुन्हे शाखेकडून सुरू आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.