

Sangli, 19 April : सांगली शहर राष्ट्रवादी काँग्रेसमधील अंतर्गत वादाचा रविवारी (ता. 19 एप्रिल) स्फोट झाला. महापालिकेतील स्वीकृत नगरसेवकपदाच्या नियुक्तीवरून निर्माण झालेल्या नाराजीतून शहरातील तब्बल 35 पदाधिकाऱ्यांनी शहराध्यक्ष पद्माकर जगदाळे यांच्याकडे राजीनामा दिला असल्याचे पुढे आले आहे.
दरम्यान, उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या मृत्यूनंतर काही जणांना धाक राहिला नाही, या प्रकरणी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांशी चर्चा करणार असल्याचेही शहराध्यक्ष जगदाळे यांनी स्पष्ट केले.
सांगली (Sangli) महापालिकेच्या आठ स्वीकृत नगरसेवकांच्या नियुक्ता नुकत्याच झाल्या. राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला दोन जागा आल्या होत्या. त्या दोन जागांसाठी प्रदेश पातळीवरून स्नेहल जाधव आणि दिगंबर जाधव ही दोन नावे आली होती. मात्र, महापालिकेतील राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते मैनुद्दीन बागवान यांनी दिगंबर जाधव यांचे नाव बदलल्याचा आरोप आहे.
पक्षश्रेष्ठींकडून आलेले दिगंबर जाधव यांचे नाव बदलून त्यांच्या जागी ऐनवेळी अशोक मासाळे यांचे घुसवण्यात आल्याचा आरोप स्थानिक पदाधिकाऱ्यांकडून होत आहे. त्यावरून सांगली राष्ट्रवादीत जोरदार रणकंदन सुरू झाले आहे.
गटनेते बागवान यांनीच हे नाव परस्पर बदलले आहे, असा आरोप शहर पदाधिकाऱ्यांकडून करण्यात आला आहे. या कारभारामुळे संतप्त झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या ३५ पदाधिकाऱ्यांनी पक्षाच्या पदाचे राजीनामे दिले आहेत. शहराध्यक्ष जगदाळे यांच्याकडे हे राजीनामे सुपूर्द करण्यात आले आहेत.
पदाधिकाऱ्यांच्या राजीनाम्यावर शहराध्यक्ष जगदाळे म्हणाले, उपमुख्यमंत्री अजितदादांच्या मृत्यूनंतर काही जण मनमानी पद्धतीने वागत आहेत. धाक राहिला नसल्यासारखे त्यांचे वर्तन आहे. पक्षाकडून आलेली स्वीकृत नगरसेवकपदाची नावे न देता त्यात बदलण करण्याचे धाडस करण्यात आले आहे. त्यामुळे पक्षात मैनुद्दीन बागवान यांच्या विरोधात तीव्र संतापाची भावना पक्षात आहे. त्या सर्वांनी माझ्याकडे राजीनामे दिले आहेत. पक्षश्रेष्ठींच्या कानावर ही गोष्ट घालण्यात येणार आहे.
दरम्यान, राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांकडून होत असलेल्या आरोपावर मैनुद्दीन बागवान यांनी स्पष्टीकरण दिले आहे. स्वीकृत नगरसेवकाच्या निवडी या पक्षश्रेष्ठींच्या आदेशानुसारच झाल्या आहेत. याबाबत मी मंगळवारी सविस्तर स्पष्टीकरण देणार असल्याचेही बागवान यांनी स्पष्ट केले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.