

Solapur, 26 March : सोलापूर जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्ष निवडीनंतर उद्या (ता. २७ मार्च) विषय समित्यांचे सभापती निवडले जाणार आहेत. आतापर्यंत अध्यक्षपद न मिळालेल्या बार्शीला दीपक वैद्य यांच्या माध्यमातून पहिल्यांदाच मानाचे पान मिळाले, तर उत्तर सोलापूरला दुसऱ्यांदा उपाध्यक्षपदाची संधी मिळाली आहे. आता सभापतिपदाचा निर्णय पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्यावर पक्षाने सोपवला आहे, त्यामुळे गोरे कोणत्या तालुक्याला संधी देणार, याची उत्सुकता वाढली आहे.
सोलापूर जिल्हा परिषदेत (Solapur Zilla Parishad) अर्थ व बांधकाम, महिला व बालकल्याण, समाजकल्याण, शिक्षण व आरोग्य, कृषी व पशुसंवर्धन अशा पाच विषय समित्या आहेत. यातील एक समिती उपाध्यक्ष इंद्रजित पवार यांच्याकडे जाणार आहे. उर्वरित चार समित्यांसाठी निवड होणार आहे. पण माळशिरसमधून निवडून आलेल्या संस्कृती सातपुते, दक्षिण सोलापूरचे रामप्पा चिवडशेट्टी, श्रुती भरगुंडे, माढ्यातून वंदना कांबळे आणि अमृता वाघे, मोहोळमधून बालाजी नरुटे, लखन शिंदे, सचिन जाधव की विमल खताळ यापैकी कोणाला संधी मिळणार? याबद्दल उत्सुकता आहे.
अक्कलकोट, दक्षिण सोलापूर आणि बार्शी तालुक्यास जिल्हा परिषदेच्या इतिहासात अध्यक्षपद मिळाले नव्हते. मात्र, या वेळी बार्शीने बाजी मारली आहे, त्यामुळे दक्षिण सोलापूर, अक्कलकोट सभातिपद मिळणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले. जिल्हा परिषद अध्यक्षपद धाराशिव लोकसभा मतदारसंघात गेल्यामुळे माढा (Madha) लोकसभा जिंकण्याचे टार्गेट असलेला भाजप माढ्यात सत्तेची किती पदे देणार, याचेही औत्सुक्य असणार आहे.
बालेकिल्ला असलेल्या माळशिरस तालुक्यात मोहिते पाटील यांना जोरदार टक्कर देणारे माजी आमदार राम सातपुते यांच्या पत्नी संस्कृती सातपुते यांना सभापतिपद निवडीत संधी मिळण्याची शक्यता आहे. सभापतिपदाच्या माध्यमातून तालुक्यातील जनसंपर्क वाढविण्यासाठी पालकमंत्री जयकुमार गोरे आणि भाजप नेतृत्व सातपुते यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याची शक्यता आहे.
अध्यक्षपदाच्या शर्यतीत माढा तालुकाही होता. त्यात माजी सभापती शिवाजी कांबळे यांच्या पत्नी वंदना कांबळे यांचे नाव आघाडीवर होते. मात्र, बार्शीला अध्यक्षपद मिळाले, त्यांचे नाव मागे पडले आहे. मात्र, सभापतिपदासाठी त्यांना संधी मिळणार की नवख्या टेंभुर्णीच्या युवा सदस्या अमृता वाघे की अन्य कोणाला संधी मिळणार, याकडे माढा तालुक्याचे लक्ष लागले आहे.
दक्षिण सोलापूरच्या कुंभारी जिल्हा परिषद गटातून निवडून आलेल्या श्रुती भरगुंडे यांनाही संधी मिळू शकते. पण अध्यक्षपदासाठी चर्चेत आलेले रामप्पा चिवडशेट्टी हे सभापतिपद स्वीकारणार की न स्वीकारून सव्वा वर्षानंतरचा आपला क्लेम मजबूत करणार, याकडे सर्वांचे लक्ष असणार आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या पत्नीचेही नाव अध्यक्षपदासाठी शर्यतीत होते. मात्र, अध्यक्षपदासाठी त्यांच्या पत्नीने नकार दिला. शिवाय कल्याणशेट्टी यांचे लक्ष्य आता लाल दिव्याचे असणार आहे, त्यामुळे अक्कलकोटमध्ये कल्याणशेट्टी आपल्या कोणत्या समर्थकाला सभातिपदाची संधी देणार, याची उत्सुकता आहे.
देशमुख, पाटील, भालकेंची सोलापूर विकास आघाडी
सांगोल्याचे शेकापचे आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख यांच्या सांगोला तालुका विकास आघाडीचे तीन, आमदार नारायण पाटील यांच्या करमाळा तालुका विकास आघाडीचे दोन आणि भगीरथ भालके यांच्या तीर्थक्षेत्र विकास आघाडीचा एक सदस्य विजयी झाला आहे. या तीनही आघाड्यांनी एकत्रित येत सोलापूर विकास आघाडीची स्थापना केली आहे. त्यामुळे या आघाड्या सभापती निवडीत काय भूमिका घेणार? याची उत्सुकता आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.