

Solapur, 16 April : विधान परिषदेच्या नऊ जागांसाठी येत्या 12 मे रोजी मतदान होणार आहे. विधानसभेतील संख्याबळ पाहता नऊपैकी आठ जागा महायुतीला, तर एक जागा महाविकास आघाडी मिळण्याची शक्यता आहे. निवृत्त होणाऱ्या विधान परिषद सदस्यांपैकी सोलापूर जिल्ह्यातील बडे राजकीय घराणे असलेल्या मोहिते पाटील कुटुंबातील रणजितसिंह यांचा समावेश आहे. भाजपकडून त्यांना दुसऱ्यांदा संधी मिळणार की गेल्या वर्षभरातील घडामोडी पाहता रणजितसिंह मोहिते पाटील हे ‘नव्या पिच’वर बॅटिंग करणार, याची उत्सुकता आहे. महायुतीमधील संबंधित पक्षाने मोहिते पाटील यांना उमेदवारी दिली तर सोलापूर जिल्ह्यातील मोठे नेतृत्व त्यांना मिळू शकते.
विधान परिषदेतील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, शिवसेनेच्या नीलम गोऱ्हे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अमोल मिटकरी, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे, तर भाजपचे रणजितसिंह मोहिते-पाटील (Ranjitsinh Mohite Patil), संजय केनेकर, संदीप जोशी, दादाराव केचे, राजेश राठोड या नऊ सदस्यांचा येत्या १३ मे रोजी मुदत संपत आहे.
या नऊ सदस्यांमधील सोलापूर जिल्ह्यातील रणजितसिंह मोहिते पाटील यांना भारतीय जनता पक्षाकडून (BJP) पुन्हा संधी मिळण्याची शक्यता कमी दिसून येत आहे. कारण लोकसभा, विधानसभा निवडणुकीत रणजितसिंह यांनी पक्षविरोधी काम केले आहे, असा आरोप करून त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी माजी आमदार राम सातपुते यांनी केली आहे. पक्षाने त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. मात्र, त्यापुढे गाडी गेलेली नाही. पण मोहिते पाटील आणि भाजपमध्ये अंतर पडले आहे, हे कोणीही नाकारू शकत नाही.
लोकसभा निवडणुकीपासूनच्या घडामोडी पाहता भाजपकडून मोहिते पाटील यांना विधान परिषदेची उमेदवारी मिळविण्यात अनेक अडथळे आहेत. त्यामुळे ते इतर कोणत्या पक्षांकडून लढतात की योग्य संधी प्रतीक्षा करतात, याकडे सोलापूरच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
भाजपने माळशिरस तालुक्यात मोहिते पाटील यांना डावलून नगरपरिषद, जिल्हा परिषद, पंचायत समिती आदीच्या निवडणुका राम सातपुतेंच्या नेतृत्वाखाली स्वबळावर लढवल्या आहेत. पालकमंत्री जयकुमार गोरे यांचे पाठबळ त्यांच्या पाठीशी आहे. तसेच माढा लोकसभा मतदारसंघाचे गणित पाहता रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचे मित्र असलेले गोरे हे रणजिसिंहांच्या उमेदवारीसाठी अनुकूल राहणार का? हा कळीचा मुद्दा आहे.
भाजपकडून डावलेले जात असल्याचे मोहिते पाटील यांच्या लक्षात आले आहे, त्यामुळेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती मृत्यूनंतर मोहिते पाटील यांनी शिवसेनेचे मुख्य नेते, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी जवळीक वाढवली आहे. आमदार उत्तम जानकर आणि खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांच्याही विकासकामांच्या निमित्ताने भेटीगाठी सुरू आहेत, त्यामुळे शिवसेनेकडून रणजितसिंह मोहिते पाटील यांना संधी मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही.
रणजितसिंह यांना उमेदवारी देण्याचा शिवसेनेबरोबरच मोहिते पाटील यांना फायदा होणार आहे. कारण, मोहिते पाटलांसारखे मातब्बर घराणे शिवसेनेसोबत जोडले जाणार आहे. संपूर्ण जिल्ह्यात कार्यकर्त्यांचा संच आलेल्या मोहिते पाटील यांच्यामुळे ताकद वाढविण्याचा सेनेला फायदा होणार आहे. तसेच मोहिते पाटील यांना बंद पडलेल्या, मोडकळीस आलेल्या संस्था चालविण्यासाठी सत्तेचा फायदा होणार आहे, त्यामुळे शिवसेनेकडून मोहिते पाटील यांना संधी मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही.
रामराजेनंतर मोहिते पाटीलही शिवसेनेत जातील
लोकसभा निवडणुकीत डावलण्यात आल्यानंतर माढ्यातून लोकसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात जाण्याचा निर्णय मोहिते पाटील यांनी घेतला. तत्पूर्वी त्यांनी फलटणे रामराजे नाईक निंबाळकर यांच्याशी चर्चा केली होती. आत तेच रामराजे हे शिवसेनेत गेले आहेत, त्यामुळे रामराजेंनंतर मोहिते पाटीलही धनुष्य हाती घेण्याची शक्यता नाकारता येत नाही.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.