
Solapur, 14 July : संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावर शाई ओतून रविवारी (ता. 13 जुलै) दुपारी अक्कलकोट येथे शिवधर्म प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी हल्ला केला. या प्रकरणी शिवधर्म प्रतिष्ठानचे दीपक काटे याच्यासह त्याच्या सात सहकाऱ्यांवर अक्कलकोट पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या हल्ल्यानंतर दीपक काटे कोण आहे, अशी चर्चा रंगली आहे. याच दीपक काटेला पुण्यातील लोहगाव विमानतळावर बेकायदा जिवंत काडतुसे, मॅगझीन बाळगल्याप्रकरणी अटक करण्यात आली होती. तसेच, तो भाजपचा पदाधिकारी असल्याचा आरोप होत आहे.
अक्कलकोट (Akkalkot) येथील स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जन्मेजयराजे भोसले यांच्या सत्कारनिमित्त प्रवीण गायकवाड हे रविवारी (ता. 13 जुलै) पत्नीसह अक्कलकोटला आले होते. गाडीतून उतरून ते कार्यक्रमस्थळी जात असताना इंदापूरहून अक्कलकोटला गेलेले दीपक काटे आणि त्याच्या सहकाऱ्यांनी पहिल्यांदा प्रवीण गायकवाड यांच्या अंगावर काळी शाई ओतली.
त्या प्रकारानंतर प्रवीण गायकवाड (Pravin Gaikwad) हे आपल्या गाडीत जाऊन बसले होते. मात्र, दीपक काटे आणि त्याच्या सहकाऱ्यांनी गायकवाड यांना गाडीतून ओढून बाहेर काढत त्यांना धक्काबुक्की करण्याचा प्रयत्न केला आहे. संभाजी ब्रिगेडचे सोलापूर जिल्हाध्यक्ष संभाजी भोसले आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी गायकवाड यांना काटे आणि त्याच्या सहकाऱ्याच्या तावडीतून सोडविण्याचा प्रयत्न केला.
दीपक काटे (Deepak Kate) आणि त्याचे सहकारी ऐकण्याच्या मनःस्थितीत नव्हते, त्यांनी गायकवाड यांना धक्काबुक्की करत त्यांच्या अंगावरील कपडे फाडण्याचा प्रयत्न केला. शेवटी संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी गायकवाड यांना बाजूला नेले, त्यानंतर वातावरण निवळले. मात्र, गायकवाड यांच्यावर हल्ला करणारा दीपक काटे कोण आहे, अशी चर्चा रविवारी दुपारपासून रंगली आहे.
दीपक काटे हा भाजपचा कार्यकर्ता नसल्याचे माजी प्रदेशाध्यक्ष तथा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज (ता. १४ जुलै) सकाळी स्पष्ट केले आहे. मात्र, काटे हा भाजप युवा मोर्चाचा पदाधिकारी असल्याचा आरोप हेात आहे. खुद्द प्रवीण गायकवाड यांनीही ते भाजपचे कार्यकर्ते असल्याचा आरोप केला आहे. विरोधकांनीही भाजपवर हल्लाबोल केला आहे.
दरम्यान, प्रवीण गायकवाड याच्यावर हल्ला करणाऱ्या दीपक काटे याला पुण्यातील लोहगाव विमानतळावर विमानातून बेकायदा जिवंत काडतुसे, मॅगझीन आणल्यामुळे पकडण्यात आले होते. त्याच्या विरोधात इंडिगो विमान कंपनीच्या सुरक्षा अधिकाऱ्यांनी पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती.
त्यावेळी संभाजी ब्रिगेडकडून दीपक काटे हा भाजप आणि संभाजी भिडे यांचा कार्यकर्ता असल्याचा आरोप केला होता, आणि ही ओळख त्याने लपवली आहे, असा आरोप त्यावेळी संभाजी ब्रिगेडकडून करण्यात आला हेाता. जिवंत काडतुसे आणि मॅगझीन बाळगल्या प्रकरणी काटे याला अटकही करण्यात आली होती.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.