

Solapur, 16 April (विठ्ठल सुतार) : सोलापूर जिल्हा परिषदेत भारतीय जनता पक्षाला बहुमताने सत्ता मिळाली आहे, त्यामुळे अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि विषय समिती सभापतिपदाच्या निवडीत पक्षाने एकतर्फी बाजी मारली. त्याच पद्धतीने विषय समिती सदस्य निवडीही बिनविरोध करण्याची सूचना पक्षश्रेष्ठींची होती. मात्र, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दोन शिलेदारांनी भाजपचा ‘प्लॅन’ उधळला. अखेर भाजपला माघार घेत शिंदेसेनेच्या दोघांना महत्वाच्या विषय समित्यांवर स्थान देण्यात आले, त्यानंतर सोलापूर जिल्हा परिषदेतील विषय समिती सदस्यांच्या निवडी बिनविरोध झाल्या. या सर्व घडामोडींमध्ये जिल्हाध्यक्ष शशिकांत चव्हाण आणि गटनेत्या रश्मी बागल यांची भूमिका निर्णायक ठरली.
सोलापूर जिल्हा परिषदेच्या (Solapur Zilla Parishad) यशवंतराव चव्हाण सभागृहात १० विषय समिती सदस्य निवडीसाठी अध्यक्ष दीपक वैद्य यांच्या अध्यक्षतेखाली विशेष सर्वसाधारण सभा बोलावण्यात आली. या सभेत अक्कलकोट तालुक्यातून शिवसेनेकडून निवडून आलेले शिवराज म्हेत्रे यांना वगळून सदस्य निवडीचा भाजपचा प्रयत्न होता. मात्र, सकाळी ११ वाजता म्हेत्रे यांनी स्थायी, तर तानवडे यांनी बांधकाम व समाजकल्याण समितीसाठी अर्ज दाखल केला होता. दोन सदस्यांनी तीन समित्यांसाठी अर्ज दाखल केल्याने निवडणूक होणार, हे निश्चित झाले होते. त्यामुळे भाजपचा बिनविरोध निवडीचा प्लॅन शिवसेना सदस्यांनी उधळून लावला होता.
निवडणूक टाळण्यासाठी उपाध्यक्ष इंद्रजित पवार यांच्यासह गटनेत्या रश्मी बागल, जिल्हाध्यक्ष शशिकांत चव्हाण यांनी एका हॉटेलमध्ये वरिष्ठाशी चर्चा केली. या वेळी दोन्ही सदस्यांना संधी देण्याचा शब्द देण्यात आला. दुपारी दोन वाजण्यापूर्वी भाजपने (BJP) केलेल्या प्लॅनमध्ये बदल करत शिवराज म्हेत्रे यांना कृषी व शिक्षण समितीवर, तर प्रवीण तानवडे यांना अर्थ समितीवर संधी देण्यात आली.
दरम्यान, दुपारी २ वाजता कोरमअभावी तहकूब केलेली सभा पुन्हा ३.३० वाजता सुरू झाली. सभेत १० विषय समित्यांचे ८३ सदस्य बिनविरोध निवडले गेल्याचे सांगण्यात आले. शिवराज म्हेत्रे व प्रवीण तानवडे यांच्या ठिकाणी भाजपच्या सदस्यांना संधी दिली होती, त्यांची नावे बाजूला काढून म्हेत्रे यांना कृषी व शिक्षण तर प्रवीण तानवडेंची अर्थ समितीवर बिनविरोध निवड केल्याचे सभागृहात जाहीर केले.
जिल्हा परिषदेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष व चारही सभापती निवडी बिनविरोध केलेल्या सत्ताधारी भाजपला विषय समिती सदस्यांच्या निवडीत मात्र सपशेल माघार घेत, शिवसेना गटाच्या दोन सदस्यांना समितीवर स्थान द्यावे लागले. हे विशेष मानले जात आहे.
पत्रकारांना प्रवेश नाकारला...
अध्यक्ष, उपाध्यक्ष व विषय समिती सभापती निवडीवेळी पत्रकारांना सभागृहात प्रवेश मिळाला होता, पण समिती सदस्य निवडीवेळी त्यांना सभा सुरू झाल्यानंतरच प्रवेश असल्याचे सांगत अडविले गेले. म्हेत्रे व तानवडे यांनी केलेले अर्ज परस्पर माघार घेण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यात आल्याची चर्चा होती. त्यानंतर पत्रकारांना सभागृहात बोलावून कोरमअभावी सभा तहकूब करण्यात आल्याचे सांगत ३.३० वाजता सभा होणार असल्याची घोषणा उपमुख्य कार्यकारी अधिकारी स्मिता पाटील यांनी केली.
सभा कोरमअभावी नव्हे तर या कारणामुळे तहकूब
विषय समिती सदस्य निवड बिनविरोध करण्याच्या सूचना होत्या. दुपारी दोन वाजता बोलावलेली सभा ही सदस्याअभावी नव्हे तर सदस्य निवडीचा तिढा न सुटल्याने तहकूब करण्यात आली होती. ठीक ३.३० वाजता सभा सुरू होण्यापूर्वी उपाध्यक्ष इंद्रजित पवार हे सदस्यांचे स्वागत करत होते, शिवाय सभागृहात कोठे बसायचे याची सूचना करत असल्याचे दिसून आले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.