

Kolhapur News: किल्ले विशाळगडावर पुन्हा एकदा वादाचा प्रकार समोर आला आहे. गडावर बाहेरून मांस घेऊन जाण्यास बंदी असतानाही एका व्यक्तीकडून मांसाची वाहतूक केली जात असल्याचे शनिवारी उघडकीस आले. या प्रकारामुळे संतप्त झालेल्या गडप्रेमींनी संबंधित व्यक्तीला पकडून मारहाण केल्याची घटना घडली. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून, विशाळगडावरील सुरक्षाव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
या घटनेनंतर गडप्रेमींनी घटनास्थळी असलेल्या पोलीस बंदोबस्ताला संपर्क साधून संबंधित प्रकाराची माहिती दिली. त्यानंतर पोलिसांना बोलावून हा प्रकार त्यांच्या निदर्शनास आणून देण्यात आला. रात्री उशिरापर्यंत शाहूवाडी पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती समोर आली आहे.
किल्ले विशाळगडाचे ऐतिहासिक आणि धार्मिक महत्त्व लक्षात घेता गडाचे पावित्र्य राखण्यासाठी पुरातत्त्व विभागाकडून बाहेरून मांस आणण्यास बंदी घालण्यात आली आहे. गडावर येणाऱ्या भाविकांची आणि पर्यटकांची पोलिसांकडून तपासणीही केली जाते. असे असतानाही शनिवारी मांस घेऊन गडावर जाण्याचा प्रकार घडल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गडावर जाणाऱ्या एका व्यक्तीची गडप्रेमींनी झडती घेतली. यावेळी त्याच्याकडे मांस आढळून आले. बंदी असूनही अशा प्रकारे मांस गडावर नेले जात असल्याचे लक्षात येताच उपस्थित गडप्रेमी संतप्त झाले. त्यानंतर संबंधित व्यक्तीला जाब विचारण्यात आला आणि त्याला मारहाण करण्यात आली. या संपूर्ण प्रकाराचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रसारित झाला आहे.
विशाळगडावर यापूर्वीही विविध कारणांमुळे वाद निर्माण झाले आहेत. त्यामुळे गडावर कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस बंदोबस्त तैनात असतो. गडावर येणाऱ्या प्रत्येकाची तपासणी केली जात असल्याचे सांगितले जात असतानाही प्रतिबंधित वस्तू गडावर कशा पोहोचतात, असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.
शनिवारी घडलेल्या या प्रकारामुळे पोलीस बंदोबस्ताच्या कार्यक्षमतेवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. संबंधित व्यक्तीने मांस नेण्याचा प्रयत्न नेमका कोणत्या उद्देशाने केला, याबाबत अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही. शाहूवाडी पोलीस या प्रकरणी पुढील कायदेशीर कारवाई करत असून, रात्री उशिरापर्यंत गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू होते.
दरम्यान संबधित प्रकार उघडकीस आल्यानंतर बंदोबस्तात असणाऱ्या पोलिसांनीच हा पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याचा व्हिडिओमध्ये दिसत आहे. त्यामुळे पोलिसांच्या कार्यपद्धतीवर देखील आता शंका उपस्थित होत आहे
विशाळगडावरील या घटनेमुळे परिसरात पुन्हा चर्चेला उधाण आले असून, गडावरील नियमांची अंमलबजावणी आणि सुरक्षाव्यवस्थेबाबत प्रशासन काय भूमिका घेणार, याकडे लक्ष लागले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.