Sangli District Bank Election Winners List : सांगली जिल्हा बँकेच्या विजयी उमेदवारांची यादी एका क्लिकवर; पडळकर, संजय पाटलांसह ६ जणांची बँकेत एन्ट्री

Sangli District Bank Election : सांगली जिल्हा बँकेच्या निवडणुकीत तब्बल १५ जागा बिनविरोध झाल्यानंतर सहा जागांसाठी निवडणूक झाली होती. ज्यात विद्यमान आमदारांसह माजी मंत्री, माजी आमदार आणि खासदारांची प्रतिष्ठापणाला लागली होती.
Sangli District Bank
Sangli District BankSarkarnama
Published on: 
Updated on: 

Sangli News : संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेल्या सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत अखेर सहा जागांचे निकाल जाहीर झाले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप आणि शिवसेनेच्या प्रमुख नेत्यांमध्ये झालेल्या राजकीय समन्वयामुळे २१ पैकी १५ जागा यापूर्वीच बिनविरोध झाल्या होत्या. त्यामुळे उर्वरित सहा जागांसाठी निवडणूक झाली. या सहा जागांसाठी १४ उमेदवार मैदानात होते. मंगळवारी (ता. ३) झालेल्या मतमोजणीत आमदार गोपीचंद पडळकर आणि माजी खासदार संजयकाका पाटील यांनी विजय मिळवला. तर माजी आमदार सुमन पाटील यांना अवघ्या एका मताने पराभव स्वीकारावा लागला.

मिरज येथील मार्केट यार्डातील शेतकरी भवन येथे मंगळवारी सकाळी आठ वाजता मतमोजणीला सुरुवात झाली. आठ टेबलवर २५ कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून मतमोजणी प्रक्रिया पार पडली. सहा जागांसाठी झालेल्या या निवडणुकीत विशेषतः विकास सोसायटी गटातील चार मतदारसंघांच्या निकालाकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले होते. जत, कवठेमहांकाळ, तासगाव आणि मिरज या चारही ठिकाणी चुरशीची लढत पाहायला मिळाली.

कवठेमहांकाळ विकास सोसायटी गटातून माजी मंत्री अजितराव घोरपडे यांनी विजय मिळवला. जत मतदारसंघातून आमदार गोपीचंद पडळकर विजयी झाले. तासगावमधून माजी खासदार संजयकाका पाटील यांनी बाजी मारली, तर मिरज विकास सोसायटी गटातून आण्णासाहेब कोरे यांनी विजय मिळवला. याशिवाय विमुक्त जाती, भटक्या जमाती किंवा विशेष मागासवर्ग प्रवर्गातून संभाजी कचरे आणि अनुसूचित जाती किंवा अनुसूचित जमाती प्रवर्गातून कृष्णा कांबळे यांनी विजय मिळवला.

Sangli District Bank
Sangli District Bank Election : सांगली जिल्हा बँकेत पडळकरांना रोखण्यासाठी भाजपमधूनच फिल्डिंग? 88 मतदार फिरवणार खरा गेम

तासगावमध्ये सुमन पाटील यांचा एका मताने पराभव

तासगाव मतदारसंघातील लढत अत्यंत अटीतटीची ठरली. येथे माजी आमदार सुमन पाटील आणि माजी खासदार संजयकाका पाटील यांच्यात प्रतिष्ठेची लढत झाली. एकूण ७८ वैध मतांपैकी संजयकाका पाटील यांना ४०, तर सुमन पाटील यांना ३८ मते मिळाली. अवघ्या एका मताच्या फरकाने विजय मिळवत संजयकाका पाटील यांनी तासगावमधील लढतीत बाजी मारली. या निवडणुकीत आमदार रोहित पाटील यांच्यासह संजयकाका पाटील यांचीही प्रतिष्ठा पणाला लागली होती.

जत मतदारसंघात पडळकरांचा २० मतांनी विजय

जत विकास सोसायटी गटातील निवडणूकही विशेष चर्चेत राहिली. आमदार गोपीचंद पडळकर यांच्याविरोधात विनोद पवार यांनी आव्हान उभे केले होते. मात्र, पडळकर यांनी ५४ मते मिळवत ३४ मते मिळवणाऱ्या विनोद पवार यांचा २० मतांनी पराभव केला. या निकालामुळे जत मतदारसंघातील राजकीय समीकरणांमध्ये पडळकर यांचे वर्चस्व पुन्हा अधोरेखित झाले.

सहा विजयी उमेदवारांची यादी

गट अ)

१) आमदार गोपीचंद पडळकर

२) माजी खासदार संजयकाका पाटील

३) माजी मंत्री अजितराव घोरपडे

४) आण्णासाहेब कोरे

गट - राखीव

१) संभाजी कचरे

२) कृष्णा कांबळे

बिनविरोध निवडून आले उमेदवार

आमदार विश्वजित कदम, महेंद्र लाड, देवराज पाटील, विराज नाईक, तानाजी पाटील, राहुल महाडिक, पृथ्वीराज पाटील, सतीश देशमुख, रणधीर नाईक, वैभव शिंदे, अमोल बाबर, पूजा विशाल पाटील, वर्षा विक्रम सावंत, अपर्णा संग्रामसिंह देशमुख आणि नितीन होनराव

सांगली जिल्हा बँकेतील पक्षीय बलाबल पुढीलप्रमाणे

राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) – ४

काँग्रेस – ६

भाजप – ५

शिवसेना (एकनाथ शिंदे गट) – ३

राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) – ३

Sangli District Bank
Sangli District Bank Election : 'वसंत’ बंगल्यावर जयंत पाटलांची मुत्सद्देगिरी; सांगली जिल्हा बँकेच्या 15 जागा बिनविरोध करण्यासाठी जुळवलेल्या राजकीय समीकरणांची Inside Story

१५ जागा बिनविरोध आणि उर्वरित सहा जागांसाठी झालेल्या निवडणुकीनंतर बँकेच्या संचालक मंडळाचे चित्र स्पष्ट झाले आहे. या निकालामुळे सांगली जिल्ह्यातील सहकार क्षेत्रातील राजकीय समीकरणांना नवे वळण मिळण्याची शक्यता आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.