
Solapur, 06 February : भारतीय जनता पक्षाचे विधान परिषद सदस्य रणजितसिंह मोहिते पाटील यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत पक्षविरोधी कारवाया केल्याचे सांगून भाजपकडून मोहिते पाटील यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली होती. त्या पार्श्वभूमीवर ही भेट महत्वपूर्ण मानली जात आहे. तसेच, मोहिते पाटील विरोधकांना धक्का देणारी ठरली आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंकडून कौतुक तर फडणवीसांची भेट यामुळे भाजपकडून मोहिते पाटील यांना अभय दिल्याचे मानले जात आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसंदर्भात आमदार रणजितसिंह मोहिते पाटील (Ranjitsinh Mohite Patil ) यांनी सोशल मीडियावर पोस्ट करून ही माहिती दिली आहे. या भेटीत मोहिते पाटील यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांना ‘भगवान श्री विष्णूंच्या दशावतारचे प्रतिबिंब असणारी तलवार भेट’ म्हणून दिली आहे. एकीकडे विरोधक मोहिते पाटील यांचे पक्षातून निलंबन करावे, यासाठी आग्रही असताना मोहिते पाटील हे भाजपमध्ये पुन्हा रुळत असल्याचे दिसून येते.
लोकसभा निवडणुकीपासून रणजितसिंह मोहिते पाटील यांनी पक्षाच्या व्यासपीठापासून दूर होते. कारण, त्यांचे बंधू धैर्यशील मोहिते पाटील यांनी माढ्यातून भाजपच्या (BJP) विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून निवडणूक लढवून जिंकली होती. तेव्हापासून मोहिते पाटील भाजप आणि महाविकास आघाडीच्या प्रचार सभांपासून दूर होते.
लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हे अकलूजमध्ये प्रचारासाठी आले होते. त्या वेळी आमदार मोहिते पाटील हे फडणवीसांच्या स्वागतासाठी थांबले होते. मात्र, फडणवीस हे मोहिते पाटील यांचे स्वागत स्वीकारण्यास थांबले नव्हते. त्यांचे स्वागत न स्वीकारता फडणवीस हे थेट अकलूजमधील सभास्थळी रवाना झाले होते.
विधानसभेच्या निवडणुकीतही रणजितसिंह मोहिते पाटील यांनी पक्षाच्या उमेदवाराच्या विरोधात काम केल्याचा आरोप माजी आमदार राम सातपुते यांनी केला होता. त्यांनीच मोहिते पाटील यांचे पक्षातून निलंबन करावे, अशी मागणी पक्षाच्या वरिष्ठांकडून लावून धरली होती. मोहिते पाटील यांना भाजपकडून कारणे दाखवा नोटीसही बजावण्यात आली होती.
भाजपकडून पाठविण्यात आलेल्या नोटिशीला रणजितसिंह मोहिते पाटील यांनी उत्तरही दिले आहे. तसेच, भाजपच्या सदस्य नोंदणीतील कामगिरीबद्दल प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनीही पत्र पाठवून मोहिते पाटील यांचे अभिनंदन आणि कौतुक केले होते. आताही फडणवीस यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली आहे, त्यामुळे एकीकडे भाजपतील एका गटाकडून कारवाईची मागणी होत असताना मोहिते पाटील हे भाजपमध्ये आपले स्थान मजबूत करत असल्याचे दिसून येत आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.