

Satara News : सातारा जिल्ह्यातील 11 पंचायत समित्यांमध्ये सत्तास्थापनेच्या हालचालींना वेग आला असून, फलटण, जावळी, माणमध्ये दोन्ही बाजूचे सदस्य समसमान असल्याने येथे ईश्वरी चिठ्ठीद्वारे सभापतिपद ठरणार आहे. कऱ्हाड, खटाव आणि सातारा पंचायत समितीत भाजपला, तर पाटणमध्ये शिवसेनेचे बहुमत आहे. वाई, खंडाळा, महाबळेश्वर, कोरेगावात राष्ट्रवादीला बहुमत असल्याने त्यांचाच सभापती होणार हे निश्चित आहे. पंचायत समिती सभापतींच्या निवडीसाठी आठवडा राहिल्याने पक्षीय पातळीवर हालचालींना वेग आला आहे. स्थानिक नेते ठरवतील, त्या सदस्याला सभापतिपदाची संधी मिळणार आहे.
येत्या 16 मार्चला जिल्ह्यातील पंचायत समितींच्या सभापती, उपसभापती, तर जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्षांच्या निवडी 20 मार्चला होणार आहेत. त्यामुळे राजकीय पक्षांची गोळाबेरीज करण्यासाठी हालचाली सुरू झाल्या आहेत. निवडणुकीत जिल्ह्यातील वाई, खंडाळा आणि कोरेगाव या पंचायत समित्यांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला स्पष्ट बहुमत मिळाले आहे. त्यामुळे या ठिकाणी राष्ट्रवादीचा सभापती होणार हे निश्चित आहे.
दुसरीकडे सातारा, खटाव आणि कऱ्हाड या पंचायत समित्यांमध्ये भाजपचे वर्चस्व असल्याने त्या ठिकाणी भाजपचा सभापती होणार आहे, तर पाटण पंचायत समितीत शिवसेनेचे वर्चस्व असल्याने त्यांचा सभापती होणार आहे. मात्र, महाबळेश्वर, जावळी, माण आणि फलटण या पंचायत समित्यांमध्ये सत्तेचे समीकरण अजूनही स्पष्ट झालेले नाही. यातील जावळी, फलटण आणि माणमध्ये ईश्वरी चिठ्ठीद्वारे सभापती ठरणार आहे. त्यामुळे या ठिकाणी राजकीय हालचालींना गती आली आहे.
महाबळेश्वर मध्ये शिवसेनेचे दोन व राष्ट्रवादीचे दोन सदस्य निवडून आलेले आहेत. सभापतिपद इतर मागास प्रवर्गासाठी राखीव आहे. या प्रवर्गातील सदस्य राष्ट्रवादीचा निवडून आलेला आहे; पण समान संख्याबळ असल्याने चिठ्ठीद्वारे निवड होत असली, तरी आरक्षणाचा उमेदवार राष्ट्रवादीकडे असल्याने येथे चिठ्ठी कोणाला साथ देणार याची उत्सुकता आहे. जावळीत राष्ट्रवादी व शिवसेनेला समान सदस्य मिळालेले असून, सभापतिपद खुले असल्याने ईश्वरी चिठ्ठी कोणाला साथ देणार याची उत्सुकता आहे. दोन्ही ठिकाणी राष्ट्रवादी आणि शिवसेना एकत्र येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
माण आणि फलटण पंचायत समित्यांमध्ये सत्ता स्थापनेसाठी हायहोल्टेज ड्रामा रंगणार आहे. फलटणमध्ये शिवसेना आणि भाजप, राष्ट्रवादी युतीच्या एकत्रित आठ सदस्यांवर समसमान आहेत, तर माण पंचायत समितीत राष्ट्रवादी आणि भाजपचे प्रत्येकी 5 सदस्य निवडून आले आहेत. दोन्ही ठिकाणी टाय झाल्यामुळे सत्तास्थापनेसाठी ‘ईश्वरचिठ्ठी’चा आधार घ्यावा लागत आहे. त्यामुळे या दोन पंचायत समित्यांकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
खंडाळा : सर्वसाधारण महिला
फलटण : नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला
वाई : सर्वसाधारण
महाबळेश्वर : नागरिकांचा मागास प्रवर्ग
जावळी : सर्वसाधारण
सातारा : सर्वसाधारण
कोरेगाव : नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला
माण : सर्वसाधारण
खटाव : अनुसूचित जाती महिला
पाटण : सर्वसाधारण महिला
कऱ्हाड : सर्वसाधारण महिला
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.