

अजित पवार यांच्या अंत्यविधी दरम्यान बारामतीत मोठ्या प्रमाणात चोरीची घटना घडली.
किमान १५ जणांचे सुमारे २५ लाख रुपयांचे सोन्याचे दागिने चोरीस गेले.
या प्रकरणात पोलिसांनी सहा आरोपींना अटक केली असून इतरांचा शोध सुरू आहे.
Baramati Crime News : मिलिंद संगई
दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अंत्यविधी दरम्यान चोरट्यांनी किमान पंधरा जणांचे पंचवीस लाखांचे सोन्याचे दागिने लंपास केल्याची घटना बारामतीत घडली आहे. या प्रकरणी पोलिसांनी सहा चोरट्यांची धरपकड केली असून त्यांच्या साथीदारांचा शोध सुरु आहे.
अजित पवार यांच्या अंत्यविधीप्रसंगी (29 जानेवारी) लाखाचा जनसमुदाय उपस्थित होता. या प्रचंड गर्दीचा गैरफायदा घेत काही जणांच्या गळ्यातील सोन्याच्या चेन व दागिने चोरट्यांनी चोरुन नेण्याचा प्रयत्न केला. या पैकी काही चोरट्यांना नागरिकांनी पकडून चोप देत पोलिसांच्या स्वाधीन केले तर काहींना पोलिसांनी पकडले.
विशेष म्हणजे त्या दिवशी बारामतीत आठ हजार पोलिसांचा बंदोबस्त होता. ज्या विद्या प्रतिष्ठानच्या मैदानावर चोरट्यांच्या टोळीने हात साफ करण्याचा प्रयत्न केला त्या ठिकाणी अक्षरशः हजारो पोलिस उपस्थित असतानाही धाडस दाखवित या चोरट्यांनी चोरीचा प्रयत्न केला. बंदोबस्तात पोलिस असल्याचे पाहत चोरट्यांनी पोलिसांसमोरच चोऱ्यांचा प्रयत्न केल्याने लोक संतप्त झाले आहेत.
या प्रकरणी बारामती तालुका पोलिसात आठ ते दहा तक्रारी दाखल झाल्याची माहिती पोलिस निरिक्षक चंद्रशेखर यादव यांनी दिली आहे. यामध्ये राजकुमार बाबूराव आठवले (रा.गेवराई, जि. बीड), महम्मद अनिस महमद युनुस, येजाज भग्गू मिरावले, मोहमद सादिक मोहमद सिराज (सर्व रा. दिग्रस, जि. यवतमाळ), बाळू बबन बोत्रे (रा. पळसदेव, ता. इंदापूर) व त्याचे दोन मित्र अशा संशयितांविरुध्द तालुका पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
याप्रकरणी रणजित बाबासाहेब जाधव व रमेश लालासाहेब वाबळे यांनी तालुका पोलिसात फिर्याद दिली आहे. दरम्यान विजया गजानन पवार यांचे गंठण, नीलेश लक्ष्मण काटे, अशोक मोरे, मनोहर जाधव, विजय शिंदे, जालिंदर बसले, संजय काटे, विश्वजित तुपे, सतीश सातकर, अमोल ताटे, अंकुश दिघे, प्रशांत सपकळ, विकास भागवत यांच्या गळ्यातील सोन्याची चेन चोरटयांनी चोरल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. पोलिसांनी या चोरट्यांकडे कसून तपास सुरु केला असून यातील सर्व सहभागी आरोपींना लवकरच अटक करण्यात येईल असे चंद्रशेखर यादव म्हणाले.
1. चोरीची घटना कुठे घडली?
ही घटना बारामती येथे अजित पवार यांच्या अंत्यविधी दरम्यान घडली.
2. किती किमतीचे दागिने चोरीस गेले?
सुमारे २५ लाख रुपयांचे सोन्याचे दागिने चोरीस गेले.
3. किती लोकांचे दागिने चोरीस गेले?
किमान १५ जणांचे दागिने चोरीस गेल्याची माहिती आहे.
4. पोलिसांनी काय कारवाई केली आहे?
या प्रकरणात पोलिसांनी सहा चोरट्यांना अटक केली आहे.
5. इतर आरोपींचा शोध सुरू आहे का?
होय, पोलिसांकडून इतर साथीदारांचा शोध सुरू आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.