

"पैशांचा प्रचंड वापर, सत्तेचा दुरुपयोग आणि धार्मिक ध्रुवीकरणाच्या माध्यमातून पुन्हा सत्तेत येण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. मात्र, विविध कारणांमुळे भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघात अस्वस्थता वाढत आहे. त्यामुळे २०२९ची लोकसभा निवडणूक कोणाच्या नेतृत्वाखाली लढवायची, यासाठी तीन नावांवर त्यांच्यात चर्चा सुरू आहे. या निवडणुकीसाठी भाजपचा चेहरा होण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना उपपंतप्रधान व्हायचे आहे," असा दावा माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी शुक्रवारी केला.
चव्हाण यांनी 'सकाळ' कार्यालयाला भेट देऊन संपादकीय विभागातील सहकाऱ्यांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी देशातील राजकीय परिस्थिती, काँग्रेसचे नेतृत्व, जेन-झी आंदोलन, अमेरिकेतील एपस्टीन फाइल्स प्रकरण आणि सोनिया गांधी यांचे आत्मचरित्र आदी प्रश्नांना उत्तरे दिली.
चव्हाण म्हणाले, "अलीकडच्या काळातील निवडणुकांचे निकाल आणि विविध आंदोलनांतून जनतेच्या मनातील असंतोष व्यक्त होत आहे. धार्मिक तणाव निर्माण करून मते मिळविणे, एखाद्याला खलनायक ठरविणे, अशी फॅसिस्ट प्रवृत्ती देशात वाढत आहे. धर्मावर आधारित राज्य निर्माण करण्याचा प्रयत्न दुर्दैवी आहे. जेन-झी आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांवर सरकारने कठोर कारवाई केली. या प्रश्नावर राहुल गांधी यांनी संसदेत आवाज उठविला; मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांनी उत्तर दिले नाही. त्यामुळे विरोधी पक्षांना रस्त्यावर उतरावे लागले."
धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याबाबत ते म्हणाले, "पूर्वी आरोप झाल्यानंतर नैतिक जबाबदारी स्वीकारून काँग्रेसच्या मंत्र्यांनी तत्काळ राजीनामे दिले होते.
मात्र, भाजपच्या काळात आरोप होऊनही मंत्र्यांनी पद सोडले नाही. विद्यार्थ्यांच्या वाढत्या दबावामुळेच प्रधान यांचा राजीनामा घेण्यात आला."
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष हा 'मविआ'तील महत्त्वाचा घटक आहे. मात्र, मतदारसंघ पुनर्रचनेच्या मुद्द्यावर ते 'एनडीए' बरोबर गेल्यास महाविकास आघाडीचे मोठे नुकसान होईल. त्याचा आघाडीच्या भवितव्यावरही परिणाम होऊ शकतो, असे चव्हाण म्हणाले.
पदयात्रेनंतर राहुल गांधी यांच्या नेतृत्वातील आक्रमकता, करारीपणा वाढला
सदोष मतदारयाद्यांमुळे विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला फटका
मतदारसंघ पुनर्रचनेचा सर्वाधिक परिणाम दक्षिण भारतातील राज्यांवर होणार
दुष्काळाच्या तीव्रतेबाबत सरकारला गांभीर्य नाही
सहकार चळवळीचा गळा घोटला जात असल्याचे 'गोकूळ'च्या उदाहरणातून अधोरेखित
सतेज पाटील हे राज्यातील काँग्रेसचे सक्षम उदयोन्मुख नेतृत्व