

Kolhapur Election: विधानसभा निवडणुकीत कोल्हापूर जिल्ह्यात भाजपचे दोन आमदार, अलीकडे झालेल्या नगरपालिकेच्या निवडणुकीतही ३ नगरपालिका घेण्यास भाजपला यश मिळाले. या वाढलेल्या आत्मविश्वासामुळे भाजपने महायुतीमध्ये मोठ्या भावाचे स्थान मिळवले. भाजपने महायुतीच्या वाटाघाटीत ३६ जागा पदरात पाडून घेतल्या. याशिवाय शिवसेना आणि जनसुराज्य पक्षातूनही आपल्या काही कार्यकर्त्यांना तिकीट मिळवून दिले. सुमारे ४० जागांवर भाजपचे कार्यकर्ते निवडणूक लढवत आहेत. नाराजांची भूमिका, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यातील समन्वय यावरच भाजपचे यश अवलंबून असणार आहे. शिवाय काही जागांवर अपक्षांचा धोका भाजपला आहे.
काँग्रेसचा वारू रोखायचा असेल तर महायुतीमधील तिन्ही पक्षांनी एकत्र आल्याशिवाय पर्याय नाही, हे लक्षात आल्यामुळे सुरुवातीपासूनच भाजपने घटक पक्षांबरोबर युतीची बोलणी सुरू केली. शिवसेनेत (शिंदे गट) मोठ्या प्रमाणात प्रवेश झाल्याने त्यांनी सुरुवातीला ४० जागांवर दावा दाखल केला होता. मात्र, नंतर सर्वेक्षणांचे अहवाल, पक्षीय बलाबल यामुळे शिवसेनेला ३० जागांवर खाली आणण्यात भाजपला यश आले. मात्र, माजी नगरसेवकांची संख्या जास्त असूनही भाजपला जागा वाटपाच्या बैठकीत बरेच कष्ट करावे लागले. महायुतीमध्ये सर्वाधिक जागा घेण्यात भाजप धुरिणींना यश मिळाले असले तरी नाराजांची संख्याही भाजपकडे अधिक आहे. खासदार धनंजय महाडिक आणि उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी जागा वाटपाची सूत्रे प्रा. जयंत पाटील यांच्याकडे सोपवली होती. याचा राग काही पदाधिकाऱ्यांना आला.
महापालिकेवर पूर्वी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता होती. आता त्यांच्या अकार्यक्षमतेची मांडणी करायची म्हटले तर राष्ट्रवादी काँग्रेसमधील बहुतेक सर्व जण महायुतीत आहेत. त्यामुळे काँग्रेस विरोधात जनमत तयार करण्याचे आव्हान भाजपसमोर असणार आहे. पक्षाच्या अंतर्गत बैठकीत तो व्यक्तही झाला. मात्र, खासदार महाडिक आणि मंत्री पाटील यांना पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची मने वळवण्यात शेवटी यश आले. यातील काही कार्यकर्त्यांचा त्या त्या परिसरातील मतदारांवर प्रभाव आहे.
विकासकामांची भाजपला साथ विमानतळ विस्तारीकरण, अमृत योजना, उपनगरात केलेले रस्ते अशी अनेक विकासकामे आमदार राजेश क्षीरसागर आणि अमल महाडिक यांच्या माध्यमातून गेल्या वर्षभरात शहरात झाली आहेत. हे भाजपचे बलस्थान असून, या कामांच्या जोरावर भाजपचे उमेदवार जनतेकडे मते मागू शकतात. तसेच केंद्रात आणि राज्यात सत्ता असल्याने निधीची कमतरता पडणार नाही, अशी भावनिक सादही ते घालू शकतात.
अशा कार्यकर्त्यांची बैठक घेऊन खासदार महाडिक आणि आमदार अमल महाडिक यांनी त्यांची समजूत काढली. त्यामुळे अपक्ष म्हणून अर्ज भरलेल्या काही कार्यकर्त्यांनी अर्ज मागे घेतले. त्यामुळे संभाव्य बंडखोरी थांबविण्यात भाजप नेत्यांना यश आले खरे; पण, नाराज कार्यकर्त्यांनी प्रत्यक्ष निवडणुकीत पडद्यामागे विरोधात काम केले तर मात्र त्याची किंमत महायुतीच्या उमेदवारांना चुकवावी लागणार आहे. नाराजांना पक्षाच्या प्रचारात सक्रिय करण्याचे मोठे आव्हान भाजपसमोर आहे.
भाजपने उमेदवारांची निवड करताना सतर्कता बाळगली आहे. स्थानिक भागात प्रभाव असणारे, स्वतःचे गठ्ठा मतदान असणारे आणि साम-दाम-दंड-भेद या नीतीचा अवलंब करू शकणारे उमेदवार पक्षाने दिले आहेत. त्यामुळे महायुतीमधील अन्य दोन पक्षांच्या तुलनेत भाजपचा जिंकण्याचा 'स्ट्राईक रेट' जास्त असेल, असा अंदाज राजकीय वर्तुळात वर्तवला जात आहे. सध्यातरी भाजप व मित्र पक्षातील समन्वय दिसत आहे. मात्र, हा समन्वय मतदानादिवशीपर्यंत टिकेल हे पाहणे भाजप नेत्यांनाच करावे लागणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.