

Sangli News : सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी विजय मिळवत जिल्हा बँकेत प्रवेश केला आहे. जत सोसायटी गटातून पडळकर यांनी विनोद पवार यांचा २० मतांनी पराभव केला. पडळकर यांना ५४ मते मिळाली, तर पवार यांच्या पारड्यात ३४ मते पडली. या विजयानंतर पडळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जयंत पाटील यांच्यावर जोरदार टीका केली आहे. “जतच्या जनतेने टप्प्यात आणून करेक्ट कार्यक्रम केला,” असा खोचक टोला त्यांनी लगावला.
जिल्हा बँकेच्या निवडणुकीची घोषणा झाल्यापासूनच जत सोसायटी गटातील पडळकर यांच्या उमेदवारीची चर्चा रंगली होती. त्यांच्या उमेदवारी अर्जावर आक्षेप घेण्यात आल्याने हे प्रकरण न्यायालयापर्यंत पोहोचले. मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर खंडपीठाने अर्ज अवैध ठरवल्यानंतर पडळकर यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. त्यानंतर त्यांच्या उमेदवारीला वैधता मिळाली आणि निवडणुकीचा मार्ग मोकळा झाला.
२० मतांनी पडळकरांचा विजय
जत सोसायटी गटातील निवडणूक चुरशीची ठरण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. मात्र, मतमोजणीनंतर पडळकर यांनी २० मतांच्या फरकाने विजय मिळवला. त्यांना ५४ मते मिळाली, तर विनोद पवार यांना ३४ मतांवर समाधान मानावे लागले. या निकालामुळे पडळकर यांची सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत एन्ट्री निश्चित झाली आहे.
पडळकर यांच्या विजयाची चर्चा सांगली जिल्ह्यातच नव्हे, तर राज्याच्या राजकीय वर्तुळातही सुरू झाली आहे. या निकालामुळे पडळकर आणि जयंत पाटील यांच्यातील राजकीय संघर्ष पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आला आहे.
जयंत पाटलांवर पडळकरांचा खोचक टोला
जिल्हा बँकेच्या निवडणुकीत पडळकर यांना प्रवेश मिळू नये, यासाठी जयंत पाटील यांच्याकडून रणनीती आखण्यात आल्याची चर्चा निवडणुकीदरम्यान रंगली होती. मात्र, न्यायालयीन लढाईनंतर पडळकर निवडणुकीच्या रिंगणात उतरले आणि अखेर त्यांनी विजय मिळवला.
या निकालानंतर पडळकर यांनी जत अ गटातील मतदारांचे मनापासून अभिनंदन करत असल्याचे म्हटले आहे. जत तालुका सातत्याने नवनवीन इतिहास करण्यात माहिर आहे. माझ्या या निवडणुकीमध्ये समोरच्या पार्टीचे जे जिल्ह्याचे नेते आहेत, ते वारंवार जे नरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न करत होते. त्यात पहिला नरेटिव्ह हा होता की, जो कोणी जतचा आमदार आहे, तो जिल्हा बँकेच्या निवडणुकीला उभा राहिला तर तो पडतो. तर तो इथे पडला, तर तो विधानसभेलाही पडतो. हा जतचा इतिहास आहे. आणि ते असेच म्हणत होते. पण याच जतच्या जनतेने हा इतिहास मोडीत काढला.
जनतेचं जेव्हा प्रेम असतं, जनतेचं जेव्हा पाठबळ असतं, जनतेचा जेव्हा आशीर्वाद असतो, तेव्हा मोठमोठ्या पैसावाल्यांचा पराभव होतो. हेच उदाहरण आजच्या निवडणूक निकालाचे आहे. तसेच जिल्हा बँक एकहाती ठेवायची, लोकांना नागवायचं, त्यांच्या संस्था मोडीत काढायच्या, त्यानंतर कवडीमोल भावाने विकत घ्यायच्या. याला आता खीळ बसणार आहे. तर येथून पुढे सभासदांच्याच हिताचे निर्णय होतील, असे म्हणत जयंत पाटील यांचा जतच्या जनतेनं टप्प्यात आणून करेक्ट कार्यक्रम केला,” अशी टीका करत त्यांनी विजयाचे श्रेय मतदारांना दिले. त्यांच्या या वक्तव्यामुळे दोन्ही नेत्यांमधील राजकीय संघर्षाला पुन्हा एकदा धार आली आहे. अशातच पडळकर यांचा जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये एकतर्फी विजय झाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पडळकर यांना फोन करून शुभेच्छा दिल्या आहेत.
तसेच या विजयानंतर आमदार सदाभाऊ खोत यांनी भाजपा आमदार पडळकर यांना चक्क खांद्यावर घेत जल्लोष केला आहे. मिरज येथील मतदान केंद्रावर गोपीचंद पडळकर समर्थकांकडून एकच जल्लोष सुरू असताना आमदार सदाभाऊ खोत यांची देखील एंट्री झाली आणि त्यानंतर सदाभाऊ खोत यांनी जल्लोष करत गोपीचंद पडळकर यांना खांद्यावर घेत मतदान केंद्राच्या बाहेर नेलं. यावेळी पडळकर यांनी डोळ्यावर गॉगल लावत, डॉन गाण्यावर ठेका धरला. दरम्यान न्यायालयीन प्रक्रियेपासून ते मतदान आणि निकालापर्यंत चर्चेत राहिलेल्या या निवडणुकीत पडळकर यांनी विजय मिळवल्याने सांगलीच्या सहकार आणि राजकारणात नव्या चर्चांना सुरुवात झाली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.