

Satara DCC Bank : सातारा जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीत भाजपने महायुतीचा नारा दिलेला असतानाही राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेच्या नेत्यांनी मात्र, आपली भूमिका गुलदस्त्यात ठेवत आगे आगे देखो... होता है क्या! असा पवित्रा घेतला आहे. जिल्हा बँक आजही राष्ट्रवादीच्या ताब्यात आहे, ती तशीच कायम राहावी, यासाठी प्रयत्न होण्याची शक्यता आहे. त्यात पालकमंत्री शंभूराज देसाई कोणते पत्ते ओपन करणार? याकडे सर्वांचे लक्ष लागणार आहे.
जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीत सुरुवातीला भारतीय जनता पक्षाचे नेते अधिकच आक्रमक झाले होते. मात्र, निवडणूक कार्यक्रम सुरू झाल्यानंतर त्यांनी महायुतीच्या माध्यमातून सर्वांना आपल्या पंखाखाली आणण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. सार्वजनिक बांधकाममंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, ग्रामविकासमंत्री जयकुमार गोरे, खासदार उदयनराजे भोसले, आमदार धैर्यशील कदम, मनोज घोरपडे, डॉ. अतुल भोसले यांनी राष्ट्रवादीच्या नेत्यांसोबत बँकेत एकतर्फी करण्यासाठी पाऊल टाकले आहे. त्यासाठी प्रमुख नेत्यांची खलबतेही झाली आहेत. त्यातून ‘महायुती’चा नाराही झाला आहे.
पण कळीचा मुद्दा ठरणार आहे, तो जिल्हा परिषदेतील सत्तानाट्याचा. राष्ट्रवादी व शिवसेनेच्या नेत्यांच्या मनातील ती सल आजही दिसून येते. त्यामुळे आगे आगे देखो... होता है क्या... अशी भूमिका घेण्याच्याच तयारीत ते दिसत आहेत. गेल्या दोन- चार बैठकांना शिवसेनेचे नेते व पालकमंत्री शंभूराज देसाई हे उपस्थित नाहीत. मागील निवडणुकीत देसाईंना दिलेला शब्द जिल्हा बॅंकेतील नेत्यांनी पाळलेला नव्हता. तीही खंत त्यांच्या मनात असणारच आहे. त्यामुळे आगामी एक दोन दिवसांत अनेक घडामोडी घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.
यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार नितीन पाटील, ग्रामविकासमंत्री मकरंद पाटील आणि शिवसेनेचे नेते व पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी रणनीती आखण्याची तयारी केली आहे. पालकमंत्री देसाई महायुतीचा धर्म पाळत सर्व पक्षांना सामावून घेण्याच्या भाजपच्या नेत्यांच्या भूमिकेला पाठिंबा देणार, की स्थानिक कार्यकर्त्यांच्या आकांक्षांना प्राधान्य देऊन वेगळा राजकीय डाव टाकणार, यावरच बँकेच्या निवडणुकीतील पुढील गणिते अवलंबून असतील. त्यामुळे सध्यातरी राष्ट्रवादी व शिवसेनेच्या नेत्यांनी वेट ॲण्ड वॉचची भूमिका घेतल्याचे चित्र आहे.
आजवर राष्ट्रवादीची पकड
आजपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेसची पारंपरिक पकड जिल्हा बँकेवर राहिली आहे आणि ती कायम राखण्यासाठी ते सहजासहजी माघार घेणार नाहीत. अशा वेळी भाजपच्या आक्रमक भूमिकेला स्थानिक नेते कसे शह देतात, पालकमंत्री शंभूराज देसाई कोणती भूमिका घेतात यास महत्त्व आले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.