Phaltan News : माढा लोकसभा मतदारसंघाचे भाजपचे विद्यमान खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर आणि अजित पवार गटाचे नेते रामराजे नाईक-निंबाळकर यांच्यातील संघर्ष सर्वांनाच माहित आहे. माढ्यातील उमेदवारीसाठी या दोन्ही निंबाळकरांमध्ये जोरदार रस्सीखेच सुरु आहे. त्यातच खासदार निंबाळकरांचा स्वीय सहायक मितेश उर्फ काका खराडे रामराजेंच्या गळाला लागला आहे. त्यांनी अजित पवार राष्ट्रवादीत प्रवेश केल्याने खासदारांना दणका बसला आहे. तर आता माढ्यात चुरस वाढणार असल्याचे दिसत आहे.
भाजपचे विद्यमान खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी पुन्हा एकदा माढ्यातून उमेदवारी मिळावी म्हणून फिल्डिंग लावली आहे. तर राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते रामराजे नाईक-निंबाळकर यांनी विद्यमान खासदारांना उमेदवारी मिळू नये तसेच त्यांचे बंधू संजीवराजे यांना अजित पवार गटातून उमेदवारी मिळावी यासाठी कंबर कसली आहे.
या दोन्ही निंबाळकर घराण्याचे राजकीय वैर सर्वपरिचित आहे. त्यामुळे एकमेकांना शह देण्यासाठी दोन्ही घराणे एकही संधी सोडत नाहीत. अशातच विद्यमान खासदार निंबाळकरांचे स्वीय सहायक रामराजेंच्या गळाला लागले असून त्यांनी संजीवराजेंच्या उपस्थितीत अजित पवार राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. यामुळे खासदारांना दणका बसला आहे तर रामराजेंच्या रणनीतीत नवीन वजीर सामील झाला आहे.
मितेश उर्फ काका खराडे यांनी संजीवराजे यांच्या उपस्थितीत फलटण येथे राष्ट्रवादीत जाहीर प्रवेश केला. यावेळी माजी उपनगराध्यक्ष नितीन भोसले, माजी नगरसेवक किशोर नाईक निंबाळकर, भाऊसो कापसे, श्रीराम कारखान्याचे संचालक महादेव माने यांची प्रमुख उपस्थिती होती.
संजीवराजे म्हणाले, फलटण शहरातील सामाजिक कार्यकर्ते मितेश उर्फ काका खराडे यांचा आणि आमचा खूप जुना संबंध आहे. तसेच ते आमचे पाहुणे सुद्धा आहेत. बऱ्याच दिवसांपासून त्यांच्यासोबत एक चर्चा चालू होती. त्यांनी चांगल्या विचाराच्या प्रवाहात यावं, अशी आमची इच्छा होती. त्याप्रमाणे त्यांनी आमच्याबरोबर काम करण्याचे ठरवले आहे. चांगला विचार पुढे घेऊन जाण्याच्या दृष्टीने त्यांनी हा निर्णय घेतला असल्याचे संजीवराजे यांनी सांगितले.
दरम्यान, संजीवराजे यांनी एक जुनी आठवण सांगितली. ते म्हणाले, खराडे यांनी नगरपालिकेची निवडणूक लढवली होती आणि ती अटीतटीची झाली होती. सामाजिक दृष्टीकोनातून काम करणारा कार्यकर्ता अशी त्यांची ओळख आहे. लोकांमध्ये जाऊन लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी सकारात्मक दृष्ट्या ते काम करत असल्याचे संजीवराजेंनी म्हटले आहे.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
यावेळी मितेश खराडे म्हणाले, रामराजे नाईक-निंबाळकर यांच्या संयमी, शात सुसंस्कृत नेतृत्वाखाली आज राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करत आहे. आतापर्यंत अनेक आंदोलने केली तसेच जनतेला न्याय देण्याचे काम केले आहे. यापुढेही रामराजेंच्या नेतृत्वाखाली हेच काम पुढे नेणार आहे. तसेच माझ्यावर जी जबाबदारी देण्यात येईल ती पार पाडणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.