Prithviraj Chavan : पृथ्वीराजबाबांची राहुल गांधींच्या किचन कॅबिनेटमध्ये पुन्हा एन्ट्री; देशभरातील 100 हून अधिक नेत्यांशी विरोधी पक्षनेत्यांचा संवाद

Congress's Diwali Mangal Milan Event : राहुल गांधी यांनी नवी दिल्लीत काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांसाठी दिवाळी मंगल मिलन आणि स्नेहभोजन आयोजित केले. या कार्यक्रमाला माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह अनेक वरिष्ठ नेते उपस्थित होते.
Rahul Gandhi-Prithviraj Chavan
Rahul Gandhi-Prithviraj ChavanSarkarnama
Published on: 
Updated on: 

Karad, 07 November : काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडीच्या मुद्यावरून सहा वर्षांपूर्वी (२०२०) पक्षातील २३ वरिष्ठ नेत्यांनी (जी-२३) सोनिया गांधी यांना पत्र लिहिले होते. त्या २३ नेत्यांमध्ये महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचा समावेश होता. तेव्हापासून राहुल गांधी यांची चव्हाण यांच्यावर खप्पामर्जी होती. मात्र, मधल्या काळात पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले असून राहुल गांधी यांनी आयोजित केलेल्या दिवाळी मंगल मिलन कार्यक्रमाला चव्हाण यांना निमंत्रित करण्यात आले होते. त्यामुळे पृथ्वीराजबाबांची गांधी यांच्या किचन कॅबिनेटमध्ये पुन्हा एकदा एन्ट्री झाल्याचे मानले जात आहे.

लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी नवी दिल्लीतील आपल्या निवासस्थानी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांसाठी ‘दिवाळी मंगल मिलन' आणि स्नेहभोजन समारंभाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमाला महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तथा माजी केंद्रीय मंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह देशभरातील काँग्रेसचे अनेक ज्येष्ठ नेते, विद्यमान व माजी मुख्यमंत्री आणि विविध राज्यांतील पक्षाचे प्रमुख पदाधिकारी यांना निमंत्रित केले होते.

या दिवाळी स्नेहमिलन सोहळ्याला राहुल गांधी यांच्यासह काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे, ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी, खासदार प्रियांका गांधी, कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री भूपेश बघेल, मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंह, हरियाणाचे माजी मुख्यमंत्री भूपेंद्रसिंह हुड्डा आणि राजस्थानचे माजी मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्यासह अनेक वरिष्ठ नेत्यांनी उपस्थिती लावली.

काँग्रेसशासित राज्यांचे मुख्यमंत्री, विविध राज्यांचे प्रदेशाध्यक्ष, प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रमुख आणि देशभरातील १०० हून अधिक वरिष्ठ काँग्रेस नेते या कार्यक्रमात सहभागी झाले होते.

Rahul Gandhi-Prithviraj Chavan
Satara Politic's : एकनाथ शिंदेंनी माण-खटावमध्ये जयकुमार गोरेंना दिला तगडा पर्याय; शिवसेनेचा साताऱ्यात ‘माईंड गेम’

या कार्यक्रमादरम्यान राहुल गांधी यांनी उपस्थित नेत्यांची वैयक्तिक भेट घेतली. सर्वांशी आपुलकीने संवाद साधत त्यांनी दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. देशाच्या विविध राज्यांतील काँग्रेस नेत्यांना एकत्र येऊन परस्परांशी संवाद साधण्याची संधी या स्नेहमिलनाच्या निमित्ताने मिळाली.

या स्नेहमिलन कार्यक्रमानंतर प्रसार माध्यमांशी संवाद साधताना माजी मुख्यमंत्री चव्हाण यांनी सांगितले, या भेटीमागे कोणताही राजकीय हेतू नव्हता. दिवाळीच्या निमित्ताने देशभरातील काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांना एकत्र भेटण्याची आणि त्यांच्याशी संवाद साधण्याची ही एक चांगली संधी होती. हा पूर्णपणे कौटुंबीक आणि अनौपचारिक स्वरूपाचा स्नेहमेळावा होता.

या कार्यक्रमाचे स्वरूप पूर्णपणे अनौपचारिक आणि कौटुंबीक होते. या स्नेहभोजनादरम्यान कोणतीही अधिकृत राजकीय बैठक किंवा आगामी राजकीय रणनीतीबाबत चर्चा झाली नसल्याचे सांगण्यात आले.

दरम्यान, काँग्रेस अध्यक्षपदाच्या २०२० मधील निवडीवेळी मोठा वाद झाला होता. अध्यक्षपदाच्या निवडीवर आक्षेप घेत काँग्रेस पक्षातील २३ नेत्यांनी ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी यांना नाराजीचे पत्र लिहिले हेाते. त्या पत्रावरून काँग्रेस पक्षात मोठा गदरोळ उठला होता.

Rahul Gandhi-Prithviraj Chavan
Solapur Politic's : कोठे-नरोटे वादावर भाजपच्या ज्येष्ठ नेत्याचं भाष्य : ‘आपलं वागणं, बोलणं...हायकमांड त्यांना समज देतील’

त्या 'जी २३' मध्ये महाराष्ट्रातील काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांचा समावेश होता. तेव्हापासून राहुल गांधी आणि चव्हाण यांच्यामध्ये अंतर पडले होते. सोनिया गांधी हॉस्पिटलमध्ये असताना पत्र का लिहिले, असा राहुल गांधी यांचा सवाल होता. त्यामुळे काँग्रेसच्या २३ नेत्यांमध्ये आणि राहुल गांधी यांच्यात अंतर पडले होते. मात्र, दिवाळी मंगल मिलन कार्यक्रमात सहभागी होण्याचे निमंत्रण मिळाल्यामुळे पृथ्वीराजबाबांची पुन्हा एकदा राहुल गांधी यांच्या किचन कॅबिनेटमध्ये एन्ट्री झाल्याचे मानले जात आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.