
कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या निगवे खालसा गटात महायुती आणि महाविकास आघाडीतील अस्पष्टतेमुळे राजकीय चुरस वाढली आहे.
मतदारसंघाच्या नव्या रचनेमुळे काँग्रेस, भाजप, राष्ट्रवादी आणि शिवसेना या सर्व पक्षांना उमेदवार निवडताना कठीण परीक्षा द्यावी लागणार आहे.
काँग्रेसचे किरणसिंह पाटील, राहुल पाटील आणि भाजपचे रणजित पाटील यांच्यातील स्पर्धेमुळे या गटात चौरंगी लढतीची शक्यता वाढली आहे.
Kolhapur, 23 October : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुती एकत्रित लढणार की स्वतंत्र लढणार, याबाबत अजूनही स्पष्टता नाही. कोल्हापूरमध्ये महाविकास आघाडीत काँग्रेस तुल्यबळ असल्याने राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात शांतता आहे. महाआघाडी होऊ अथवा महायुती इच्छुकांनी दिवाळीचा मुहूर्त गाठून जेवणावळीचा सपाटा लावला आहे.
करवीर (Karveer) आणि दक्षिण कोल्हापूरच्या वेशीवर असणारा निगवे खालसा जिल्हा परिषद गट खुला असल्याने या ठिकाणी अनेक पहिलवानांनी शड्डू ठोकायला सुरुवात केली आहे. सोशल मीडियावरून आपल्या राजकीय वस्तादांच्या फोटोसह जाहिरातबाजी करत काहींनी आखाड्यात खडाखडीही सुरू केली आहे. काहींनी उमेदवारीसाठी गुपचूप अंतर्गत फिल्डिंग लावण्यास सुरुवात केली आहे.
करवीर आणि दक्षिण कोल्हापूर या दोन्ही विधानसभेच्या मतदारसंघांतील काही गावांचा समावेश या निगवे खालसा गटात आहे, त्यामुळे या गटातील उमेदवार निवडताना नेत्यांचा कस लागणार आहे. गेल्या निवडणुकीत निगवे खालसा व परिते हे स्वतंत्र जिल्हा परिषदेचे (Jillha Parishad) गट होते. काँग्रेसचे माजी जिल्हा परिषद अध्यक्ष राहुल पाटील यांनी काँग्रेस पक्षातून शेकाप व राष्ट्रवादी काँग्रेस युतीचे हंबीरराव पाटील यांचा ७००० मतांनी पराभव केला होता, तर निगवे खालसा गटातून भाजपच्या संध्याराणी बेडगे यांनी काँग्रेसच्या संभाजी बोटे यांच्या विरोधात ३४६ मतांनी विजय मिळवला होता.
यावेळी निगवे खालसा गटातून नागाव, नंदगाव, खेबवडे, दिंडनेर्ली, दऱ्याचे वडगाव, हणबरवाडी ही गावे वगळून ती पूर्वीच्या कळंबा तर्फ ठाणे या मतदारसंघाला जोडली आहेत. पूर्वीचा परिते जिल्हा परिषद मतदारसंघ संपुष्टात येऊन त्यातील म्हाळुंगे, परिते, कुरुकली, बेले, कुई, येवती, कोथळी ही गावे निगवे खालसा गटाला जोडली आहेत.
गेल्या वेळी परिते गटातून निवडून आलेले काँग्रेसचे दिवंगत नेते आमदार पी. एन. पाटील यांचे सुपुत्र राहुल पाटील हे सध्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आहेत. तसेच, या गटात काँग्रेसचा (सतेज पाटील गट) व भाजप (महाडिक गट) जनसंपर्क चांगला असला तरी उमेदवार निवडताना काँग्रेस नेते सतेज पाटील व भाजप (महाडिक गट) यांना खूप कसरत करावी लागणार आहे.
या गटातून मागील वेळी भाजपचा (महाडिक गट) उमेदवार जिंकून आला असला तरी मतदारसंघाच्या बदलत्या रचनेमुळे त्यांचाही कस लागणार आहे. चौरंगी लढत झाली, तर पूर्वीच्या परिते गटातून या मतदारसंघात जोडलेल्या गावांची मतदारसंख्या जास्त असल्याने हा गट राहुल पाटील व चंद्रदीप नरके यांना सोपा, तर काँग्रेस व भाजप यांना जड जाण्याची शक्यता आहे. गेल्यावेळी दुरंगी लढत झाली होती. यावेळी मात्र शिवसेना व राष्ट्रवादीच्या फुटीमुळे ही लढत चौरंगी होण्याची शक्यता आहे. ही निवडणूक कार्यकर्त्यांची असली तरी या निवडणुकीने नेत्यांचे अस्तित्वही सिद्ध होणार आहे.
जुन्या मतदारसंघातून काँग्रेसमधून दोन वेळा निवडून आलेले येवतीचे माजी पंचायत समिती सदस्य किरणसिंह पाटील हे पक्षाने उमेदवारी देवो अथवा न देवो कोणत्याही परिस्थितीत निवडणूक लढवणार असल्याचे समजते. त्यामुळे पाटील यांना काँग्रेसकडून उमेदवारी मिळाली नाही, तर ते कोणत्या पक्षातून निवडणूक लढवणार व काँग्रेसचे वस्ताद सतेज पाटील हे किरण पाटील यांनाच आखाड्यात उतरवणार की दुसरा कसलेला की नवीन चेहरा मैदानात उतरवणार, याचे औत्सुक्य आहे.
विरोधकांच्या हालचालीवर बारीक लक्ष ठेवून खासदार धनंजय महाडिक ऐनवेळी कोणती खेळी करणार, वडिलांच्या अनुपस्थितीत स्वतःला राहुल पाटील कसे सिद्ध करणार की, चंद्रदीप नरके त्यांना रोखणार, हे आगामी काळच ठरवेल.
सध्या या गटात काँग्रेसकडून इच्छुकांची संख्या जास्त आहे. यात इस्पुर्लीचे माजी जिल्हा परिषद सदस्य एकनाथ पाटील, संदीप गोडसे, विद्यमान पंचायत समिती सदस्य व माजी उपसभापती सागर पाटील (निगवे खालसा), राष्ट्रवादी राहुल पाटील गटातून येवतीचे रणजित शेळके व परितेचे सरपंच विजय पाटील, भाजपमधून रणजित पाटील व संजय व्हनाळकर (चुये), सुमित चौगले (निगवे खालसा) व शिवसेना शिंदे गटातून उमेदवाराचा शोध सुरू आहे, तर ठाकरे गटातून जीवन पाटील (चुये) व भरत आमते कोथळी हे निवडणूक लढवण्यास इच्छुक असल्याचे समजते.
Q1. निगवे खालसा गटात कोणत्या पक्षांमध्ये प्रमुख स्पर्धा आहे?
A1. काँग्रेस, भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना यांच्यात प्रमुख स्पर्धा आहे.
Q2. या गटात चौरंगी लढतीची शक्यता का आहे?
A2. शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या फुटीमुळे चौरंगी लढत होण्याची शक्यता आहे.
Q3. काँग्रेसकडून प्रमुख इच्छुक कोण आहेत?
A3. किरणसिंह पाटील, सागर पाटील आणि एकनाथ पाटील हे काँग्रेसकडून प्रमुख इच्छुक आहेत.
Q4. या निवडणुकीत कोणाचे राजकीय अस्तित्व पणाला लागले आहे?
A4. राहुल पाटील, सतेज पाटील आणि धनंजय महाडिक यांच्या नेतृत्वाचा कस लागणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.