Mumbai, 08 July : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या प्रवक्त्या प्रा. डॉ. ज्योती वाघमारे यांच्यावर राज्य सरकारच्या योजनांचा प्रसार आणि प्रचार करण्याची मोठी जबाबदारी सोपवली आहे. सरकारच्या वतीने विविध जनकल्याणकारी योजना राबविण्यात येतात. त्या योजनांची माहिती सर्वसामान्यांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्यासाठी मुख्यमंत्री जनकल्याण कक्षात राज्य प्रचार व प्रसार समन्वयकपदी डॉ वाघमारे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
प्रा. डॉ. ज्योती वाघमारे (Dr. Jyoti Waghmare) या सोलापूरच्या (Solapur) असून सुमारे दीड वर्षापूर्वी त्यांची शिवसेनेच्या (Shivsena) राज्य प्रवक्तेपदी निवड करण्यात आली होती. ठाकरे गटाकडून होणारे हल्ले ज्योती वाघमारे यांनी तेवढ्याच ताकदीने उत्तर देत परतवून लावले आहेत. याशिवाय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे प्रमुख असलेल्या शिवसेनेची सर्व ध्येय धोरणे प्रभावीपणे जनतेपर्यंत पोहोचविण्याचे काम त्यांनी केले आहे.
महायुती सरकारची धोरणे आणि योजना तळागाळापर्यंत पोहोचवताना त्यांनी विरोधक म्हणजे महविकास आघाडीच्या नेत्यांना सडेतोड उत्तरे दिली आहेत. लोकसभेच्या निवडणुकीतही ज्योती वाघमारे यांनी राज्यात जवळपास ५३ सभा घेतल्या आहेत. राज्यात त्यांनी झंझावती प्रचार दौरे केले होते.
पक्षासाठीचे त्यांचे काम पाहून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ज्योती वाघमारे यांची राज्य सरकारच्या प्रचार व प्रसार समन्वयकपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
पुरेशा प्रसिद्धीअभावी सरकारच्या अनेक योजना सर्वसामान्यांपर्यंत पोहोचत नाहीत, त्यामुळे अनेक जनकल्याण योजनांपासून नागरिक वंचित राहतात. या योजना समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचाव्यात, यासाठी सचिवालयात मुख्यमंत्री जनकल्याण कक्षाची स्थापना करण्यात आलेली आहे.
‘शासन आपल्या दारी आणि मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियान’ या कक्षाच्या माध्यमातून राबविण्यात येत आहे. या योजनांची प्रभावी अंमलबजावणी व्हावी, यासाठी प्रचार आणि प्रसार करण्यासाठी डॉ. ज्योती वाघमारे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या महत्वाच्या पदावर सोलापूरच्या ज्योती वाघमारे यांची नियुक्ती करण्यात आल्याने समर्थकांकडून जल्लोष व्यक्त करण्यात येत आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.