

Mumbai News : राज्याच्या राजकारणात गेल्या काही दिवसापासून वेगवान घडामोडी घडत आहेत. त्यामुळे राजकारण ढवळून निघाले आहे. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या सहा खासदारांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. अधिवेशनापूर्वीच या घडामोडी घडल्या. त्यानंतर विधान परिषदेतील आमदार सचिन अहिर यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेसोबत गेल्याने त्यांची विधानपरिषदेच्या उपसभापतीपदी वर्णी लागली आहे. त्यातच आता उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या एका आमदाराने उपसभापती सचिन अहिर यांची भेट घेतल्याने चर्चेला उधाण आले आहे.
विधानपरिषदेचे नवनिर्वाचित उपसभापती सचिन अहिर यांची ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार दिलीप सोपल यांनी बुधवारी भेट घेतली. ही भेट घेतल्याने चर्चेला उधाण आले असतानाच या भेटीचे कारण अहिर यांनी स्पष्ट केले आहे. अहिर हे राष्ट्रीय मिल मजदूर संघटनेचे (इंटक) अध्यक्ष आहेत. त्यामुळेच आमदार दिलीप सोपल यांच्या मतदारसंघात असलेल्या केंद्र सरकारच्या मिलसंदर्भात आणि तेथील कामगारांच्या प्रश्नाच्या अनुषंगाने सोपल यांनी सचिन अहिर यांची भेट घेऊन चर्चा केली.
कोरोना लॉकडाऊनपासून केंद्रीय वस्त्रोद्योग महामंडळांतर्गत चालणाऱ्या गिरण्या बंद आहेत. त्यामध्ये, महाराष्ट्रातील 5 मिल्सचा समावेश असून मुंबईतील तीन, सोलापूर जिल्ह्याच्या बार्शी आणि अमरावतीच्या अचलपूरमधील मिलही बंद आहेत. तब्बल 6 वर्षांहून अधिक काळापासून ह्या मिल बंद असल्याने येथील कामगारांवर बेरोजगारीची वेळ आली आहे. येथील कायम कामगारांना सरकारकडून पगार दिला जातो, मात्र गेल्या 10 महिन्यांपासून त्याचा हा पगार रखडल्याने मुलांच्या शिक्षणाचा आणि उदरनिर्वाहाचा गंभीर प्रश्न कामगारांपुढे आहे. त्याच अनुषंगाने दिलीप सोपल यांनी अहिर यांच्याशी चर्चा केली.
बार्शीतील बंद असलेल्या बार्शी टेक्स्टाईल मिलमधील कामगारांच्या प्रलंबित वेतन व इतर देयकाबाबत राष्ट्रीय गिरणी कामगार संघांचे प्रमुख तथा विधानपरिषद उपसभापती सचिन अहिर यांना भेटून सविस्तर चर्चा केली. यावेळी, अहिर यांनी लवकरच खासदार श्रीकांत शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना खासदार यांच्या शिष्टमंडाळासह बैठक लावूया तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटून हा प्रश्न निकाली काढण्याचे आश्वासन दिल्याची माहिती आमदार सोपल यांनी दिली.
यावेळी, लवकरच आम्ही शिष्टमंडळ घेऊन केंद्रीय वस्त्रोद्योगमंत्र्यांना भेटणार असून आपणही आमच्यासोबत यावे, असे निमंत्रणच आमदार सोपल यांना दिले. तसेच शिवसेनेच्या 13 खासदारांसह पंतप्रधान नरेंद्र मोदींनाही भेटणार असल्याचे अहिर म्हणाले. या भेटीमुळे आणि सचिन अहिर यांनी दिलेल्या आश्वासनामुळे गिरणी कामगारांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.