

Kolhapur News, 06 Nov : ऊसदराच्या मागणीवरून स्वाभिमानी शेतकरी संघटनेने पुकारलेल्या आंदोलनावर अखेर तोडगा निघाला आहे. तब्बल 61 तासांच्या चक्काजाम आंदोलनानंतर साखर कारखानदारांनी राजू शेट्टी यांची 4,200 रुपयांची मागणी मान्य केली. त्यानुसार ऊस उत्पादक शेतकऱ्यांना पहिली उचल 3,900 रुपये, हंगाम संपल्यानंतर 100 रुपये आणि पुढील हंगाम सुरू होण्यापूर्वी 200 रुपये देण्याचे निश्चित झाले आहे. या निर्णयामुळे कोल्हापूर, सांगली आणि सातारा जिल्ह्यांतील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
ऐन दिवाळीत ऊसदराच्या प्रश्नावरून चक्काजाम आंदोलन आणि बंद पुकारण्यात आल्याने कोल्हापूर, सांगली आणि सातारा जिल्ह्यांतील नागरिकांसह प्रवाशांमध्येही चिंतेचे वातावरण होते. पुणे-बंगळुरु राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक ठप्प झाल्याने वाहनचालकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. या आंदोलनाचा धसका अनेकांनी घेतला होता. मात्र, आता कारखानदार आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेमध्ये तोडगा निघाल्याने अखेर या तिन्ही जिल्ह्यांतील नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे.
कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयात साखर कारखानदार आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या प्रतिनिधींमध्ये बैठक झाली. या बैठकीत कारखानदारांनी 3,800 रुपये अधिक 200 रुपये असा प्रस्ताव दिला होता. मात्र, राजू शेट्टी यांनी 4,500 रुपयांच्या मूळ मागणीवरून माघार घेत 4,200 रुपयांवर तोडगा काढण्याची तयारी दर्शवली. त्यानंतर दोन्ही बाजूंमध्ये सहमती झाली.
कारखानदारांनी आर्थिक उपलब्धतेचा मुद्दा मांडल्यानंतर पहिली उचल म्हणून 3,900 रुपये देण्याचे मान्य केले. त्यानंतर गाळप हंगाम संपताना 100 रुपये आणि पुढील हंगाम सुरू होण्यापूर्वी 200 रुपये देण्याचे ठरले. अशा प्रकारे शेतकऱ्यांना एकूण 4,200 रुपये मिळणार आहेत. हा तोडगा साखरेचा प्रतिक्विंटल दर 4,500 रुपये गृहीत धरून काढण्यात आला आहे. भविष्यात साखरेचा दर 4,500 रुपयांच्या पुढे गेल्यास अतिरिक्त उत्पन्नातील 70 टक्के हिस्सा शेतकऱ्यांना, तर 30 टक्के हिस्सा कारखानदारांना मिळणार आहे.
दरम्यान, या मागणीसाठी राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली स्वाभिमानी शेतकरी संघटनेने 3 नोव्हेंबरपासून पुणे-बंगळुरु राष्ट्रीय महामार्गावरील किणी टोलनाक्यावर चक्काजाम आंदोलन सुरू केले होते. सातारा जिल्ह्यातील नागठाणे येथेही कार्यकर्त्यांनी महामार्ग रोखून धरला होता. त्यामुळे महामार्गावरील वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली होती. वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. याचा फटका एसटी वाहतुकीलाही बसला.
अखेर मागण्यांवर सकारात्मक तोडगा निघाल्यानंतर मध्यरात्री एक वाजता राजू शेट्टी यांनी किणी टोलनाक्यावर आंदोलन स्थगित करण्याची घोषणा केली. तब्बल 61 तासांनंतर चक्काजाम आंदोलन मागे घेण्यात आले. त्याचबरोबर उद्याचा बंदही स्थगित करण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे तीन दिवसांपासून ठप्प असलेला पुणे-बंगळुरु महामार्ग पुन्हा वाहतुकीसाठी खुला झाला असून कोल्हापूर, सांगली आणि सातारा जिल्ह्यांतील साखर कारखाने सुरू होण्याचा मार्गही मोकळा झाला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.