

Rupali Chakankar FIR Latest News : राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रूपाली चाकणकर यांच्याबाबत फेसबुक, इन्स्टाग्राम आणि एक्स यांसह सोशल मीडिया माध्यमांवर अश्लील, अपमानास्पद आणि बदनामीकारक मजकूर प्रसारित केल्याप्रकरणी पुणे सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात माध्यमांमध्ये 19 जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाल्याचे वृत्त चर्चेत असताना, आता या FIR बाबत महत्त्वाचा दावा समोर आला आहे.
चाकणकर यांनी दाखल केलेल्या FIR क्रमांक 0113/2026 मध्ये आरोपींच्या नोंदी असलेल्या Column 7 मध्ये केवळ दोन व्यक्तींची नावे असल्याचा दावा या प्रकरणातील वकिलांकडून करण्यात आला आहे. त्यानुसार मिलिंद मारुती गोरे आणि सपना नंदकिशोर राजपूत यांची आरोपी म्हणून नोंद असल्याचे सांगण्यात येत आहे.
अंधारे, ठोंबरे, दिपाली सय्यद आरोपी नाहीत?
या प्रकरणात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्या सुषमा अंधारे, राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रूपाली पाटील ठोंबरे आणि अभिनेत्री दिपाली सय्यद यांची नावे चर्चेत आली होती. मात्र, या तिघांची नावे FIR मधील आरोपींच्या Column 7 मध्ये नसून, Column 12 मधील तक्रारदाराच्या कथनात त्यांचा उल्लेख असल्याचा दावा अॅड. जतीन आढाव यांनी केला आहे.
त्यामुळे या तिघांना थेट ‘FIR मधील आरोपी’ किंवा ‘19 आरोपींपैकी’ असे संबोधणे वस्तुस्थितीला धरून नसल्याचे आढाव यांनी म्हटले आहे. पोलिसांनी फक्त दोन जणांवरच गुन्हा दाखल केला असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
नेमकं प्रकरण काय?
कथित भोंदू अशोक खरात याच्यावर महिलांच्या लैंगिक अत्याचाराचे आरोप झाल्यानंतर हे प्रकरण राज्यभर चर्चेत आले होते. त्याच काळात रूपाली चाकणकर यांचे अशोक खरात याच्यासोबत सार्वजनिक कार्यक्रमांमधील काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. त्यावरून चाकणकर यांच्यावर विरोधकांकडून टीका करण्यात आली होती.
त्यानंतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर चाकणकर यांच्याविरोधात विविध पोस्ट करण्यात आल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. या पोस्टवर काही व्यक्तींनी अश्लील, अपमानास्पद आणि आक्षेपार्ह शेरेबाजी केल्याचा आरोप आहे.
तक्रारीत रूपाली पाटील ठोंबरे, सुषमा अंधारे, संगिता तिवारी, अॅड. अशोक बेदरे, अश्विनी खाडे, महादेव बालगुडे, हनुमंत गलगटे, वर्षा कांबळे, राजश्री समींदर, गणेश लोखंडे, हेमा पिंगळे, रंजना देशमुख, लॉजिकल सिद्धान्त, योगेश सावंत, दिपाली सय्यद, डॉ. आशा मिरगे आणि मोहसीन शेख यांच्यासह इतरांच्या सोशल मीडिया पोस्टचा उल्लेख असल्याचे सांगण्यात येत आहे.
वकिलांचा दावा काय?
या प्रकरणात अॅड. जतीन आढाव यांनी माध्यमांमध्ये दिलेल्या माहितीनुसार, FIR मध्ये प्रत्यक्ष आरोपी म्हणून केवळ दोन व्यक्तींची नावे नमूद आहेत. इतर व्यक्तींची नावे तक्रारदाराच्या कथनात किंवा संबंधित सोशल मीडिया पोस्टच्या संदर्भात आली आहेत. त्यामुळे FIR चा प्रत्यक्ष मजकूर पाहता ‘19 जण आरोपी’ असा सरसकट निष्कर्ष काढणे दिशाभूल करणारे ठरू शकते, असा दावा आढाव यांनी केला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.