

Satara DCC Bank News: सातारा जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या संघर्षानंतर आता जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदावरून महायुतीत नव्या राजकीय संघर्षाचे संकेत मिळू लागले आहेत. सातारा जिल्हा बँकेचा अध्यक्ष भाजपचाच असेल, अशी ठाम भूमिका ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी मांडल्याने महायुतीतील मित्रपक्षांसमोर नवी राजकीय कोंडी निर्माण झाली.
युती झाली तर एकत्रित, अन्यथा भाजप स्वतंत्र लढेल, असा स्पष्ट इशाराही त्यांनी दिल्याने साताऱ्यातील महायुतीच्या एकजुटीवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सहकाराच्या सत्ताकेंद्रावर वर्चस्व कोणाचे राहणार, याची उत्सुकता लागली आहे.
पुणे शिक्षक व पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुती उमेदवारांच्या प्रचारार्थ बैठक झाली. त्यासाठी भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, मंत्री गोरे, खासदार उदयनराजे भोसले, मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, आमदार डॉ. अतुल भोसले, आमदार मनोज घोरपडे, आमदार धैर्यशील कदम यांची उपस्थिती होती. त्या बैठकीनंतर मंत्री गोरेंनी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदाबाबत भूमिका स्पष्ट केली.
सातारा जिल्हापरिषदेच्या निवडणुकीत अध्यक्षपदाच्या निवडीवेळी महायुतीमध्ये संघर्ष पाहायला मिळाला होता. त्या वेळी भाजपचाच अध्यक्ष होईल, अशी ठाम भूमिका मंत्री गोरेंनी घेतली होती. अखेर भाजपने अध्यक्षपद मिळविल्याने जिल्ह्यातील राजकीय वर्चस्वाच्या लढाईत पक्षाने आपले वर्चस्व दाखवले होते. या घडामोडींनंतर आता जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदावरही भाजपने दावा केल्याने सत्तेतील वाट्याचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
जिल्हा बँक ही केवळ आर्थिक संस्था नसून, ग्रामीण राजकारण, सहकार आणि स्थानिक नेतृत्वाच्या प्रभावाचे महत्त्वाचे केंद्र आहे. त्यामुळे अध्यक्षपदावरील दावेदारीला राजकीय महत्त्व प्राप्त झाले आहे. भाजपने या पदासाठी आक्रमक भूमिका घेतल्यास महायुतीतील अन्य घटक पक्षांची भूमिका काय राहणार? याकडे लक्ष राहणार आहे. सत्तेत एकत्र असताना पदवाटपावरून संघर्ष निर्माण झाल्यास त्याचे पडसाद आगामी निवडणुकांतही उमटू शकतात.
मंत्री गोरे यांच्या वक्तव्यामुळे भाजपने दबावतंत्राचा अवलंब केला, की पक्षाने स्वतंत्र राजकीय विस्ताराची रणनीती आखली, याबाबत चर्चा सुरू आहे. या भूमिकेवर मित्रपक्षांच्या पुढील वाटाघाटी महत्त्वाच्या ठरणार आहेत. त्यामुळे साताऱ्यात महायुतीतील मतभेदांची ठिणगी भडकणार, की राजकीय तडजोडीतून पॅचअप होणार, याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
सातारा जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदावर भाजपने दावा केल्याने महायुतीतील सत्तावाटपाचा प्रश्न पुन्हा चर्चेत आला आहे. जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडीवेळी भाजपने दाखवलेली आक्रमकता पाहता, बँकेच्या सत्तेसाठीही पक्ष माघार घेण्याच्या मनःस्थितीत नसल्याचे राजकीय संकेत मिळत आहेत. मात्र, जिल्ह्यातील सहकार क्षेत्रात अन्य घटकांचेही राजकीय हितसंबंध गुंतलेले आहेत. त्यामुळे भाजपची मागणी मित्रपक्षांना मान्य होणार, की पद वाटपावरून संघर्ष तीव्र होणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. युतीच्या माध्यमातून एकत्रित लढण्याचा पर्याय खुला असला, तरी स्वतंत्र लढण्याचा इशारा राजकीय दबाव वाढवणारा ठरू शकतो.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.