-पांडुरंग बर्गे
Koregaon Political News : कोरेगाव विधानसभा मतदारसंघातील टंचाई निवारणासाठी आम्ही सक्षम आहोत. त्यात विधान परिषद सदस्यांनी लुडबुड करू नये. गेल्या दहा वर्षात आमदार व मंत्री असताना आपण किती टंचाई निवारणार्थ बैठका घेतल्या आणि टंचाईचे निवारण केले? हे एकदा जाहीर तरी करावे, असे आव्हान आमदार महेश शिंदे यांनी दिले.
कोरेगाव येथे उद्या (सोमवारी) आयोजित टंचाई निवारणार्थ बैठकीवरून आमदार महेश शिंदे Mahesh Shinde व शशिकांत शिंदे Shashikant Shinde यांच्यात कलगीतुरा रंगला आहे. महेश शिंदे यांनी म्हटले की, कोरेगाव येथे उद्या (सोमवारी) आम्ही आयोजित केलेल्या टंचाई निवारणार्थ बैठकीचे पत्र गुरुवारी प्रांताधिकाऱ्यांना दिलेले होते. मात्र, विरोधकांनी दुसऱ्या दिवशी म्हणजे शुक्रवारी पत्र दिलेले आहे.
त्यामुळे त्यांची बैठक आम्ही विस्कळीत वगेरे करण्याचा प्रश्न येत नाही. संविधानानुसार विधान परिषद सदस्यांचे मुख्यालय हे जिल्हास्तरावर असते आणि विधानसभा सदस्यांचे मुख्यालय हे तालुका असते. विधान परिषद सदस्यांना जर एखादा तालुक्यात बैठक वगेरे घ्यायची असेलच तर प्रथम त्यांना त्या त्या तालुक्याच्या विधानसभा सदस्याला विश्वासात घेऊन त्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घ्यावी लागते.
त्यामुळे हक्कभंग वगेरे काहीही होत नाही. उलट आमचे शशिकांत शिंदे यांच्यावर हक्कभंग प्रस्ताव सुरू आहेत. तसेच तालुक्यात बैठका घेण्याचा प्रथम हक्क हा विधानसभा सदस्याचा असतो. विधान परिषद सदस्यांचा नव्हे. मुळात टंचाई ही मुंबईमध्ये दहा दिवस राहायचे व मतदारसंघात एक दिवस रहायचे अशी कळत नाही. खरी टंचाई जाणवायला मतदारसंघात राहावे लागते.
मागील दहा वर्षात त्यांनी टंचाई निवारणार्थ किती बैठका घेतल्या आणि टंचाईचे निवारण केले हे जाहीर करावे. या काळात तुमच्या कामात लुडबुड करायला कोणी आलेले नव्हते. तसे तुम्ही आता आमच्या काळात कोरेगाव तालुक्यात लुडबुड करू नये.
आम्हाला कोरेगावच्या जनतेने पाच वर्षासाठी निवडून दिलेले आहे. आम्हाला शांतपणे काम करू द्यावे. आम्ही टंचाई निवारण करण्यासाठी समर्थ आहोत. तुम्ही लक्ष घालण्याची आवश्यकता अजिबात नाही, असेही आमदार शिंदे यांनी शेवटीं नमूद केले.
Edited By Umesh Bambare
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.