Solapur, 11 November : विधानसभा निवडणुकीत सोलापुरात अनेक घडामोडी घडल्या असून त्यातून अनेकांच्या वाट्याला राजी-नाराजी आली. विशेषतः सोलापूर दक्षिण मतदारसंघातील महाविकास आघाडीच्या उमेदवारीचा घोळ शेवटपर्यंत कायम होता. माजी आमदार दिलीप माने यांना काँग्रेसकडून उमेदवारी जाहीर होऊनही त्यांना शेवटपर्यंत एबी फॉर्म देण्यात आला नाही. त्याबाबत सोलापूरचे शहराध्यक्ष चेतन नरोटे यांनी काँग्रेसकडून दिलीप माने यांचा एबी फॉर्म आला होता. मात्र, महाविकास आघाडीचा धर्म पाळण्यासाठी आम्ही तो त्यांना दिला नाही, असे स्पष्ट केले. मात्र, माने यांच्यासाठी वरिष्ठांकडून आलेला एबी फार्म कोणी रोखला, त्याबाबतचा कोणी आदेश दिला होता, असा सवाल माने समर्थक विचारत आहेत.
दक्षिण सोलापूर मतदारसंघातून (Solapur South Assembly) काँग्रेसकडून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुकांची भाऊगर्दी होती. कारण लोकसभा निवडणुकीत दक्षिण सोलापूर मतदारसंघातून काँग्रेसच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांना दहा हजार मतांचे लीड मिळाले होते, त्यामुळे अनेकांना आमदारकीचे स्वप्न पडले होते. माजी आमदार दिलीप माने, उद्योजक महादेव कोगनुरे, काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष सुरेश हसापुरे, माजी नगरसेवक बाबा मिस्त्री या प्रमुख इच्छुकांचा त्यात समावेश होता.
महाविकास आघाडीच्या जागा वाटपात दक्षिण सोलापूर मतदारसंघ हा शिवसेनेच्या वाटेला गेला. शिवसेनेकडून जिल्हाप्रमुख अमर पाटील यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली, त्यामुळे काँग्रेसकडील (Congress) इच्छुकांचा भ्रमनिरास झाला. त्यातूनच कोगनुरे यांनी मनसेची, तर मिस्त्री हे बच्चू कडूंच्या प्रहार जनशक्ती पक्षाची वाट धरली.
दरम्यान, दिलीप माने यांच्या समर्थकांनी शक्तिप्रदर्शन करत अपक्ष निवडणूक लढवण्यासाठी त्यांच्यावर दबाव वाढवला. त्यातून माने यांनी अपक्ष निवडणूक लढवण्याचा इशारा देताच काँग्रेसच्या यादीत दिलीप माने यांच्या उमेदवारी जाहीर झाली, त्यामुळे समर्थकांनी फटाके फोडून आनंद व्यक्त केला.
माने यांना उमेदवारी मिळाली तरी एबी फार्म उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत त्यांना एबी फॉर्म मिळाला नाही. त्यावरून जोरदार राजकीय घमासान झाले. अपक्ष उमेदवारी अर्ज भरलेल्या दिलीप माने यांना काँग्रेसच्या खासदार प्रणिती शिंदे यांनी माघार घेण्यास भाग पाडले.
या सर्व घडामोडीत महाविकास आघाडीकडून अमर पाटील यांनी शिवसेनेकडून उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यांच्या प्रचारासाठी आलेले शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भरसभेत काँग्रेस नेते शिवसेना उमेदवाराच्या प्रचारात सहभाग नसल्याने कान टोचले, त्यामुळे खडबडून जागे झालेले काँग्रेस शहराध्यक्ष चेतन नरोटे हे आज सकाळीच उद्धव ठाकरेंच्या भेटीसाठी गेले.
ठाकरेंच्या भेटीनंतर माध्यमांशी बोलताना चेतन नरोटे यांनी दिलीप माने यांच्या ‘एबी फॉर्म’ वरून भाष्य केले. ते म्हणाले की, दिलीप माने यांच्यासाठी काँग्रेसकडून एबी फॉर्म आला होता. मात्र, महाविकास आघाडीच्या धर्माचे पालन करण्यासाठी आम्ही तो एबी फॉर्म माने यांना दिला नाही, त्यामुळे माने यांच्या कार्यकर्त्यांकडून नाराजी व्यक्त होत आहे.
काँग्रेस पक्षाकडून आलेला एबी फॉर्म माने यांना देण्यापासून कोणी रोखले असा सवाल या निमित्ताने उपस्थित आहे. मानेंच्या आमदारकीच्या मध्ये कोण अडथळा ठरले. एबी फॉर्म न देण्याचा निर्णय कोणाच्या आदेशाने झाला, असे सवाल नरोटे यांनी आज सकाळी केलेल्या दाव्यावरून उपस्थित होत आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.