Someshwar Election : शरद पवारांच्या भेटीनंतर सोमेश्वरच्या निवडणुकीत ट्विस्ट! बिनविरोधाच्या खेळीने अनेकांचे पत्ते कट?

NCP And Tutari Alliance Buzz in Someshwar Sugar Factory Election : सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या मुंबईतील सिल्व्हर ओक निवासस्थानी झालेल्या बैठकीनंतर आता ट्विस्ट निर्माण झाला आहे.
Someshwar Sugar Factory
Someshwar Sugar FactorySarkarnama
Published on: 
Updated on: 

Pune News : सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे ‘घड्याळ’ आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची ‘तुतारी’ एकत्र येणार का? याची उत्सुकता आता शिगेला पोहोचली आहे. कारखान्याची निवडणूक बिनविरोध करण्यासाठी दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये हालचाली सुरू असल्याची चर्चा सोमेश्वरच्या कार्यक्षेत्रात रंगली आहे. ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या मुंबईतील सिल्व्हर ओक निवासस्थानी दोन्ही राष्ट्रवादीच्या प्रमुखांची बैठक झाल्याची माहिती समोर आल्यानंतर राजकीय चर्चांना वेग आला आहे. येत्या तीन दिवसांत निवडणुकीचे चित्र स्पष्ट होण्याची शक्यता आहे.

सोमेश्वर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी तब्बल ५१४ इच्छुक उमेदवारांनी तयारी केली असून, त्यातून अंतिम २१ उमेदवार कोण असणार, याकडे सभासदांचे लक्ष लागले आहे. सर्वच राजकीय पक्षांची मुलाखत सत्रे पूर्ण झाली आहेत. मात्र, गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेला आरोप-प्रत्यारोपांचा धुरळा आता काहीसा शांत झाला आहे. त्यामुळे ही शांतता बिनविरोध निवडणुकीची नांदी ठरणार की जागावाटपात बिनसल्याने पुन्हा राजकीय संघर्ष पेटणार, याबाबत तर्कवितर्क लढविले जात आहेत.

घड्याळ-तुतारीच्या संभाव्य युतीने राजकीय समीकरणे बदलणार?

सोमेश्वर कारखान्याच्या निवडणुकीत सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद मोठी आहे. दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षानेही इच्छुकांच्या मुलाखती आणि गावभेट दौऱ्यांच्या माध्यमातून आपली ताकद दाखविण्याचा प्रयत्न केला आहे. शेतकरी कृती समिती, भाजप, शिवसेना आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानेही निवडणुकीसाठी स्वतंत्र तयारी केली आहे.

Someshwar Sugar Factory
Someshwar Sugar Election: सुनेत्रा पवारांची आज ‘परीक्षा’; सोमेश्वरसाठी 21 जागा, 514 दावेदार

मात्र, आता दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र आल्यास निवडणुकीचे संपूर्ण गणित बदलू शकते. दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना अभिवादन म्हणून निवडणूक बिनविरोध करण्याचा प्रयत्न सुरू असल्याची चर्चा आहे. मुंबईत झालेल्या बैठकीनंतर या चर्चेला अधिक जोर आला आहे. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास उमेदवारांची निवड, जागावाटप आणि अन्य पक्षांची भूमिका यावरून नवी राजकीय समीकरणे तयार होण्याची शक्यता आहे. मात्र, याबाबत अद्याप अधिकृत घोषणा झालेली नाही.

५१४ इच्छुकांमधून २१ जणांची निवड

कारखान्याच्या निवडणुकीसाठी शिवसेनेच्या ४० इच्छुकांच्या मुलाखती सर्वप्रथम पार पडल्या. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या १०० पेक्षा अधिक इच्छुकांच्या मुलाखती घेण्यात आल्या. भाजप, शेतकरी कृती समिती आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानेही स्वतंत्र मुलाखत सत्रे घेतली.

सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या तब्बल २७५ इच्छुकांच्या मुलाखती २३ आणि २४ सप्टेंबर रोजी दोन दिवस चालल्या. त्यानंतर २५ आणि २६ सप्टेंबर रोजी पाच गटांसाठी पाच निरीक्षक नेमून उमेदवार आणि सभासदांशी संवाद साधण्यात आला. आता अंतिम उमेदवारांच्या यादीत स्थान मिळविण्यासाठी इच्छुकांनी श्रेष्ठींकडे फिल्डिंग लावली आहे. कोणाला संधी मिळणार आणि कोणाला माघार घ्यावी लागणार, याची चर्चा गावागावांत सुरू आहे.

जगताप-काकडे संघर्षाला ब्रेक

गेल्या आठवडाभरात सोमेश्वर कारखान्याच्या कार्यक्षेत्रात राजकीय वातावरण तापले होते. कारखान्याचे अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप आणि शेतकरी कृती समितीचे नेते सतीश काकडे यांच्यात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडल्या. राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांनीही गावभेट दौरे आणि मुलाखतींच्या माध्यमातून आपापली ताकद दाखविण्याचा प्रयत्न केला.

मात्र, गेल्या दोन दिवसांपासून राजकीय हालचालींना अचानक ब्रेक लागल्याचे चित्र आहे. प्रचारातील आक्रमकता ओसरली असून कार्यक्षेत्रात शांतता पसरली आहे. त्यामुळे ही शांतता निवडणूक बिनविरोध करण्याच्या हालचालींचा भाग आहे की अंतिम जागावाटपापूर्वीची रणनीती, याबाबत सभासदांमध्ये उत्सुकता आहे.

Someshwar Sugar Factory
Someshwar sugar election 2026 : सोमेश्वर कारखान्याच्या निवडणुकीत धक्कादायक ट्विस्ट; एकाच जागेवर शेकडो दावेदार, 'या' गटात थेट लढत

१ ऑक्टोबरला अंतिम चित्र

निवडणुकीतील अर्ज माघारीची मुदत ३० सप्टेंबर रोजी संपणार असून, १ ऑक्टोबरला अंतिम उमेदवारांची यादी प्रसिद्ध होणार आहे. त्यामुळे त्यापूर्वीच सर्व राजकीय पक्षांना आपापल्या उमेदवारांची अंतिम यादी निश्चित करावी लागणार आहे. पुढील तीन दिवसांत दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसमधील चर्चेला कोणते वळण मिळते, जागावाटपाचा तिढा सुटतो का आणि इतर पक्षांची भूमिका काय राहते, यावर सोमेश्वर कारखान्याच्या निवडणुकीचे भवितव्य अवलंबून आहे. घड्याळ आणि तुतारी एकत्र आल्यास बिनविरोध निवडणुकीचा मार्ग मोकळा होणार की जागावाटपावरून नव्या संघर्षाची ठिणगी पडणार, याचे उत्तर आता लवकरच मिळणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com