

Solapur, 13 February : नुकत्याच झालेल्या नगरपालिका, महापालिका आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने सोलापूर जिल्ह्यात सर्वाधिक जागा जिंकून ऐतिहासिक कामगिरीची नोंद केली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतील धवल यशानंतर जिल्ह्यातील नेतेमंडळींची नजर आता विधान परिषदेकडे लागली आहे. मात्र, त्यासाठी नेतेमंडळींमध्ये तीव्र स्पर्धा असणार आहे. त्यात मागील पाच वर्षांपासून वेटिंगवर असलेले माजी आमदार प्रशांत परिचारक, राम सातपुते, राजेंद्र राऊत, पक्षात नव्याने दाखल झालेले माजी आमदार राजन पाटील यांची नावे चर्चेत आहेत. मात्र, ऐनवेळी पडद्यामागून हालचाली करणाऱ्या पक्षसंघटनेतील निष्ठावंतालाही लॉटरी लागू शकते.
सोलापूर जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने (BJP) ६८ पैकी तब्बल ३८ जागा जिंकून प्रथमच निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित केले आहे. तसेच, अकरा पंचायत समित्यांपैकी तब्बल सात समित्यात भाजपने यश मिळविले आहे. त्याअगोदर सोलापूर महापालिकेच्या निवडणुकीत तर भाजप नावाची त्सुनामी आली होती. त्यात विरोधकांसह मित्रपक्षांचा धुव्वा उडवत भाजपने १०२ जागांपैकर ८७ जागा मिळविल्या आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील दोन मोठ्या संस्थांवरही भाजपने एकहाती वर्चस्व राखले आहे.
दरम्यान, गेल्या महिन्यात झालेल्या नगरपरिषद-नगरपंचायतीच्या निवडणुकीत भाजपचे नगराध्यक्ष कमी निवडून आले असले तरी नगरसेवकांची संख्या सर्वाधिक निवडून आलेली आहे. ती १३० पेक्षा जास्त आहे. त्या अगोदर झालेल्या नगरपरिषद-नगरपंचायत निवडणुकीतही भाजपचे नगरसेवक निवडून आलेले आहेत, त्यामुळे भाजपची स्थानिक स्वराज्य संंस्थांमधील सदस्यांची संख्या ३०० पेक्षा जास्तवर जाते. त्यामुळे विधान परिषदेच्या (Vidhan Parishad) निवडणुकीत भाजपचे पारडे नक्कीच जड असणार आहे.
सोलापूर विधान परिषदेच्या एक जागेची मुदत २०२२ मध्येच संपली आहे. मात्र, त्या जागेवर अद्याप निवडणूक घेतलेली नाही. ती निवडणूक एप्रिल अखेर होण्याची शक्यता उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी वर्तविली आहे, त्यामुळे त्या निवडणुकीसाठी कोणाला संधी मिळणार, याची उत्सुकता सोलापूरला आतापासूनच लागली आहे.
मागील खेपेला या जागेवर माजी आमदार प्रशांत परिचारक हे निवडून आले होते. परिचारक हे पंढरपूर पोटनिवडणुकीत आणि २०२४ च्या सार्वत्रिक निवडणुकीत विधानसभेला इच्छूक होते. मात्र दोन्ही वेळा त्यांची समजूत काढून समाधान आवताडे यांना उमेदवार देण्यात आली होती. त्यावेळी तत्कालीन प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी परिचारक लवकरच विधीमंडळात दिसतील, असे जाहीरपणे सांगितले होते. त्यामुळे विधान परिषदेच्या उमेदवारीसाठी त्यांचा क्लेम पहिला असू शकतो.
परिचारक यांच्यासोबत माळशिरसचे माजी आमदार राम सातपुते यांचेही नाव स्पर्धेत आहे. मोहिते पाटलांसारख्या बलाढ्य राजकीय शत्रूला त्यांनी अंगावर घेतले आहे. तसेच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निकटवर्तीय म्हणून त्यांची ओळख आहे, त्यामुळे तरुण तुर्क असलेल्या सातपुते यांचेही नाव विधान परिषदेसाठी चर्चेत आहे.
बार्शीचे माजी आमदार राजेंद्र राऊत यांनीही तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या आणि पंचायत समितीच्या सर्वच सर्व जागा जिंकल्या आहेत. सलग पाचव्यांदा पंचायत समितीवर सत्ता राखली आहे. त्यामुळे राऊत यांनाही विधान परिषदेच्या आमदारकीची लॉटरी लागू शकते. यासोबतच नव्यानेच पक्षात दाखल झालेले माजी आमदार राजन पाटील, दिलीप माने यांनाही लॉटरी लागू शकते. पण त्यासाठी कोण कोणते पत्ते टाकणार यावर बरीच गणिते अवलंबून आहेत.
या माजी आमदारासोबत पडद्यामागून हालचाली करणारे पक्षसंघटनेत काम करणारे माजी जिल्हाध्यक्ष शहाजी पवार यांचेही नाव पुढे येऊ शकते. त्यामुळे विधान परिषदेची लॉटरी कोणाला लागणार, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष असणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.