

pune political news : पुणे शहर आणि जिल्ह्याचे शिवसेनेचे संपर्कप्रमुख म्हणजे थेट मातोश्रीवर ॲक्सेस असणारे वजनदार नेते अशी ओळख असायची. पण याच ठाकरेंच्या शिलेदारांपैकी पाच जणांनी त्यांची साथ सोडली आहे. त्यापैकी चार जणांनी शिवसेनेत फूट पडल्यानंतर एकनाथ शिंदे यांच्या सोबत गेले आहेत. त्यामुळे पुण्यातील संघटना आधीच कमकुवत झालेली असताना ती आणखी खिळखिळी झाली आहे.
मुंबईत आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पुण्याचे संपर्क प्रमुख सचिन अहिर यांनी शिवसेनेत प्रवेश केला. एकनाथ शिंदे यांनी डॉ. नीलम गोऱ्हे यांच्याकडील विधानपरिषदेचे उपसभापतीपद काढून घेऊन तेथे अहिर यांची वर्णी लावली आहे. यानिमित्ताने ठाकरेंना सोडणाऱ्या संपर्क प्रमुखांच्या यादीत आणखी एका नावाची भर पडली आहे. शिवसेनेने आत्तापर्यंत राजन शिरोडकर, सुधीर जोशी, राम भंकाळ, रवींद्र मिर्लेकर, अरविंद सावंत, डॉ. नीलम गोऱ्हे, गजानन कीर्तीकर, डॉ. अमोल कोल्हे, उदय सामंत, बाळा कदम, सचिन अहिर यांचा समावेश आहे.
जून २०२२ मध्ये शिवसेनेत फूट पडली आणि महाविकास आघाडीचे सरकार कोसळले. त्यानंतर भाजपच्या मदतीने एकनाथ शिंदे यांनी शिवसेना ताब्यात घेऊन, शिवसेनेची मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. शिवसेनेत फूट पडल्यानंतर उदय सामंत वगळता उर्वरित मिर्लेकर, सावंत, किर्तीकर, गोऱ्हे, कदम, अहिर हे सर्वजण ठाकरे यांच्यासोबत एकनिष्ठ राहिले. मात्र, काही दिवसांनी किर्तीकर शिंदे यांच्या गटात गेले. त्यानतंर काही महिन्यांनी विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनीही ठाकरेंची साथ सोडली.
सुमारे गेल्या चार वर्षापासून सचिन अहिर यांच्याकडे पुण्याच्या संपर्कप्रमुख पदाची जबाबदारी होती. पडत्या काळात अहिर हे ठाकरे यांच्यासोबत निष्ठेने सोबत आहेत असे चित्र पुण्यातील शिवसैनिकांमध्ये निर्माण झाले होते. पण आज अहिर यांनी एकनाथ शिंदे यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतल्याने त्या भावनेला तडा गेला.
सन २००० ते २०२६ या २६ वर्षात शिवसेनेने पुण्याला नऊ संपर्कप्रमुख दिले. त्यापैकी पाच जणांनी ठाकरे यांची साथ सोडली आहे. त्यातील चौघे एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेले तर एक जण राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात आहेत.
कोल्हे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये
अभिनेते डॉ. अमोल कोल्हे यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर त्यांची लगेच पुण्याच्या संपर्कप्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली होती. पण त्यांनी शिवसेनेत फूट पडण्याच्या आधीच २०१९ च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी पक्ष सोडला आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेले. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसकडून लोकसभा निवडणूक लढवली. तेव्हापासून ते आत्तापर्यंत शिरूर लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत आहेत. कोल्हे आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात आहेत.
संपर्क प्रमुख आणि कालावधी (वर्षात काही बदल शक्य आहे.)
रवींद्र मिर्लेकर - २००० ते २००६
अरविंद सावंत - २००७ ते २००९
डॉ. नीलम गोऱ्हे - २००९ ते २०१२
गजानन किर्तीकर - २०१२ ते २०१५
अमोल कोल्हे - २०१६ ते २०१९
उदय सामंत - २०१९ ते २०२०
बाळा कदम - २०२० ते २०२१
सचिन अहिर - २०२२ ते २०२६
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.