Solapur, 01 October : भारतीय जनता पक्षाकडून सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट आणि दक्षिण सोलापूर मतदारसंघातील उमेदवारीचा कौल घेण्याची जबाबदारी पुण्यातील दोन आमदारांवर सोपवली होती. आमदार माधुरी मिसाळ यांनी अक्कलकोटचा, तर आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी दक्षिण सोलापूरचा आढावा घेतला.
यात दक्षिण सोलापूरचा आढावा घेताना विरोधकांची संख्या पाहून आमदार सुभाष देशमुख समर्थकांची पळापळ झाली. त्यानंतर देशमुखांना पसंती मिळाल्याने याच घरातील तीन नावे उमेदवारीसाठी प्रदेश पातळीवर पाठविण्यात येणार असल्याची माहिती आहे.
दक्षिण सोलापूर मतदारसंघातून आमदार सुभाष देशमुख (Subhash Deshmukh) यांच्या उमेदवारीला पक्षातूनच आव्हान दिले जात आहे. त्याचे पडसाद पक्षाच्या आजच्या बैठकीत उमटले. दक्षिण सोलापूर मतदारसंघातील शहर आणि ग्रामीण भागातील पदाधिकाऱ्यांना सोलापूर शहरातील शासकीय विश्रामगृहात बोलावण्यात आले होते.
उमेदवारीसाठी भाजप (BJP) आणि पक्षाच्या विविध आघाडीच्या पदाधिकाऱ्यांना निमंत्रित करण्यात आले होते. बैठकीत एका मतदारसंघासाठी किमान तीन नावे प्रसंतीक्रमानुसार सूचवायची होती. दक्षिण सोलापूरसाठी भाजपच्या १०६ पदाधिकाऱ्यांना बोलावण्यात आले होते. प्रत्यक्षात ४५ पदाधिकारीच उपस्थित होते. त्यातही विरोधकांची संख्या मोठी होती.
आढावा बैठकीला विरोधी पदाधिकाऱ्यांची संख्या पाहून आमदार सुभाष देशमुख यांच्यासह त्यांच्या दोन्ही मुलांना अधिक पसंती मिळावी, यासाठी यांच्या समर्थकांची एकच धावपळ उडाली. आपल्या समर्थक पदाधिकाऱ्यांना बैठकीला आणण्यासाठी देशमुखांकडून गाड्या पाठवण्यात आल्या. त्यानंतरही १०६ पदाधिकारी बैठकीला येऊ शकले नाहीत. शेवटी कसे तरी प्रयत्न करून ९२ पर्यंत मतदानाचा आकडा गेला.
आपल्या गटातील पदाधिकाऱ्यांना जमा करण्यासाठी देशमुख समर्थकांना मात्र कसरत करावी लागली. ते चित्र प्रत्यक्ष मतदानाच्या वेळी मतदारांना आणण्यासाठी ज्या प्रमाणे धावपळ होते, अगदी तशीच धावपळ देशमुख समर्थकांची चालली होती. अखेर ९२ जणांनी मतदान केले. त्यानुसार आमदार सुभाष देशमुख, त्यांचे सुपुत्र मनीष देशमुख आणि रोहन देशमुख यांची नावे पाठविण्यात आल्याची माहिती आहे.
सचिन कल्याणशेट्टींविषयी तक्रारी
विधानसभा उमेदवारीचा कौल घेण्यासाठी आयोजित केलेल्या अक्कलकोटमधील बैठकीला आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्यावरील नाराज पदाधिकाऱ्यांना बोलावण्यात आले नव्हते. आमदार मिसाळ यांना विनंती केल्यानंतर सोलापूरच्या शासकीय विश्रामृहात जाऊन कल्याणशेट्टी यांच्याविषयी तक्रारी नोंदविण्यात आल्या.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.