

Sangli News : सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीचा निकाल जाहीर होताच जिल्ह्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. निवडणुकीत महायुतीच्या नेत्यांना यश मिळाल्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि आमदार जयंत पाटील यांच्यावर टीकेची झोड उठू लागली आहे. भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी निकालानंतर जयंत पाटलांना लक्ष्य केले होते. त्यानंतर माजी मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अजितराव घोरपडे यांनीही त्यांच्यावर निशाणा साधला आहे. जिल्हा बँकेच्या निवडणुकीत आपल्याविरोधात षडयंत्र रचण्यात आल्याचा आरोप घोरपडे यांनी केला. त्यामुळे बँकेच्या निवडणुकीनंतर सांगलीतील राजकीय संघर्षाला नवे वळण मिळाले आहे.
सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सहा जागांसाठी निवडणूक झाली होती. मिरज येथील बाजार समितीच्या शेतकरी भवनात मतमोजणी पार पडली. या निकालाकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले होते. विकास सोसायटी गटातून भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर, माजी खासदार संजयकाका पाटील, माजी मंत्री अजितराव घोरपडे आणि आण्णासाहेब कोरे यांनी विजय मिळवला. राखीव प्रवर्गातून विमुक्त जाती, भटक्या जमाती किंवा विशेष मागासवर्ग गटात संभाजी कचरे, तर अनुसूचित जाती किंवा अनुसूचित जमाती गटातून कृष्णा कांबळे विजयी झाले. यापूर्वीच २१ पैकी १५ जागा बिनविरोध झाल्या होत्या.
'माझ्याविरोधात षडयंत्र रचले, पण ते यशस्वी झाले नाही'; घोरपडेंचा आरोप
कवठेमहांकाळ विकास सोसायटी गटातून विजय मिळवल्यानंतर अजितराव घोरपडे यांनी निवडणूक प्रक्रियेवर भाष्य केले. आपल्याविरोधात जिल्हा बँकेच्या निवडणुकीत षडयंत्र रचण्यात आले होते, असा दावा त्यांनी केला. मात्र, हे षडयंत्र यशस्वी झाले नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. “माझ्याबाबत जिल्हा बँकेच्या निवडणुकीत षडयंत्र केले गेले. वरून ऑर्डर होती. मात्र, जे व्हायचे होते तेच झाले,” अशा आशयाची प्रतिक्रिया घोरपडे यांनी दिली. त्यांच्या या विधानातून त्यांनी अप्रत्यक्षपणे आमदार जयंत पाटील यांच्यावर निशाणा साधल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.
जिल्हा बँकेच्या निवडणुकीत महायुतीचे पारडे जड झाल्याचा दावा करत या निकालाचे परिणाम अन्य पक्षांवरही होतील, असा इशाराही घोरपडे यांनी दिला. कवठेमहांकाळ मतदारसंघात अजितराव घोरपडे आणि राष्ट्रवादीचे टी. व्ही. पाटील यांच्यात लढत झाली होती. या अटीतटीच्या लढतीत घोरपडे यांनी चार मतांनी विजय मिळवला.
पडळकरांची जयंत पाटलांवर खोचक टीका
दुसरीकडे, जत विकास सोसायटी गटातून विजय मिळवल्यानंतर भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनीही जयंत पाटील यांच्यावर उपरोधिक शब्दांत टीका केली. “जतच्या जनतेने टप्प्यात आणून करेक्ट कार्यक्रम केला,” अशी खोचक प्रतिक्रिया त्यांनी दिली. या निवडणुकीत पडळकर यांना ५४ मते मिळाली, तर त्यांचे प्रतिस्पर्धी विनोद पवार यांना ३४ मते मिळाली. त्यामुळे पडळकर यांनी २० मतांनी विजय मिळवला. हा विजय गोरगरीब जनतेचा असल्याचे सांगत पडळकर यांनी जिल्हा बँकेला राजकारणाचा अड्डा बनू देणार नसल्याचे म्हटले. तसेच बँकेच्या कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांसाठी काम करण्याचा निर्धारही त्यांनी व्यक्त केला.
सदाभाऊ खोत यांनी पडळकरांना खांद्यावर घेत केला जल्लोष
पडळकर यांच्या विजयानंतर मिरज येथील मतमोजणी केंद्राबाहेर समर्थकांनी मोठा जल्लोष केला. यावेळी आमदार सदाभाऊ खोत यांनीही जल्लोषात सहभाग घेतला. त्यांनी पडळकर यांना थेट खांद्यावर उचलून घेत केंद्राबाहेर आणले. या विजयाचा आनंद साजरा करताना पडळकर यांनी डोळ्यांवर गॉगल चढवला आणि 'डॉन' गाण्यावर ठेका धरला. या जल्लोषाचे दृश्यही चर्चेचा विषय ठरले. न्यायालयीन प्रक्रियेपासून मतदान आणि निकालापर्यंत चर्चेत राहिलेल्या सांगली जिल्हा बँकेच्या निवडणुकीत महायुतीच्या नेत्यांनी महत्त्वाच्या जागांवर विजय मिळवला आहे. निकालानंतर घोरपडे आणि पडळकर यांनी जयंत पाटलांवर केलेल्या टीकेमुळे सांगलीतील सहकार क्षेत्रासोबतच जिल्ह्याच्या राजकारणातही नव्या संघर्षाची चिन्हे दिसू लागली आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.