

Khadakwasla News : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर खडकवासला मतदारसंघात काँग्रेसने आतापासूनच मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. मागील निवडणुकीतील अपयश बाजूला ठेवून संघटन मजबूत करण्यासह मतदारांशी थेट संपर्क वाढवण्याचे आवाहन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी कार्यकर्त्यांना केले. त्यामुळे खडकवासला मतदारसंघात काँग्रेसने २०२९च्या विधानसभा निवडणुकीची तयारी आतापासूनच सुरू केल्याचे चित्र आहे.
खडकवासला विधानसभा मतदारसंघ काँग्रेस कमिटीच्या वतीने मंगळवारी कोंढवे-धावडे येथे काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या संकल्पनेतील ‘छात्रों की गूंज’ विद्यार्थी संवाद व जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात सपकाळ यांनी कार्यकर्त्यांना आगामी काळातील पक्षबांधणीची दिशा स्पष्ट केली.
“महापालिका निवडणुकीच्या काळात तहान लागल्यावर विहीर खोदण्याची वेळ आली. जे झाले ते झाले; आता मागील गोष्टी बाजूला ठेवून नव्या जोमाने पक्षबांधणीला सुरुवात केली पाहिजे. खडकवासला विधानसभा मतदारसंघात काँग्रेसचा ‘पंजा’ विजयी करण्यासाठी कार्यकर्त्यांनी आतापासूनच कामाला लागावे,” असे आवाहन सपकाळ यांनी केले.
‘छात्रों की गूंज’ अभियानाच्या माध्यमातून विद्यार्थिनींशी संपर्क वाढवण्याचेही काँग्रेसने लक्ष्य ठेवले आहे. खडकवासला मतदारसंघातून किमान एक हजार विद्यार्थिनी या उपक्रमात सहभागी झाल्या पाहिजेत, असे सपकाळ यांनी सांगितले. त्यासाठी कार्यकर्त्यांनी आपल्या घरातील मुली, नातेवाईक तसेच परिसरातील विद्यार्थिनींशी संपर्क साधून त्यांना अभियानाशी जोडावे, असे निर्देश त्यांनी दिले.
‘घोषणांनी पक्ष मजबूत होणार नाही’
“केवळ टाळ्या वाजवून किंवा ‘आगे बढो’च्या घोषणा देऊन पक्ष मजबूत होणार नाही. खडकवासला काँग्रेसमय झाला पाहिजे. विधानसभा २०२९ची निवडणूक लढवायची असेल, तर आत्तापासूनच लोकांशी संपर्क वाढवा, त्यांच्या प्रश्नांवर काम करा आणि पक्षाची संघटनात्मक ताकद वाढवा,” असे सपकाळ यांनी स्पष्ट केले.
खडकवासला मतदारसंघात शहराच्या विकासाशी संबंधित अनेक प्रश्न निर्माण झाले असून, या प्रश्नांवर नागरिकांशी जोडून घेत काम करण्याची गरज असल्याचेही त्यांनी सांगितले. अनेक वर्षांनंतर मतदारसंघात काँग्रेसची मोठी सभा झाली असून, या माध्यमातून पुन्हा पक्षबांधणी करण्याची संधी निर्माण झाली आहे. नागरिकांना काँग्रेसशी जोडण्यासाठी कार्यकर्त्यांनी सक्रिय होण्याचे आवाहन त्यांनी केले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.