Mumbai : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून आयत्यावेळी सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ विधानसभा मतदारसंघातून उमेदवार बदलला आहे. माजी आमदार रमेश कदम यांच्या कन्या सिध्दी यांना जाहीर करण्यात आलेली उमेदवारी रद्द करण्यात आली आहे. याबाबतचे पत्र पक्षाकडून निवडणूक अधिकाऱ्यांना पाठवण्यात आले आहे.
शरद पवार यांच्या पक्षाकडून मागील आठवड्यात सिध्दी कदम यांची मोहोळमधून उमेदवारी जाहीर करण्यात आली होती. तरुण आणि उच्चशिक्षित असल्याने त्या या निवडणुकीत बाजी मारणार का, याबाबत उत्सुकता वाढली होती. मात्र, उमेदवारी जाहीर होताच पक्षातील स्थानिक पदाधिकाऱ्यांकडून विरोध सुरू झाला होता.
स्थानिक पदाधिकाऱ्यांनी सिध्दी यांची उमेदवारी रद्द करण्याची मागणी शरद पवारांकडे करण्यात आली होती. त्याची पवारांनी दखल घेतली आहे. पक्षाने निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना पत्र पाठवून सिध्दी कदम यांचा ए. बी. फॉर्म रद्द करण्याची विनंती केली आहे.
सिध्दी कदम यांच्या नावे अनावधानाने ए. बी. फॉर्म वितरीत करण्यात आल्याचे पक्षाने अधिकाऱ्यांना पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे. त्यांचा फॉर्म रद्द समजण्यात यावा आणि राजू ज्ञानू खरे यांच्या फॉर्मची नोंद करण्यात यावी, असे पत्रात नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे सिध्दी कदम यांच्याऐवजी आता राजू खरे हे मोहोळचे शरद पवार यांच्या पक्षाचे अधिकृत उमेदवार असतील हे स्पष्ट झाले आहे.
राजू खरे हे पंढरपुरातील असून उद्योजक म्हणून त्यांची ओळख आहे. त्यांनी युवा सेनेतून राजकारणाची सुरूवात केली. मागील काही वर्षांपासून ते मतदारसंघात सामाजिक कार्याच्या माध्यमातून सक्रीय आहेत. महिनाभरापुर्वीच त्यांनी शरद पवारांची भेट घेतल्याने त्यांच्या उमेदवारीबाबत चर्चा सुरू झाल्या होत्या.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.