

Pune News : लोणी काळभोर येथील प्रसिद्ध 'जगदंबा' हॉटेलमध्ये जेवणाच्या बिलावरून झालेल्या वादाचे रूपांतर तुफान हाणामारीत झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणात लोणी काळभोरचे माजी सरपंच राहुल काळभोर आणि त्याच्या तीन साथीदारांवर हॉटेल मालक, त्यांचे कुटुंबीय आणि कामगारांना मारहाण केल्याचा आरोप आहे. आरोपींनी हॉटेलमध्ये तोडफोड करत काचेचे भांडे फेकून मारल्याने हॉटेल मालक राजेंद्र चौधरी जखमी झाले आहेत. एवढेच नव्हे, तर पोलीस ठाण्यातून परतणाऱ्या फिर्यादीच्या मुलालाही रस्त्यात अडवून मारहाण करण्यात आली. याप्रकरणी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात राहुल दत्तात्रय काळभोर याच्यासह चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बिलाची विचारणा करताच शिवीगाळ
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ९ नोव्हेंबर २०२६ रोजी रात्री सुमारे ९ वाजण्याच्या सुमारास कदमवाकवस्ती येथील एन्जेल हायस्कूलजवळ असलेल्या 'जगदंबा' हॉटेलमध्ये हा प्रकार घडला. राजेंद्र चौधरी (वय ५६) हे गेल्या ३० वर्षांपासून हे हॉटेल चालवत आहेत. घटनेच्या रात्री रामचंद्र ऊर्फ रामभाऊ दत्तात्रय काळभोर हा जेवणासाठी हॉटेलमध्ये आला होता. जेवण झाल्यानंतर त्याने ऑनलाइन पद्धतीने बिलाचे पैसे भरले आणि 'माझे बिल आले का?' अशी विचारणा केली. त्यावर हॉटेल मालक राजेंद्र चौधरी यांनी बिल जमा झाल्याचे सांगितले. मात्र, त्यानंतर रामचंद्र काळभोर याने कोणतेही कारण नसताना अश्लील भाषेत शिवीगाळ करण्यास सुरुवात केली.
वाद मिटवण्यासाठी आलेल्या मुलालाही मारहाण
हॉटेलमध्ये सुरू असलेला गोंधळ ऐकून राजेंद्र चौधरी यांचा मुलगा मयूर चौधरी (वय २२) तेथे आला. त्याने रामचंद्र काळभोर याला समजावून वाद मिटवण्याचा प्रयत्न केला. मात्र, रामचंद्रने मयूरलाही शिवीगाळ करत धक्काबुक्की आणि मारहाण केली. त्यानंतर मयूरने त्याला हॉटेलच्या बाहेर काढले.
माजी सरपंच राहुल काळभोरची एन्ट्री; हॉटेलमध्ये तुफान राडा
पहिल्या वादानंतर काही मिनिटांतच रामचंद्रचा भाऊ आणि लोणी काळभोरचा माजी सरपंच राहुल दत्तात्रय काळभोर हा स्वप्निल काळभोर आणि विकास काळभोर यांच्यासह हॉटेलमध्ये आला. चौघांनी हॉटेलमध्ये प्रवेश करून मालक राजेंद्र चौधरी आणि तेथील कामगारांना मारहाण करण्यास सुरुवात केली.
या मारहाणीदरम्यान स्वप्निल काळभोर याने हॉटेलच्या काउंटरवर ठेवलेले बडीशेपचे काचेचे भांडे उचलून राजेंद्र चौधरी यांच्या तोंडावर फेकून मारले. यामध्ये चौधरी जखमी झाले. तसेच भांडण सोडवण्यासाठी पुढे आलेले हॉटेलमधील ग्राहक दीपक कुकरेजा आणि कामगार मिराज ऊर्फ शमामुल अन्सारी यांनाही आरोपींनी मारहाण केल्याचे फिर्यादीत नमूद आहे.
पोलीस ठाण्यातून परततानाही रस्त्यात अडवून मारहाण
हॉटेलमधील प्रकारानंतर मयूर चौधरी आणि त्याचा चुलत भाऊ ओम चौधरी हे घटनेची माहिती देण्यासाठी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात गेले. तक्रार देऊन दोघे हॉटेलच्या दिशेने परतत असताना, हॉटेलजवळील डॉमिनोज पिझ्झा दुकानासमोर आरोपींनी त्यांना पुन्हा गाठले.
राहुल काळभोर, रामचंद्र काळभोर, स्वप्निल काळभोर आणि विकास काळभोर यांनी दोघांना रस्त्यात अडवून शिवीगाळ करत मारहाण केल्याचा आरोप आहे. या संपूर्ण प्रकरणी राजेंद्र चौधरी यांच्या फिर्यादीवरून लोणी काळभोर पोलीस ठाण्यात राहुल दत्तात्रय काळभोर, रामचंद्र ऊर्फ रामभाऊ दत्तात्रय काळभोर, स्वप्निल काळभोर आणि विकास काळभोर या चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.