Solapur, 05 October : माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांचे नातू, उद्योजक शिखर पहारिया यांनी पुन्हा एकदा सोलापुरात हजेरी लावली. पहारिया यांनी सोलापूर शहरात विविध ठिकाणी भेटी देऊन तेथील समस्या जाणून घेऊन त्या सोडविण्याबाबत संबंधितांना अश्वस्त केले. मात्र, गेल्या वीस दिवसांत पहारिया हे दुसऱ्यांदा सोलापूर शहरात आले होते, त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पहारिया यांचा सोलापूर दौरा पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरला आहे.
दरम्यान, गणेशोत्सवाच्या काळातही शिखर पहारिया यांनी सोलापूर शहरात (Solapur) हजेरी लावली होती. काही गणेश मंडळांना त्यांनी भेट देत तेथील पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली होती. त्याचवेळी सोलापूर शहर मध्य मतदारसंघातून पहारिया यांच्या उमेदवारीची सोलापूर शहरात चर्चा झाली होती. मात्र, त्यावर शिंदे कुटुंबीयांनी तातडीने स्पष्टीकरण दिले होते.
उद्योजक शिखर पहारिया (Shikhar Paharia ) यांनी गुरुवारी सोलापूर शहरातील अनेक ठिकाणांना भेटी दिल्या. तेथील समस्या जाणून घेऊन त्या सोडवण्यासाठी प्रयत्नशील राहण्याची ग्वाहीही त्यांनी उपस्थित नागरिकांना दिली आहे. शिखर पहारिया यांनी भेटी दिलेले ठिकाणे आणि त्यांनी दिलेली आश्वासने यामुळे त्यांच्या दौऱ्याकडे राजकीय नजरेतून पाहिले जात आहे.
गणेशोत्सवादरम्यान शिखर पहारिया यांनी सोलापूरमधील काही मंडळांना भेटी देऊन तेथील कार्यकर्त्यांशी चर्चा केली होती. त्यावेळी सोलापूर शहर युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी सोलापूर शहर मध्य मतदारसंघातून शिंदे कुटुंबातील व्यक्तीने निवडणूक लढवावी, अशी मागणी केली होती, त्यामुळे सोलापुरात शिखर पहारिया यांच्या उमेदवारीबाबत एकच चर्चा सुरू झाली होती.
शिंदे कुटुंबीयांच्या वतीने एक पत्र काढून शिखर पहारिया हे विधानसभेची निवडणूक लढवणार नाहीत. सोलापूर शहर मध्य मतदारसंघातून काँग्रेसचा सर्वसामान्य कार्यकर्ता निवडणूक लढवेल, असे स्पष्टीकरण देण्यात आले होते.
गणेशोत्सवाला जेमतेम 15 ते 20 दिवसांचा कालावधी होत नाही तोच शिखर पहारिया हे पुन्हा एकदा सोलापूरच्या दौऱ्यावर आले होते. सोलापूर शहरातील बुद्धविहार, दर्गा आणि विविध नवरात्र उत्सव मंडळांना त्यांनी भेटी देऊन तेथील कार्यकर्त्यांशी चर्चा केली, त्यामुळे त्यांच्या सोलापूर शहर मध्य मतदारसंघातील उमेदवारीच्या संदर्भाने पुन्हा एकदा शहरातील राजकीय वर्तुळात दबक्या आवाजात चर्चा सुरू झाली आहे.
शिंदे कुटुंबीयाने स्पष्टीकरण दिले असले तरी शहर मध्य मतदारसंघातून काँग्रेसकडून ऐनवेळी शिखर पहारिया यांचे नाव पुढे येण्याची शक्यता नाकारता येत नाही, अशीही चर्चा सुरू आहे
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.