Kolhapur Political News : लोकसभेच्या निकालानंतर कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीला मिळालेल्या यशानंतर अनेकांनी घरवापसीचा निर्णय घेतला. आगामी विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून राधानगरी विधानसभा मतदारसंघात खलबत्त सुरू आहेत.
राष्ट्रवादीच्या फुटीनंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत जाण्याचा निर्णय ए. वाय पाटील आणि माजी आमदार के. पी. पाटील यांनी घेतला. मात्र, लोकसभेच्या निकालानंतर महाविकास आघाडीला कौल दिसताच दोघांनीही महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांशी जुळवून घेतले आहे.
ए. वाय. पाटील यांनी के. पी. यांची आपल्यासमोरील अडचण लक्षात घेऊन सुरवातीला प्रथम महायुतीत उडी घेतली. त्याठिकाणी के. पी. आल्याने मोठी पंचाईत झाली. त्यामुळे लोकसभेच्या आधी ए. वाय यांनी महाविकास आघाडीत उडी घेतली. मात्र निकालानंतर पुन्हा के. पी यांची पावले आघाडीकडे वळली आहेत. त्यामुळे मेव्हण्याच्या राजकारणात पाहुण्याची अडचण अशी चर्चा सुरु झाली आहे.
राष्ट्रवादीत (NCP) दोन गट पडल्यानंतर कोल्हापूर जिल्ह्यातील राष्ट्रवादीत मोठे बदल झाले. पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्यासोबत तत्कालीन राष्ट्रवादीची जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील यांनी देखील मुश्रीफ यांच्यासोबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला.
मात्र माजी आमदार के. पी. पाटील यांनी 'वेट अँड वॉच'ची भूमिका घेत आपली भूमिका गुलदस्त्यात ठेवली. गरजेच्या वेळी ए. वाय. पाटील यांनी मुश्रीफ यांना साथ दिली होती. त्यामुळे बिद्री कारखान्याच्या निवडणुकीत मुश्रीफ आपल्या बाजूने राहतील, असा समज ए. वाय. यांना होता.
बिद्री निवडणुकीच्या निमित्ताने कारवाई तोंडावर असताना मिळालेल्या संधीचा फायदा घेत माजी आमदार के. पी. पाटील यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला. मात्र, त्यावेळी मुश्रीफ यांनी के. पी यांना साथ दिली.
लोकसभा निवडणुकीत कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील राधानगरी विधानसभा मतदारसंघात महायुतीची बाजू भक्कम असताना दोन नंबरचे मताधिक्य एका राधानगरी तालुक्यातून महाविकास आघाडीला (MVA) मिळाले. मात्र, आगामी विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून कोणी ए. वाय पाटील यांनी बंडखोरी केली.
विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीकडून आपल्याला संधी मिळेल, अशी आशा ए. वाय. पाटील यांना आहे. त्यामुळेच त्यांनी शाहू महाराज छत्रपती यांना पाठिंबा दिला. लोकसभा निवडणुकीच्या आधीच ए. वाय. पाटील महाविकास आघाडीत गेल्याने बऱ्यापैकी त्यांचे चित्र स्पष्ट होते.
मात्र, लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर महाविकास आघाडीकडून जनतेचा कौल दिसताच बिद्री कारखान्याच्या आडून माजी आमदार के. पी. पाटील यांनी आपले पावले महाविकास आघाडीकडे वळवली आहेत.
राष्ट्रवादीचे नेते शरद पवार (Sharad Pawar) हे कोल्हापुरात आले असताना के. पी. पाटील यांनी त्यांची भेट घेतली. तर ए. वाय. पाटील यांनी दोन वेळा शरद पवार यांची भेट घेऊन आपण तुमच्यासोबत असल्याचे सांगितले. मात्र संधीची वाट पाहत सोयीस्कर भूमिका घेणाऱ्या के. पी. पाटील यांच्याबद्दल त्यांच्या बदलत्या भूमिकेमुळे वेगवेगळी चर्चा मतदारसंघात सुरू आहे.
महाविकास आघाडी सोडण्यापूर्वी महायुतीमध्ये जाण्याचा निर्णय के. पी. पाटील यांनी का घेतला? लोकसभेच्या निकालानंतरच महाविकास आघाडीशी जवळीक का वाढली? असे अनेक प्रश्न अनुत्तरीत आहेत. इतकेच मेव्हण्यांच्या राजकारणात पाहुणे सारखे आडवे का येत आहेत? याची चर्चा देखील जोराने सुरू आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.