Kolhapur News : लोकसभा निवडणुकीसाठी महायुतीकडून ऐनवेळी उमेदवारीबाबत धक्कातंत्र वापरले जाण्याची शक्यता आहे. महाविकास आघाडीतून श्रीमंत शाहू छत्रपती महाराज यांचे नाव निश्चित झाल्यास महायुतीच्या उमेदवारीतही बदल शक्य आहे. त्यातून १९९८ ची पुनरावृत्ती होणार की विद्यमान खासदारांना संधी मिळणार, याविषयी उत्सुकता असेल. (Mahayuti will play masterstroke in Kolhapur Lok Sabha constituency)
दरम्यान, महायुतीचा कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील उमेदवार बदलायचा झाल्यास पालकमंत्री हसन मुश्रीफ की राज्यसभा खासदार धनंजय महाडिक यांच्यापैकी कोण? याची उत्सुकता असणार आहे. काम करण्याची पद्धत, जातीय समीकरणे, आर्थिक रसद या सर्वांचा विचार करूनच उमेदवारी दिली जाणार आहे. लोकसभेच्या १९९८ च्या निवडणुकीत शिवसेनेकडून कोल्हापूरमधून दिवंगत विक्रमसिंह घाटगे यांचे नाव जाहीर झाल्यानंतर काँग्रेसने त्यावेळी सलग पाच वेळा खासदार असलेल्या उदयसिंगराव गायकवाड यांची उमेदवारी रद्द करून सदाशिवराव मंडलिक यांना उमेदवारी दिली होती. (Kolhapur Loksabha )
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
कागल तालुक्यातील या दोन राजकीय विरोधकांच्या लढतीत दिवंगत मंडलिक यांनी बाजी मारली होती. गायकवाड उमेदवार असते, तर कदाचित निकाल वेगळा लागला असता. पण, त्यानंतर वर्षभरात झालेल्या निवडणुकीत कॉँग्रेसमध्ये फूट पडून राष्ट्रवादीची स्थापना झाली आणि १९९९ मध्ये झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीत गायकवाड व मंडलिक यांच्यात झालेल्या लढतीत पुन्हा मंडलिकच विजयी झाले.
महायुती सरकारमधील उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यापासून भाजपच्या नेत्यांपर्यंत सर्वांकडून कोल्हापूरच्या दोन्ही जागा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटालाच दिल्या जातील, असे सांगितले जाते. पण, त्याचवेळी उमेदवार कोण? या प्रश्नाचे उत्तर संबंधितांकडून दिले जात नाही.
सध्याची राजकीय परिस्थिती पाहता १९९८ प्रमाणेच ऐनवेळी उमेदवार बदलला जाईल का, याविषयी उत्सुकता आहे. पण सद्य:स्थितीत शिंदे गटाकडेच विद्यमान खासदार आहेत. भाजप आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाकडे ताकदीचा उमेदवार नाही. उमेदवार बदलायचा झाल्यास राष्ट्रवादीला जागा सोडून पालकमंत्री हसन मुश्रीफ यांना रिंगणात उतरवले गेले, तर आश्चर्य वाटू नये.
दुसरीकडे भाजपकडून खासदार महाडिक यांना उतरवले तर महाडिक विरुद्ध काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांच्यातील वााद सर्वश्रुत आहे. पाटील यांच्याकडून मोठी ताकद महाडिक यांच्या विरोधात उभी केली जाईल. त्यातून २०१९ ची पुनरावृती टाळायची झाल्यास आणि उमेदवारीत बदल करायचा झाल्यास मुश्रीफ यांचेच नाव पुढे येण्याची शक्यता आहे. मुश्रीफ हे सलग पाच वेळा आमदार, त्यातील २० वर्षांहून अधिक काळ मंत्रिपद, त्या जोरावर कागलमध्ये उभा केलेला विकासकामांचा डोंगर आणि सतेज पाटील यांच्याशी सहकार क्षेत्रात असलेली त्यांची मैत्री ही त्यांच्या दृष्टीने जमेची बाजू आहे.
या जोडीला आमदार डॉ. विनय कोरे यांच्यासह भाजप, शिवसेना शिंदे गट व राष्ट्रवादीची ताकद या सर्वांच्या जोरावर मुश्रीफ हेच महाविकास आघाडीसमोर मोठे आव्हान उभे करू शकतात, असा एक अंदाज आहे. येत्या आठ ते दहा दिवसांत यासंदर्भातील चित्र स्पष्ट होण्याची शक्यता आहे.
R
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.