

Koyna Dam : मुंबईची तहान भागवण्यासाठी आता राज्य सरकार कोयना धरणाचं ६७ टीएमसी पाणी मुंबईला नेण्याच्या तयारीत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली याबाबत चर्चा झाली आहे. मात्र, या प्रस्तावाला पश्चिम महाराष्ट्रातून विरोध होऊ लागला आहे. सातारा, सांगलीसह पश्चिम महाराष्ट्रातील दुष्काळी भागाला पाण्याची गरज असताना कोयनेचं पाणी मुंबईला कशासाठी द्यायचं, असा सवाल उपस्थित केला जात आहे.
पण मुळात ६७ टीएमसी पाणी कोणते आहे? हे पाणी मुंबईला नेलं तर पश्चिम महाराष्ट्रातील शेतकर्यांच्या वाट्याचं पाणी कमी होणार आहे का? सरकारच्या म्हणण्यानुसार, अरबी समुद्राला मिळणारं हे पाणी मुंबईकडे वळवण्यात येत आहे. पण मग हे पाणी पुन्हा कोयना धरणात आणता येऊ शकतं का? आणि त्यासाठी किती खर्च येणार आहे? सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे, मुंबईला पाणी देण्याच्या प्रस्तावाला विरोध करणाऱ्या नेत्यांच्या मागणीमागचं तांत्रिक आणि आर्थिक गणित काय आहे?
आज आपण हे सगळं सविस्तर समजून घेणार आहोत...
सगळ्यात आधी कोयना धरणाची रचना आधी समजून घेऊ. कोयना धरण सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यात आहे. महाबळेश्वर येथून उगम पावणाऱ्या कोयना नदीवर हे धरण बांधलं आहे. महाराष्ट्राच्या जलसिंचन आणि वीजनिर्मितीच्या दृष्टीने हे धरण अत्यंत महत्त्वाचं आहे. कोयना धरणामुळे निर्माण झालेल्या जलाशयाला शिवसागर जलाशय असं म्हटलं जातं. नैसर्गिकरीत्या कोयनेचे पाणी पूर्वेकडे कृष्णा नदीच्या खोऱ्यात जातं.
मात्र, कोयना जलविद्युत प्रकल्पासाठी सह्याद्रीच्या डोंगररांगेचा आणि पूर्व-पश्चिम बाजूच्या उंचीतील फरकाचा उपयोग करण्यात आला आहे. धरणातील पाणी बोगद्यांमधून सह्याद्रीच्या पश्चिमेकडे नेलं जातं. उंचावरून खाली पडणाऱ्या पाण्याच्या शक्तीचा वापर करून टर्बाइन फिरवल्या जातात आणि त्यातून वीजनिर्मिती होते. या प्रक्रियेनंतर पाणी कोकणाच्या दिशेने वाहतं. चिपळूण तालुक्यातील पोफळी परिसरातून वाहणारं पाणी वाशिष्ठी नदीला आणि पुढे अरबी समुद्राला मिळतं. अनेक दशकांपासून कोयना जलविद्युत प्रकल्पात ही प्रक्रिया सुरू आहे.
आता मुंबईला ६७ टीएमसी पाणी देण्याचा सध्याचा प्रस्ताव नेमका कोणत्या पाण्यासाठी आहे, हे समजून घेणं महत्त्वाचं आहे.
कोयना धरणाची पाणी साठवण क्षमता १०५ टीएमसी आहे. त्यापैकी दरवर्षी सुमारे ६७ टीएमसी पाणी विद्युत निर्मितीसाठी वापरले जाते. यातील सुमारे २७ टीएमसी पाणी पावसाळ्यात धरण भरत असताना वापरले जाते. पावसाळा संपल्यानंतर धरणातील साठ्यापैकी सुमारे ४० ते ४२ टीएमसी पाणी विद्युत निर्मितीसाठी सोडले जाते. याशिवाय ४२.७ टीएमसी पाणी सिंचन योजनांसाठी वापरले जाते, तर सुमारे सात ते आठ टीएमसी पाण्याचे वाष्पीभवन होते
राज्य सरकारच्या प्रस्तावानुसार, वीजनिर्मितीसाठी वापर झाल्यानंतर अरबी समुद्राच्या दिशेने वाहणारं ६७ टीएमसी पाणी मुंबईच्या पाणीपुरवठ्यासाठी वापरण्याचा विचार आहे. म्हणजेच, सध्या कृष्णा नदीत सोडण्यात येणारं आणि सातारा-सांगलीच्या शेतकऱ्यांकडून सिंचनासाठी वापरण्यात येणारं पाणी थेट मुंबईकडे वळवण्याचा हा प्रस्ताव नाही. हा या संपूर्ण वादातील अत्यंत महत्त्वाचा फरक आहे.
आता ६७ टीएमसी म्हणजे किती पाणी?
तर एक टीएमसी म्हणजे सुमारे २८३२ कोटी लिटर पाणी. ६७ टीएमसी म्हणजे जवळपास एक लाख ९० हजार कोटी लिटर पाणी. वर्षभराचा विचार केला तर दररोज सरासरी सुमारे ५२० कोटी लिटर पाणी एवढं त्याचं प्रमाण होतं. या पाण्यातून १० हजार लिटर क्षमतेचे तब्बल ५ लाख २० हजार टँकर भरता येऊ शकतात.
आता हे पाणी मुंबईला किती दिवस पुरू शकते? तर मुंबईची सध्याची दररोजची पाण्याची मागणी ४६६ कोटी लिटरच्या आसपास आहे. या हिशेबाने कोयनेचं एकट्या वर्षातील ६७ टीएमसी पाणी संपूर्ण मुंबईला १३ महिने पुरू शकते. म्हणजे वर्षभर पुरून उरेल इतके हे पाणी आहे. याच आकडेवारीवरून हा प्रस्ताव किती मोठा आहे, याची कल्पना येऊ शकते.
मग हे पाणी पश्चिम महाराष्ट्राच्या हक्काचं आहे का?
याच मुद्द्यावर सध्या सर्वाधिक वाद सुरू आहे. सध्याच्या व्यवस्थेनुसार वीजनिर्मितीसाठी पश्चिमेकडे सोडलं जाणारं पाणी सातारा आणि सांगलीतील सिंचनासाठी थेट वापरलं जात नाही. त्यामुळे मुंबईला पाणी देण्याचा प्रस्ताव म्हणजे पश्चिम महाराष्ट्राला सध्या मिळणारं ६७ टीएमसी सिंचनाचं पाणी काढून घेणं, असा अर्थ लावणं योग्य ठरणार नाही.
पण हे समुद्राला जाणारं पाणी पुन्हा कोयना धरणात आणता येईल का? हा या संपूर्ण विषयातील सर्वांत महत्त्वाचा तांत्रिक मुद्दा आहे.
खरंतर ही मागणी नवीन नाही. दिवंगत आमदार अनिल बाबर यांनी चार-पाच वर्षांपूर्वी हा प्रस्ताव मांडला होता. कोयना धरणातून तब्बल ६७ टीएमसी पाणी समुद्राला सोडणे योग्य नाही. हे पाणी पुन्हा उपसून सिंचनासाठी उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी त्यांनी जाहीरपणे केली होती. मात्र, त्यावेळी दुष्काळाऐवजी महापुराचे संकट होते. त्यामुळे या प्रस्तावावर गांभीर्याने चर्चा झाली नाही. आता दुष्काळी परिस्थिती निर्माण झाल्याने या विषयाला पुन्हा महत्त्व प्राप्त झाले आहे.
कोयना धरणातून वीजनिर्मितीसाठी सोडण्यात येणारं पाणी सह्याद्रीच्या पश्चिम बाजूला मोठ्या उंचीवरून खाली येतं. संबंधित जलमार्गानुसार हा उंचीतील फरक बदलतो. आता हेच पाणी पुन्हा शिवसागर जलाशयात आणायचं असेल, तर त्यासाठी सुमारे ४०० मीटर उंचीवर पाणी उपसण्याचा विचार करावा लागेल. हे काम साध्या पाणीपुरवठा योजनेसारखं नाही. त्यासाठी मोठ्या क्षमतेचे विद्युत पंप, प्रचंड आकाराच्या जलवाहिन्या, बोगदे, पाणी साठवण्यासाठी आवश्यक सुविधा आणि मोठ्या प्रमाणावर वीज लागेल.
‘सकाळ’मध्ये प्रकाशित झालेल्या वृत्तानुसार, पाणी पुन्हा शिवसागर जलाशयात आणण्याच्या सुमारे दीड हजार कोटी रुपयांच्या प्रस्तावाची चर्चा आहे. या क्षेत्रातील तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, १० टीएमसी पाणी पुन्हा शिवसागर जलाशयात आणण्यासाठी किमान ७०० ते ८०० कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. सध्याची गरज लक्षात घेता २० टीएमसी पाणी 'लिफ्ट' करायचे झाल्यास सुमारे दीड हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करावी लागेल.
याशिवाय पाणी उपसण्यासाठी लागणाऱ्या विजेचा खर्च वेगळाच. म्हणजे ज्या पाण्यापासून वीज तयार केली, तेच पाणी पुन्हा वर नेण्यासाठी विजेचा वापर करावा लागेल. जलसंपदा विभागाचे निवृत्त मुख्य अभियंता हनुमंत गुणाले यांनी कोयना धरणातून विद्युत निर्मितीसाठी सोडलेले पाणी पुन्हा जलाशयात आणण्याचा प्रकल्प आर्थिकदृष्ट्या परवडणारा नसल्याचे मत 'सकाळ'शी बोलताना व्यक्त केले.
"जितके पाणी खाली सोडून एक युनिट वीज निर्माण होते, तितकेच पाणी पुन्हा जलाशयात आणण्यासाठी सव्वा युनिट वीज लागते. मग बात फायदा कसला? त्याऐवजी दुष्काळासारख्या परिस्थितीत आवश्यक तेवढीच वीज निर्मिती करून उर्वरित पाणी सिंचनासाठी देणे हा उपाय आहे. आम्ही २०१५ मध्ये तब्बल १५ टीएमसी पाणी सिंचनाकडे वळवले होते. ते शक्य आहे, असंही गुणाले यांनी सांगितलं होतं.
पंपांच्या कार्यक्षमतेतील मर्यादा आणि जलवाहिन्यांमधील ऊर्जेची हानी लक्षात घेतली तर हा खर्च आणखी वाढू शकतो. त्यामुळे केवळ प्रकल्प उभारण्याचा खर्च मोजून चालणार नाही. दरवर्षी पाणी उपसण्यासाठी किती वीज लागणार, त्यासाठी किती पैसे खर्च करावे लागणार आणि त्या बदल्यात किती क्षेत्र सिंचनाखाली येणार, हेही तपासावं लागेल.
शिवाय एकीकडे टेंभू, ताकारी, म्हैसाळ योजनांचे पंप दुरुस्त करण्यासाठी, त्यांची क्षमता वाढविण्यासाठी किंवा नवीन पंप खरेदी करण्यासाठी पुरेसा निधी उपलब्ध नाही. सांगलीतील शेरीनाल्याचे सांडपाणी कृष्णा नदीत मिसळू नये, यासाठीच्या योजनेला ९७ कोटी रुपये उपलब्ध होत नाहीत. अशा परिस्थितीत दीड हजार कोटी रुपयांची व्यवस्था कशी होणार, हा प्रश्न आहे. अर्थात, अशा मोठ्या प्रकल्पांसाठी जागतिक बैंक अर्थसाहाय्य देण्यास तयार असते, हेही नाकारता येणार नाही.
पाणी खाली सोडण्याऐवजी धरणातच ठेवलं तर?
आता पश्चिम महाराष्ट्रातील जल अभ्यासकांकडून मांडण्यात येणारा दुसरा पर्याय पाहूया. वीजनिर्मितीनंतर पाणी पुन्हा ४०० मीटर उंचीवर उपसण्यापेक्षा दुष्काळाच्या काळात वीजनिर्मितीसाठी सोडण्यात येणारं पाणी कमी करायचं आणि ते धरणातच साठवून ठेवायचं. आवश्यकतेनुसार ते पूर्वेकडील सिंचनासाठी वापरण्याचा हा पर्याय आहे.
या पर्यायाचा फायदा असा की, एकदा खाली गेलेलं पाणी पुन्हा वर आणण्यासाठी प्रचंड वीज खर्च करण्याची गरज पडणार नाही. मात्र, याचीही दुसरी बाजू आहे. कोयना जलविद्युत प्रकल्प महाराष्ट्राच्या वीज व्यवस्थेसाठी महत्त्वाचा आहे. विजेची मागणी अचानक वाढली तर जलविद्युत प्रकल्पातून तुलनेने लवकर वीज उपलब्ध करता येते.
शिवाय कोयना प्रकल्पातून रात्रीच्या वेळी होणारी विद्युत निर्मिती महावितरणच्या वीज व्यवस्थेसाठी अत्यावश्यक आहे. त्यामुळे जलविद्युत निर्मिती कमी करण्याचा निर्णय घेताना तर महाराष्ट्राच्या विजेच्या उपलब्धतेवर काय परिणाम होईल? पर्यायी वीज कुठून आणणार? ती किती खर्चिक असेल? आणि वीज ग्राहकांवर त्याचा भार पडणार का? याचाही अभ्यास करावा लागेल.
मुंबईला कोयनेचं पाणी नेणं तरी कितपत व्यवहार्य आहे?
पश्चिम महाराष्ट्राकडे पाणी पुन्हा आणणं खर्चिक आहे, याचा अर्थ मुंबईला पाणी नेणं स्वस्त आहे, असा होत नाही. कोयना प्रकल्पातून बाहेर पडणारं पाणी कोकणाच्या दिशेने जातं. मुंबईपर्यंत पाणी पोहोचवण्यासाठी मोठ्या अंतराची जलवाहिनी उभारावी लागेल. कोकणचा डोंगराळ भूभाग, नद्या, खाड्या, वनक्षेत्र, बोगदे, भूसंपादन, पाणी साठवणूक आणि शुद्धीकरण या सगळ्यांचा विचार करावा लागेल.
शिवाय वीजनिर्मिती वर्षभर एकाच प्रमाणात होत नाही. त्यामुळे त्यातून मिळणारं पाणीही सातत्याने समान प्रमाणात उपलब्ध होईलच असं नाही. या गोष्टींचा मेळ कसा घालणार, हा प्रस्तावित योजनेतील महत्त्वाचा तांत्रिक प्रश्न आहे. त्यामुळे मुंबईच्या प्रस्तावाचा सविस्तर प्रकल्प अहवाल तयार झाल्याशिवाय हा पर्याय किती स्वस्त किंवा महाग आहे, हे निश्चित सांगता येणार नाही.
पश्चिम महाराष्ट्रातील नेत्यांचा विरोध नेमका कशासाठी?
सांगली, सातारा आणि सोलापूरच्या अनेक भागांमध्ये पाण्याचा प्रश्न आजही गंभीर आहे. माण, खटाव, आटपाडी, जत, कवठेमहांकाळ यांसारख्या भागांसाठी शाश्वत पाणीपुरवठ्याची गरज आहे. टेंभू, म्हैसाळ, ताकारी आणि इतर उपसा सिंचन योजनांच्या माध्यमातून दुष्काळी भागाला पाणी देण्याचे प्रयत्न झाले आहेत.
या पार्श्वभूमीवर पश्चिम महाराष्ट्रातील नेते आणि जल अभ्यासक सवाल उपस्थित करत आहेत की, आपल्या भागातील सिंचनाच्या गरजा अद्याप पूर्ण झालेल्या नाहीत, तर कोयनेच्या पाण्याचा भविष्यातील वापर मुंबईसाठीच का निश्चित करायचा? कारण एकदा मुंबईसाठी या पाण्याचं कायमस्वरूपी नियोजन झालं तर पश्चिम महाराष्ट्रासाठी भविष्यात उपलब्ध होऊ शकणारा पर्याय बंद होणार का, अशी त्यांची चिंता आहे.
पाणीवाटपाचं राजकारण आणि सरकारसमोरील आव्हान
पुढील ५० वर्षांतील मुंबईच्या पाणीपुरवठ्याचं नियोजन करण्याची सरकारची भूमिका आहे. दुसरीकडे पश्चिम महाराष्ट्रातील नेते आपल्या भागातील पुढील ५० वर्षांच्या पाणी आणि सिंचनाच्या गरजांचाही विचार करण्याची मागणी करत आहेत. त्यामुळे सरकारसमोर आता केवळ नवीन पाणीपुरवठा योजना उभारण्याचं आव्हान नाही. विविध भागांच्या पाण्याच्या गरजांमध्ये समतोल साधण्याचंही आव्हान आहे.
मुंबईला पाणी देण्यापूर्वी कृष्णा खोऱ्यातील दीर्घकालीन पाणीवाटपाचा अभ्यास करावा, अशी मागणी सातारा-सांगलीतून होत आहे. त्याच वेळी, वीजनिर्मितीनंतर पश्चिमेकडे जाणाऱ्या पाण्याचा अधिक प्रभावी वापर करण्याची संधी उपलब्ध आहे का, हे तपासण्याची गरजही नाकारता येणार नाही. सध्याच्या घडीला हा प्रस्ताव विचाराधीन आहे. तो अमलात आला आहे किंवा पश्चिम महाराष्ट्राच्या सिंचनाच्या वाट्यात कपात करण्याचा निर्णय झाला आहे, अशी परिस्थिती नाही.
एकूणच काय तर कोयनेच्या पाण्यावरून सुरू असलेला वाद समजून घेताना एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. मुंबईला नेण्याचा प्रस्ताव असलेलं ६७ टीएमसी पाणी हे आज पश्चिम महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या शेतात जाणारं पाणी नाही. ते वीजनिर्मितीनंतर कोकणाच्या दिशेने वाहणारं पाणी आहे. हे पाणी पुन्हा ४०० मीटर उंचीवर उपसून कोयना धरणात आणणं खर्चिक आहे.
वीजनिर्मिती कमी करण्याच्या पर्यायाचेही आर्थिक परिणाम आहेत. मुंबईला पाणी नेण्याचा प्रस्तावदेखील मोठ्या गुंतवणुकीचा आहे. त्यामुळे प्रश्न केवळ मुंबईला पाणी द्यायचं की पश्चिम महाराष्ट्राला, एवढाच मर्यादित नाही. उपलब्ध पाण्याचा सर्वाधिक कार्यक्षम, आर्थिकदृष्ट्या व्यवहार्य, पर्यावरणपूरक आणि न्याय्य वापर कसा करता येईल, हा खरा प्रश्न आहे.
या सगळ्या पर्यायांचा तुलनात्मक अभ्यास सार्वजनिक केल्यानंतरच कोयनेच्या पाण्याबाबत कोणता निर्णय घ्यायचा, यावर अर्थपूर्ण चर्चा होऊ शकते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.