

Mumbai News: गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला होता. तसेच शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीही एनडीएसोबत जाणार असल्याचं बोललं जात आहे. त्यात भर म्हणजे शरद पवारांनी गेल्या काही दिवसांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत दोनवेळा भेट झाली आहे. यामुळे राजकीय वर्तुळात विलिनीकरण आणि एनडीएसोबत जाण्याच्या चर्चांना उधाण आलं होतं. यावर शरद पवारांनी एक घाव दोन तुकडे करत सस्पेन्सच संपवला.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी सोमवारी(ता.28) आपली भूमिका स्पष्ट केली आहे. त्यांनी आपला पक्ष कोणत्याही पक्षात विलीन होणार नाही.कुणाला यायचं असेल तर आमच्या पक्षात या. आम्ही कुणाच्या पक्षात जाणार नाही असं ठणकावून सांगितलं आहे. त्यांनी एकप्रकारे एनडीएसोबत जाणार नाही, अशी स्पष्ट भूमिका मांडली आहे.
महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या शरद पवारांनी विलिनीकरणाबाबत घेतलेल्या भूमिकेच्या टायमिंगची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. आता पवारांच्या भूमिकेवर उपमु्ख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी आपली प्रतिक्रिया दिली.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार शरद पवार यांनी कुणाला यायचं असेल तर आमच्या पक्षात या असं स्पष्ट केलं आहे. तर खासदार सुप्रिया सुळे यांनीही सत्तेत जाण्यापेक्षा विरोधात राहणंच योग्य असं रोखठोक मत व्यक्त केलं आहे. यावर सुनेत्रा पवारांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी भाष्य केलं आहे.
सुनील तटकरे म्हणाले, शरद पवार हे देशाचे नेते आहेत, त्यामुळे त्यांनी जे काही मत व्यक्त केलं असेल त्यावर मी काही बोलणार नाही. पवारसाहेबांचे टायमिंग त्यांनाच माहिती आहे. अनेकवेळेला त्यांनी राज्याच्या राजकारणात टायमिंग साधलेलं आहे. त्यांनी 80 च्या दशकात, 90 च्या दशकात, 2000, 2010 च्यानंतर त्यांनी त्यांच्या पद्धतीनं टायमिंग साधलेला आहे. त्यामुळे आता नेमकं त्यामागं काय उद्देश असू शकेल ते शरद पवारांनाच माहिती",असं तटकरेंनी म्हटलं आहे.
तसेच आम्ही अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली एनडीएमध्ये जाण्याचा सामूहिकपणे निर्णय घेतला. दिवंगत ज्येष्ठ नेते यशवंतराव चव्हाण यांचे विचार, बहुजनांचे हीत साधायचे असेल तर सत्तेत असलं पाहिजे, या विचारांवर पुढे जात आम्ही सर्वांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वामधील एनडीएमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतल्याचंही तटकरे यांनी म्हटलं आहे.
आम्ही आता सत्तेमध्ये आहोत. अजितदादांच्या दुर्दैवी अकाली निधनानंतर सुनेत्रा पवार या पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा आहेत आणि उपमुख्यमंत्री म्हणून काम करत आहेत. आम्हाला विधानसभा निवडणुकीमध्ये मोठं यश मिळालं. त्यामुळे ते वक्तव्य त्यांच्या पुरतंच मर्यादित आहे. आम्ही कालही एनडीएमध्ये होतो, आजही एनडीएसोबत आहोत आणि भविष्यातील आमची वाटचाल ही एनडीएसोबतच असेल, असं मोठं विधान यावेळी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी केलं आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.