

Solapur, 15 October : कर्नाटकात किती दुष्काळ आहे, हे आम्हाला माहिती नाही. महाराष्ट्रात प्रचंड दुष्काळ आहे, शेतकरी मोठ्या संकटात सापडले आहेत. पाच हजार रुपयांनी शेतकऱ्यांना काहीही मदत होणार नाही. सरकारकडे शेतकऱ्यांना द्यायला जर पैसे नसतील, तर शक्तीपीठ महामार्गासाठी कोठून पैसे आले? शेतकऱ्यांना दुष्काळ निधी वाढवून दिला पाहिजे. दुष्काळाला तोंड देण्यासाठी शेतकऱ्यांना मदत दिली पाहिजे, असे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे माजी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सांगितले.
शक्तीपीठ महामार्गाला सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा तीव्र विरोध आहे. त्याच्या परिणामबाबत जिल्हाधिकाऱ्यांना माहिती देण्यासाठी जयंत पाटील, सतेज पाटील, प्रणिती शिंदे, धैर्यशील मोहिते पाटील, अभिजीत पाटील, रामहरी रुपनवर, लक्ष्मण ढोबळे आदींनी त्यांची भेट घेतली. त्यानंतर माध्यमांशी बोलताना जयंत पाटील यांनी शेतकरी मदतीवरून सरकारवर निशाणा साधला.
ते म्हणाले, सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा शक्तीपीठ महामार्गाला गेल्या काही महिन्यांपासून सतत विरोध सुरू आहे. जबरदस्तीने मोजणी करणे, शेकडोंच्या संख्येने पोलिसांना घेऊन जाऊन शेतकऱ्यांना घेरणं आणि संमती नसतानाही त्याच्या जमिनीची मोजणी केली जात आहे. यामध्ये शेतकरी आत्महत्येपर्यंत जाऊनही पोलिस व महसूल यंत्रणा दाद नाही. याबाबत सोलापूर जिल्ह्यात गंभीर प्रश्न तयार झाले आहेत.
शेतकऱ्यांना घेऊन आम्ही सोलापूरच्या जिल्हाधिकारी यांची भेट घेऊन त्याचे गंभीर परिणाम त्यांना सांगितले. जिल्ह्यातील शक्तीपीठाची मोजणी ताबडतोब बंद करा. शेतकऱ्यांचा प्रतिकार किती मोठा आहे, राज्य सरकारला समजावून सांगा, अशी विनंती आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना केली आहे, असे जयंत पाटील यांनी स्पष्ट केले.
माजी मंत्री पाटील म्हणाले, शक्तीपीठ महामार्गाची जमीन अधिग्रहण करताना पोलिसच महसूल प्रशासनाचे काम करीत आहे. परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये म्हणून मोजणीच्या ठिकाणी थांबणं ठीक आहे. पण या ठिकाणी सही कर, तू तुझी जमीन दिलीच पाहिजे, असे पोलिसच सांगत आहेत.
पोलिसांनी महसूल कर्मचारी आणि शेतकऱ्यांना संरक्षण देणे गरजेचे आहे. पोलिसांनी ॲक्टिव्ह भूमिका घेणं म्हणजे हा सरकारी बळाचा दुरुपयोग आहे. शेतकऱ्यांची संमती नसताना महसूल विभागाकडून जमिनीची मोजणी केली जात आहे. त्यामुळेच या भागातील सर्व शेतकऱ्यांचा विरोध आहे, असेही पाटील यांनी नमूद केले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.