प्रमिला चोरगी
Solapur, 26 October : सोलापूर दक्षिण मतदारसंघातून उमेदवारीसाठी चर्चेत असलेले सिद्धेश्वर परिवाराचे प्रमुख तथा सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याचे ज्येष्ठ संचालक धर्मराज काडादी यांच्या निवासस्थानी आज समर्थकांची बैठक झाली. त्या बैठकीत त्यांनी अनेक गौप्यस्फोट केले. निवडणुकीच्या रिंगणात मी नेत्यांच्या इच्छेखातर उतरलो आहे.
खासदार प्रणिती शिंदे यांनी महिनाभर उमेदवारीसाठी विचारणा केली. मात्र मी शांतच होतो. पण, ज्येष्ठ नेते शरद पवारांचा शब्द मी टाळू शकलो नाही, त्यामुळे पवार आणि सुशीलकुमार शिंदे हे दक्षिण सोलापूरबाबत जो निर्णय घेतील, तो मला मान्य असेल, असेही काडादी यांनी स्पष्ट केले.
काडादी यांच्या ‘गंगा निवास’ येथे शनिवारी (ता. 26 ऑक्टोबर) जनसंवाद सभेचे आयोजन करण्यात आले होते. त्या सभेत बोलताना धर्मराज काडादी (Dharmaraj Kadadi) यांनी निवडणुकीच्या राजकारणात उतरण्याचे कारण स्पष्ट केले. या सभेला काँग्रेस सोलापूर जिल्हा कार्याध्यक्ष सुरेश हसापुरे, शहराध्यक्ष चेतन नरोटे, राजशेखर शिवदारे, ॲड. मिलिंद थोबडे, हरिश पाटील, गुरुनाथ म्हेत्रे, बाळासाहेब शेळके यांच्यासह दक्षिण तालुक्यातील बहुसंख्य नेते उपस्थित होते.
गेल्या दहा वर्षांत व्यक्तिगत आणि राजकीय द्वेषातून मला त्रास देण्यात आला. त्या त्रासाला कंटाळून मी लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांच्या प्रचारात उतरलो. आपल्या सर्वांच्या सहकार्यातून प्रणिती शिंदे (Praniti Shinde) ह्या निवडून आल्या. काही मर्यादांमुळे मी राजकारणापासून मी कायम दूर राहिलो आहे, असेही काडादी यांनी स्पष्ट केले.
काडादी म्हणाले, विधानसभा उमेदवारीसंदर्भात खासदार प्रणिती शिंदे यांनी मला महिनाभर विचारणा केली. मात्र, त्यांना मी टाळले होते. मात्र, ज्येष्ठ नेते शरद पवारांनी (Sharad Pawar) फोन करून मला मुलाखतीला बोलावले, त्यांचा शब्द मी टाळू शकलो नाही. तब्येतीच्या कारणामुळे मला उमेदवारी नको म्हणून दुसऱ्यांदा पवारांची भेट घेतली. पण त्यांनी माझं ऐकून न घेता तयारी करण्याची सूचना केली, त्यामुळे मी निवडणुकीच्या रिंगणात उतरलो आहे.
पाडापाडीच्या राजकारणात मला रस नाही, त्यामुळे विधानसभेची उमेदवारी मागण्यासाठी मी कोणाकडेही जाणार नाही. मला कोणत्याही पदाची अपेक्षा नाही. जनतेची श्रध्दा हेच माझे सर्वात मोठे पद आहे. दक्षिण सोलापूर मतदारसंघाचा उमेदवार हे ज्येष्ठ नेते शरद पवार आणि सुशीलकुमार शिंदे ठरवतील, असेही त्यांनी स्पष्ट केले.
अमर पाटील आपलाच : काडादी
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून दक्षिण सोलापूर मतदारसंघातून उमेदवारी जाहीर झालेले अमर पाटील यांनी काडादी यांची भेट घेतली होती. त्या भेटीनंतर पाटील समर्थकांकडून काडादी यांचा आपल्याला पाठिंबा अशा पोस्ट व्हायरल झाल्या होत्या. त्यावर काडादी म्हणाले, अमर पाटील हे आपलेच आहेत. सिद्धेश्चर सहकरी साखर कारखान्यात ते संचालक आहेत. त्यांच्या उमेदवारीला माझा विरोध असण्याचे कारणच नाही.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.