

Solapur, 26 November : सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या १९ जागांपैकी १० बिनविरोध झाल्या असून उर्वरीत ९ जागांसाठी आज (ता. २६ नोव्हेंबर) ८६.९४ टक्के मतदान झाले आहे. यामध्ये सोसायटी मतदारसंघातील माळशिरसमध्ये मोहिते पाटील विरुद्ध बाबाराजे देशमुख, सांगोल्यात आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख विरुद्ध इंगोले आणि नागरी बॅंका मतदारसंघातील अमोल शिंदे विरुद्ध मनीष देशमुख यांच्या लढतीच्या निकालाकडे सर्वांचे लक्ष आहे. हे दोन्ही उमेदवार आज दिवसभर सोलापूर शहर आणि उत्तर सोलापूर मतदान केंद्रावर तळ ठोकून होते. माजी सहकार मंत्री सुभाष देशमुखांची एन्ट्री होताच अमोल शिंदे यांनीही सुभाषबापूंची आवर्जून भेट घेतली. सुभाष देशमुखांनीही शिंदे यांच्या खांद्यावर हात टाकत चर्चा केली, त्यांची जिल्हाभर उत्सुकता आहे.
सोलापूर डीसीसी बॅंकेच्या नागरी बँका मतदारसंघात शिवसेनेचे नगरसेवक अमोल शिंदे आणि माजी सहकार मंत्री तथा भाजप आमदार सुभाष देशमुख यांचे चिरंजीव मनीष देशमुख यांच्यात लढत झाली आहे. माजी मंत्री विजयकुमार देशमुख यांच्याशी सलगी असणाऱ्या अमोल शिंदेंच्या उमेदवारीमुळे सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला होता. मात्र, शिंदे यांनी मोहिते पाटील यांच्या पॅनेलमधून उमेदवारी केली आहे.
सोलापूर शहर आणि उत्तर सोलापूर तालुक्यासाठी शहरातील डॉ. निर्मलकुमार फडकुले सभागृहात मतदान केंद्र तयार करण्यात आले होते. दोन्ही उमेदवार या केंद्रावर तळ ठोकून होते. दोन्ही उमेदवारांनी काही वेळ एमेकांसोबत चर्चा केली होती. मात्र, मनीष यांच्या निवडणुकीची पाहणी करण्यासाठी आमदार सुभाष देशमुख मतदान केंद्रावर आले. त्यावेळी अमोल शिंदे यांनी सुभाष देशमुखांकडे जाऊन त्यांची भेट घेतली. दोघांमध्ये बराच वेळ चर्चाही झाली.
माजी आमदार दिलीप माने, जिल्हा परिषद सदस्य डॉ. पृथ्वीराज माने हे समर्थक मतदारांसह मतदान केंद्रावर एकाच वेळी प्रवेश केला. जिल्हा परिषदेसमोरील ब्रह्मदेवदादा माने बँकेतून समर्थक मतदारांना घेऊन थेट फडकुले सभागृहातील मतदान केंद्रावर आले होते. मनीष देशमुख यांनीही माजी आमदार माने आणि डॉ. पृथ्वीराज माने यांची भेट घेऊन संवाद साधला. एकमेकांचे कट्टर विरोधक म्हणून ओळखले जाणारे हे दोन्ही नेत्यांमध्ये गुफ्तगू सुरू हेाते.
लोकमंगल परिवार आणि सोलापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातील भाजप पदाधिकारी व कार्यकर्ते दिवसभर मतदान केंद्रावर मनीष देशमुख यांच्यासाठी तळ ठोकला होता. काँग्रेसचे शहराध्यक्ष चेतन नरोटे, गणेश डोंगरे यांच्यासह इतर मित्रपरिवार अमोल शिंदे यांच्यासाठी केंद्रावर ठाण मांडून होते.
दक्षिण सोलापूर तालुक्यासाठी शहारातील रंगभवन येथील समाज कल्याण केंद्रात मतदानाची व्यवस्था करण्यात आली होती. या ठिकाणी बाजार समितीचे संचालक सुरेश हसापुरे दिवसभर थांबून होते. त्यांच्यासोबत बाजार समितीचे संचालक श्रीशैल नरोळे, सोमशेखर करजोळे उपस्थित होते. बाजार समितीचे संचालक अविनाश मार्तंडे हे देखील या ठिकाणी होते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.