कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोली पुलाची या जिल्हा परिषद मतदार संघाकडे सर्व जिल्ह्याचे लक्ष लागलेले असते. याच मतदारसंघात माजी आमदार महादेवराव महाडिक, आमदार अमल महाडिक, गोकुळच्या संचालिका शौमिका महाडिक यांचे होमपीच आहे. महाडिकांच्या याच होमपीचवर आता विरोधकांना आपली सत्ता ठेवण्यासाठी नामी संधी चालून आली आहे.
शिरोली पुलाची या जिल्हा परिषद मतदार संघावर ओबीसी पुरुष असे आरक्षण जाहीर झाल्याने महाडिक यांच्या कुटुंबातील कोणीच या ठिकाणी निवडणुकीच्या रिंगणात नसणार आहे. या मतदारसंघाचा इतिहास पाहता महाडिक घराण्यातील उमेदवार नसल्यास विरोधी आघाडीला यश मिळाले आहे. त्यामुळे विरोधी आघाडीने जोरदार प्रयत्न सुरू केलेत. त्यामुळे आता महाडिक घराण्याची प्रतिष्ठा पणाला लागणार आहे.
शिरोली पुलाची जिल्हा परिषद मतदारसंघात ओबीसी पुरुष असे आरक्षण जाहीर झाले आहे. या जिल्हा परिषद मतदारसंघात शिरोली, नागाव, टोप प्रभाग सहा, संभापूर व सोनार्ली वसाहत या गावांचा समावेश आहे. १९९७ ते २०१२ या काळात या जिल्हा परिषद मतदारसंघात महाडिकविरोधी शाहू स्वाभिमानी आघाडीची सत्ता होती. जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत महाडिक आघाडीला अपयश आले असले तरी ग्रामपंचायतीची सत्ता मात्र महाडिक यांच्याच हाती असे. २०१२ मध्ये या सत्तेला आमदार महाडिक यांनी खिंडार पाडत काँग्रेसच्या तिकिटावर अमल महाडिक यांना विजय मिळवून दिला.
२०१४ मध्ये अमल महाडिक भाजपमध्ये दाखल होऊन दक्षिणचे आमदार झाले. यानंतर पोटनिवडणुकीत शौमिका महाडिक विजयी झाल्या. २०१७ च्या निवडणुकीत भाजपकडून शौमिका महाडिक, तर काँग्रेसकडून सुचित्रा खवरे व रूपाली खवरे या शाहू आघाडीच्या उमेदवार मैदानात उतरल्या.
आमदार सतेज पाटील यांनी खवरे बंधू यांना एकत्र आणून महाडिक यांच्या विरोधात एकच उमेदवार देण्याचा प्रयत्न केला होता, मात्र एकमत न झाल्याने निवडणूक तिरंगी झाली आणि मतविभाजन झाले. त्याचा फायदा शौमिका यांना झाला. त्या या मतदारसंघातून विजयी झाल्या आणि पुढे जिल्हा परिषदेच्या भाजपमधून अध्यक्ष बनल्या.
जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाडिक विरोधक पुन्हा एकत्र येऊन शाहू आघाडीच्या माध्यमातून ताकदीने लढण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. त्याचबरोबर महाडिक विरोधकांची एकी होऊ नये, यासाठी महाडिक गटाचे प्रयत्न आहेत. महाडिक यांचा प्रभाव कमी करण्यासाठी विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील यांनी 'महाडिक विरोधी' गट एकत्र आणण्यासाठी पुढाकार घेतल्याची माहिती आहे.
यावेळी मतदारसंघ ओबीसी झाल्याने महाडिकविरोधी गटात आनंदाचे वातावरण आहे. परंतु यावेळी विरोधी गट एकत्र येणार की पुन्हा २०१७ ची पुनरावृत्ती होणार याबाबत उत्सुकता आहे. मतदारसंघात महायुतीतील भाजप वगळता इतर घटकांचे शिवसेना शिंदे गट, राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्राबल्य अत्यल्प आहे. तर जनसुराज्य शक्ती पक्षाकडे निर्णायक मत आहेत. तर महाविकास आघाडीतील काँग्रेस व शिवसेना ठाकरे पक्षाचे प्राबल्य आहे. लढत पक्षीय पातळीवर महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी राहणार, की महाडिक गट विरुद्ध महाडिकविरोधी आघाडी अशी, हे काही दिवसांत स्पष्ट होईल.
विरोधी गट एकत्र आणण्यास सतेज पाटील यांचा पुढाकार या मतदारसंघात या निवडणुकीत महाडिक यांना शह देण्यासाठी ते माजी सरपंच शशिकांत खवरे यांना निवडणूक रिंगणात उतरण्याची शक्यता नाकारता येत नाही. खवरे उमेदवार असल्यास ही लढत पाटील विरुद्ध महाडिक अशी ठरण्याची चिन्हे आहेत. तसेच जनसुराज शक्ती पक्षाचे वारणा कारखान्याचे संचालक सुभाष ऊर्फ मामा पाटील कोणती भूमिका घेणार? हेही महत्त्वाचे ठरणार आहे.
महाडिक आघाडीकडून राहुल अष्टेकर, सलीम महात, अविनाश कोळी, राजेश्वरी राजेश पाटील, कमल प्रकाश कौंदाडे, चंद्रकांत कुंभार.
शाहू स्वाभिमानी आघाडीकडून- शशिकांत खवरे, महेश चव्हाण
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.