Shivendra Raje Bhosale : कोयनेच्या पाण्यावरून वाद : शशिकांत शिंदे सरकारवर तुटून पडताच शिवेंद्रराजेंकडून मुख्यमंत्र्यांची पाठराखण; 'सत्ता अन् पालकमंत्रीपद'

Koyna Water Diversion Political Controversy : कोयनेचे पाणी मुंबईला वळवण्याच्या प्रस्तावावरून महाराष्ट्रात राजकीय वाद पेटला असून, सातारा जिल्ह्यातील सिंचन प्रकल्पांच्या मुद्द्यावरून शशिकांत शिंदे आणि शिवेंद्रराजे भोसले यांच्यात आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत.
Koyna Water Diversion Political Controversy; Shivendra Raje Bhosale, Devendra Fadnavis And Shashikant Shinde
Koyna Water Diversion Political Controversy; Shivendra Raje Bhosale, Devendra Fadnavis And Shashikant ShindeSarkarnama
Published on: 
Updated on: 

Satara News : मुंबईसह महानगर क्षेत्रातील वाढती लोकसंख्या आणि भविष्यातील पाण्याची गरज लक्षात घेऊन राज्य सरकारने जलस्रोतांच्या अधिक प्रभावी वापरासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत मुंबईच्या पाणीपुरवठ्यासाठी कोयनेच्या पाण्याचा वापर करण्याच्या प्रस्तावावर चर्चा करण्यात आली. कोयना जलविद्युत प्रकल्पातून वीजनिर्मितीनंतर कोकणमार्गे समुद्राकडे वाहून जाणारे सुमारे ६७ टीएमसी पाणी मुंबईला उपलब्ध करून देण्याचा प्रस्ताव सरकारच्या विचाराधीन आहे.

मात्र, या प्रस्तावामुळे आता राजकीय वातावरण तापले असून सातारा आणि सांगली जिल्ह्यांतील भविष्यातील पाणीहक्कांवर गदा येण्याची भीती स्थानिक नेत्यांकडून व्यक्त केली जात आहे. नागरिक जागृती मंचानेही या प्रस्तावाला विरोध दर्शवला आहे. सखोल अभ्यास केल्याशिवाय या योजनेला मंजुरी देऊ नये, अशी मागणी मंचाने केली असून, अन्यथा आंदोलन छेडण्याचा इशाराही दिला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी खासदार संजयकाका पाटील यांनीही या प्रस्तावावर नाराजी व्यक्त केली आहे. 'कोयनेचे पाणी मुंबईला नेणार असाल, तर इथल्या शेतकऱ्यांनी आपली शेती विकून मुंबईला जायचं का?' असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. तर माजी जलसंपदा मंत्री (कृष्णा खोरे) शशिकांत शिंदे यांनी कोयनेच्या धर्तीवर सातारा जिल्ह्यातील सोळशी धरणाचा निर्णय घेण्याचे आवाहन सरकारला केले आहे.

Koyna Water Diversion Political Controversy; Shivendra Raje Bhosale, Devendra Fadnavis And Shashikant Shinde
Koyna Water : कोयनेचं पाणी मुंबईला देण्याच्या चर्चेला पूर्णविराम? मुख्यमंत्री फडणवीसांचा खुलासा; म्हणाले, 'कुठलंही पाणी...'

सातारा जिल्ह्यात मोठी धरणे असूनही 'धरण उशाला आणि कोरड घशाला' अशी परिस्थिती असल्याची टीका शशिकांत शिंदे यांनी यापूर्वीही केली आहे. नोव्हेंबर २०२६ मध्ये राज्यातील दुष्काळी परिस्थिती आणि धरणांतील पाणी नियोजनावरून त्यांनी सरकारला सवाल केले होते. आता कोयनेचे पाणी मुंबईकडे वळवण्याच्या प्रस्तावावर फेरविचार करण्याचा सल्ला काँग्रेस आमदार विश्वजीत कदम यांनीही सरकारला दिला आहे.

सांगली, सातारा आणि सोलापूर जिल्ह्यांतील नागरिकांच्या पाण्यावरील हक्काचा विचार करावा, अशी मागणी विश्वजीत कदम यांनी सोशल मीडियावरील पोस्टमधून केली आहे. तसेच ताकारी, टेंभू आणि म्हैसाळ यांसारख्या सिंचन योजनांच्या भवितव्याचा विचार करूनच सरकारने निर्णय घ्यावा, असेही त्यांनी म्हटले आहे.

शिवेंद्रराजेंचा शशिकांत शिंदेंना सवाल

कोयनेचे पाणी मुंबईला वळवण्यावरून सुरू असलेल्या वादात राज्याचे बांधकाम मंत्री आणि भाजप आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनीही उडी घेतली आहे. सोळशी धरणाचा निर्णय घेण्याचे आवाहन करणाऱ्या शशिकांत शिंदे यांना त्यांनी थेट सवाल केला आहे. 'तुमच्याकडे सत्ता, कृष्णा खोरे विकास महामंडळ आणि जिल्ह्याचे पालकमंत्रीपद असताना सोळशी आणि जावळी तालुक्यातील बोंडारवाडी धरण का मार्गी लागले नाही?' असा प्रश्न शिवेंद्रराजे यांनी उपस्थित केला.

कोयना धरणातून वीजनिर्मिती झाल्यानंतर कोकणातून पुढे समुद्राला मिळणारे पाणी मुंबईकडे वळवण्याचे मुख्यमंत्र्यांचे नियोजन योग्य असल्याचे समर्थनही शिवेंद्रराजे यांनी केले. समुद्रात वाहून जाणाऱ्या पाण्याचा मुंबईसाठी उपयोग करण्याच्या निर्णयात काहीही चुकीचे नसल्याचे सांगत त्यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या प्रस्तावाचे समर्थन केले.

हा निर्णय धाडसी आणि योग्य असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. या प्रस्तावाला मंत्री हसन मुश्रीफ यांनीही सहमती दर्शवली आहे. मुंबई ही राज्याची आणि देशाची आर्थिक राजधानी असून, तिची लोकसंख्या आणि पाण्याची गरज सातत्याने वाढत आहे. भविष्याचा विचार करून घेतलेला हा निर्णय महत्त्वाचा असून, प्रकल्प लवकरात लवकर कार्यान्वित व्हावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

माण-खटाव भागाला पाणी मिळाले नसल्याच्या टीकेवर बोलताना मुश्रीफ यांनी उरमोडी प्रकल्पाचा दाखला दिला. उरमोडीचे पाणी माण-खटाव भागात पोहोचल्यामुळे तेथील शेतकरी बागायतदार झाले असून, अजिंक्यतारा साखर कारखान्याला त्या भागातून ऊस येत असल्याचे त्यांनी सांगितले.

Koyna Water Diversion Political Controversy; Shivendra Raje Bhosale, Devendra Fadnavis And Shashikant Shinde
Koyna Water Dispute : सतेज पाटील 'गोकुळ'नंतर कोयनेच्या पाण्यासाठी रस्त्यावर उतरणार? फडणवीस सरकारला थेट इशारा, म्हणाले "आमच्या हक्काचं पाणी..."

सोळशी, बोंडारवाडी धरणांबाबत सरकार सकारात्मक

सोळशी धरण प्रकल्प बासनात गुंडाळून ठेवलेला नाही किंवा नाकारलेलाही नाही. या प्रकल्पाची शासकीय प्रक्रिया सुरू असल्याची माहिती शिवेंद्रराजे भोसले यांनी दिली. सातारा जिल्ह्यातील सोळशी आणि बोंडारवाडी यांसारख्या सिंचन प्रकल्पांबाबत महायुती सरकार सकारात्मक असून, स्थानिक विरोध मावळल्यानंतर हे प्रकल्प पूर्ण करण्यासाठी मुख्यमंत्री स्वतः लक्ष घालत असल्याची ग्वाही त्यांनी दिली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.