MLC Election : शरद लाडांची अवस्था ‘तेलही गेलं अन् तूपही गेलं’ : पुणे पदवीधरसाठी प्रचंड राबल्यानंतरही 'गेम' कुठे झाला?

Sharad Lad : पुणे पदवीधर मतदारसंघासाठी भाजपने शरद लाड यांच्याऐवजी स्मिता जाधव यांना उमेदवारी दिली. पंधरा वर्षांची तयारी आणि मतदार नोंदणीची मशागत करूनही लाडांना संधी का मिळाली नाही, याची चर्चा सुरू आहे.
Sharad Lad | Arun Lad | G D Lad
Sharad Lad | Arun Lad | G D LadSarkarnama
Published on: 
Updated on: 

MLC Election : डाव्या विचारांचा वारसा असलेल्या लाड कुटुंबातील तिसरी पिढी म्हणजे शरद लाड. पुणे पदवीधर मतदारसंघातून भाजपची उमेदवारी मिळवण्यासाठी त्यांनी ‘उजवी चाल’ खेळली. वडील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे विद्यमान आमदार असताना त्यांनी भाजपात प्रवेश करून स्वतःसाठी ‘राजमार्ग’ शोधण्याचा प्रयत्न केला, मात्र ती चाल त्यांच्या अंगलट आली आहे. भाजपने शरद लाड यांना डावलले आहे. तयारी असूनही ‘बंड’ करता येत नाही, ही आता लाडांची अडचण आहे. कारण, भाजपात असले ‘लाड’ सहन केले जात नाहीत. त्यामुळे भाजपसोबत राहणं, ही त्यांची अपरिहार्यता असेल.

पुणे पदवीधर मतदारसंघाच्या भाजपच्या उमेदवार म्हणून स्मिता जाधव यांची उमेदवारी रविवारी जाहीर झाली. त्याआधी दोन दिवस शरद लाड यांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत फोटो व्हायरल झाला. त्यात शरद यांच्या चेहऱ्यावरचे भाव त्यांचा ‘कटी पतंग’ झाल्याचे सांगणारे होते. त्यांना उमेदवारी का डावलली गेली, याचे उत्तर कदाचित देवेंद्र फडणवीस यांनी दिले असेल. ती कारण काय असतील बरं, असा प्रश्न आता लाडांच्या समर्थकांना पडलेला आहे. कारण, गेल्या पंधरा वर्षांत पुणे पदवीधर मतदार संघात सर्वाधिक मशागत लाडांनी केली. मतदार नोंदणीपासून संपर्क मोहिमांपर्यंत त्यांची यंत्रणा सतत कामात होती. मग काय चुकलं बरं! शरद लाडांनाच माहिती.

वडील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार असताना शरद लाड यांनी भाजप प्रवेश केला, तिथेच गणितं चुकली, असे आता राजकीय जाणकार सांगत आहेत. कारण, लाड कुटुंबाला डाव्या विचारांचा वारसा आहे. त्यांचे आजोबा क्रांतीअग्रणी जी. डी. बापू लाड हे थोर स्वातंत्र्य सेनानी होते. वडिलांसह चुलतेही त्याच विचारांचे. वडिलांनी डाव्या पक्षातून राष्ट्रवादीत प्रवेश केला तेंव्हादेखील त्यांच्यावर टीका झाली होती. आता तर शरद लाड यांनी थेट भाजपचे कमळ हाती घेतले आणि त्यांच्यापासून त्यांची हक्काची ‘डावी बाजू’ रिकामी झाली. साखर कारखाना आणि शासकीय निधीचे काही लाभार्थी वगळता ‘कणा’ असलेल्या अनेकांनी त्यांच्यापासून फारकत घेतली. हे घडणार, याची जाणीव असताना शरद लाड भाजपात का बरं गेले? त्याचे कारण म्हणजे, भाजप येण-केण प्रकारे पुणे पदवीधर मतदार संघाची निवडणूक जिंकण्यासाठी प्रयत्न करणार, त्यासाठी साम-दाम-दंड-भेद सारे करणार, याची त्यांना जाणीव असावी. ते राष्ट्रवादी शरद पवार पक्षाकडून लढले असते तर काय... याचे उत्तर त्यांनी कधी दिले नाही. त्याचे उत्तर शोधण्याआधीच सांगलीचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी त्यांच्या गळ्यात गमचा घातला होता. आता उमेदवारी डावलली गेल्यानंतर कदाचित शरद लाड त्या प्रश्नाचे उत्तर शोधतील. अर्थात, ते सापडले तरी काही उपयोग नाही, हे वास्तव आहे.

Sharad Lad | Arun Lad | G D Lad
BJP MLC Candidate : पुणे पदवीधरमध्ये भाजपचे धक्कातंत्र : शेवटच्या क्षणी नवीन चेहर्‍याला उमेदवारी; शरद लाड यांचा राजकीय बळी

पदवीधरची निवड का?

लाड हे कुंडल गावचे. हा परिसर पलूस कडेगाव विधानसभा मतदारसंघात येतो. या ठिकाणी स्व. पतंगराव कदम यांच्या कुटुंबीयांचा राजकीय प्रभाव दांडगा आहे. त्यामुळे आमदार व्हायचे झाले तर विधानसभा हा पर्याय लाडांसाठी अडचणीचा. त्यामुळे त्यांनी बलाढ्य कदमांशी टक्कर न घेता आमदार होण्यासाठी पदवीधर मतदार संघाचा मार्ग स्विकारला. शरद लाड यांचे वडील आमदार अरुण लाड यांनी बारा-पंधरा वर्षे आधी पुणे पदवीधर मतदार संघासाठी बांधणी सुरु केली. या आधीच्या निवडणुकीत तेच राष्ट्रवादीकडून दावेदार होते. परंतु ऐनवेळेला सारंग श्रीनिवास पाटील यांना राष्ट्रवादीने उमेदवारी दिली. लाड यांना बंडखोरी करावी लागले. त्यांनी चांगली मते घेतली मात्र पराभव पत्करावा लागला. गेल्या निवडणुकीत मात्र शरद पवार यांनी चूक सुधारली आणि अरुण लाड यांना उमेदवारी दिली. लाडांची तयारी मोठी असल्याने भाजपकडून लढायला कोणीच मातब्बर तयार नव्हते. भाजपने उमेदवारी संग्रामसिंह देशमुखांना दिली. संग्रामसिंग देशमुख यांचा पराभव करत अरुण लाड आमदार झाले. या निवडणुकीमुळे या मतदार संघातील देशमुख-लाडांची छुपी युती मात्र संपुष्टात आली. अर्थात, अरुण लाड यांना उमेदवारी देताना कागलचे भैय्या माने यांनी ताकदीने विरोध केला होता. माने तेंव्हा इच्छुक होते. अरुण लाड यांनी त्यावेळी ‘ही माझी शेवटची निवडणूक असेल, पुढच्या वेळी तुम्ही लढा’ असा शब्द दिला होता, असा आरोप करत माने यांनी लाडांना ‘आता थांबा’, असे आवाहन केले होते.तरीही शरद लाड हे भाजपकडून उमेदवारी मिळवण्यासाठी आग्रही दिसत होते.

Sharad Lad | Arun Lad | G D Lad
Pune Graduate MLC Election : पुणे पदवीधरमध्ये शरद पवारांच्या उमेदवाराबद्दल प्रचंड सस्पेन्स : हर्षदा देशमुखांना AB फॉर्मच नाही, भैय्या मानेंच्या एन्ट्रीसाठी वेटिंग?

भवितव्य काय?

शरद लाड सध्या क्रांती सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष आहेत. ते जिल्हा परिषद सदस्य आणि विरोधी पक्षनेते होते. त्यांची आमदार व्हायची मनिषा काही लपून राहिलेली नाही. त्यांच्या या स्वप्नांचा मार्ग विधानसभाच्या आखाड्यातून जाणे तसे मुश्किल. कारण, पलूस-कडेगाव मतदार संघात कदम आणि देशमुखांचाच वरचष्मा आहे. लाडांना इथे विस्तारण्यास मर्यादा आहेत. आता शरद लाड यांना देवेंद्र फडणवीस यांनी काय शब्द दिला असेल, याबाबत निश्चितच उत्सुकता असणार आहे. ते तरुण आहेत. त्यांच्याकडे वेळ आहे, मात्र राजकारणात एकदा संधी हातून गेली की ती पुन्हा हाती येणे सोपे नसते, याची जाणीवदेखील त्यांना आहे. ‘डावा रस्ता’ सोडून ‘उजवे वळण’ घेतलेल्या लाडांचा आता नेमक्या कोणत्या मार्गाने वाटचाल सुरु राहते, हे पाहणे औत्सुक्याचे असणार आहे. आज घडीला मात्र शरद लाड यांची अवस्था तेलही गेलं, तूपही गेलं, हाती धुपाटणं आलं, अशी झाली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com